परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांची विहंगम गतीने आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी निर्मिलेला गुरुकृपायोग !

१. गुरुकृपायोगाचा उगम

Appakaka_col
कै. पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून सिद्ध होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात. अध्यात्मात ईश्‍वरप्राप्तीसाठी, म्हणजे मोक्षप्राप्तीसाठी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, ध्यानयोग, हठयोग इत्यादी अनेक योगमार्ग, म्हणजेच साधनामार्ग उपलब्ध असतांना सर्व मार्गांपेक्षा शीघ्र गतीने साधकांची आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःच्या अनुभवावरून गुरुकृपायोग निर्माण केला. सर्वसामान्य लोकांमध्ये अन् बहुतांश साधकांमध्येही भक्तीमार्गात आवश्यक असलेले भगवंतावरील निःसीम प्रेम किंवा ज्ञानमार्गासाठी आवश्यक असलेले वैराग्यही नसते. अशा साधकांसाठी आणि सर्वांसाठीही कर्म, भक्ती अन् ज्ञान या योगांचा सुरेख संगम असलेला गुरुकृपायोग प.पू. डॉक्टरांनी विशद केला. यात कर्मयोगाला प्राधान्य दिले आहे आणि त्याला भक्तीयोग आणि ज्ञानयोग यांची जोड दिली आहे.

 

२. गुरुकृपायोगानुसार साधनेचे टप्पे

Gsadhana_2-copy

कुलदेवीची उपासना आणि नामजप, अतृप्त पूर्वजांच्या लिंगदेहांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी दत्ताचा नामजप, सत्संग, सत्सेवा (सर्वोत्तम सत्सेवा, गुरुतत्त्वाची सेवा, म्हणजेच अध्यात्मप्रसार), तन-मन-धन यांचा सत्साठी त्याग, प्रीती, स्वभावदोष-निर्मूलन, अहं-निर्मूलन आणि भावजागृती, हे गुरुकृपायोगातील साधनेचे टप्पे आहेत. यांतील सत्सेवा ही समष्टी साधनेच्या अंतर्गत आहे, तर इतर गोष्टी व्यष्टी साधनेच्या अंतर्गत आहेत.

 

३. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन, तसेच भावजागृती
यांच्या प्रयत्नांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नवी दिशा देणे

कुलाचार, नामजप, सत्संग आणि त्याग हे व्यष्टी साधनेचे प्रकार प्रचलित आहेत. व्यष्टी आणि समष्टी साधना चांगली होण्यासाठी स्वभावदोष अन् अहं-निर्मूलन, तसेच गुणसंवर्धन करण्यासाठी साधना करणे सर्वांत महत्त्वाचे आहे. त्यामुळे साधकांतील रज-तम गुण न्यून होऊन सत्त्व गुण वाढतोे; म्हणून ही प्रक्रिया सर्व मार्गांतील व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्‍या साधकांना आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी उपयोगी पडेल. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रत्येक साधकाने आपल्या चुकांसंदर्भात स्वयंसूचना देणे, चुका सर्वांसमक्ष मान्य करून फलकावर लिहिणे, प्रतिदिन आपल्या साधनेचा आढावा लिहिणे इत्यादी नवीन मार्ग शोधून काढून स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन, तसेच भावजागृती यांच्या प्रयत्नांना नवीन दिशा दिली आहे. यामुळेच साधकांची साधनेत लवकर प्रगती होत आहे.

 

४. व्यष्टी आणि समष्टी साधना

गुरुकृपायोगात व्यष्टी साधनेसमवेत समष्टी साधनाही सांगितली आहे. साधनेत व्यष्टी साधनेचे महत्त्व ३० टक्के, तर समष्टी साधनेचे महत्त्व ७० टक्के आहे. व्यष्टी साधना म्हणजे व्यक्तीगत आध्यात्मिक उन्नतीसाठी केलेले प्रयत्न, तर समष्टी साधना म्हणजे समाज आणि राष्ट्र यांच्या उन्नतीसाठी अन् सनातन हिंदु धर्माच्या प्रसारासाठी प्रयत्न करणे.

 

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अध्यात्मप्रसारासारखी
समष्टी साधना करण्याचे महत्त्व ठामपणे प्रतिपादणे

सध्या रज-तमाचे प्रदूषण, धर्महानी, आतंकवाद, अराजकतेकडे झुकणारा देश इत्यादींमुळे साधनेसाठी आपत्काळ चालू आहे. आपत्काळात केवळ व्यष्टी साधना करून ईश्‍वरप्राप्ती करणे पुष्कळ कठीण असल्याने व्यष्टी साधनेसह समष्टी साधना करणेही महत्त्वाचे आहे. आतापर्यंत समष्टी साधनेकडे बहुतेक संत आणि गुरु यांनी दुर्लक्ष केले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी समष्टी साधनेचे महत्त्व ठामपणे सर्व लोकांसमोर मांडले आहे, किंबहुना व्यष्टी साधनेसह समष्टी साधना करणे इतकेच नाही, तर व्यष्टी साधनेपेक्षाही समष्टी साधना करणे अधिक महत्त्वाचे आहे, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या उपदेशानुसार अध्यात्मप्रसार हीच समष्टी साधनेसाठी सर्वोत्कृष्ट सेवा आहे; कारण त्यामुळे स्वतःसमवेत समाजाची आध्यात्मिक उन्नती होऊन सर्व वातावरण सात्त्विक बनून अध्यात्माला पोषक होईल.

 

६. गुरुकृपायोगानुसार साधना केल्यामुळे
साधकांची विहंगम गतीने होत असलेली प्रगती

गुरुकृपायोग हा विहंगम साधनामार्ग आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यानुसार साधकांकडून साधना करवून घेऊन वर्ष १९९७ पासून जुलै २०१६ पर्यंत गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने ६८ साधक संतपदी विराजमान झाले आहेत, तर ९२७ साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक पातळी गाठली असून त्यांचा आध्यात्मिक प्रवास संतत्वाच्या दिशेने होत आहे. या साधनामार्गाचे विदेशातील जिज्ञासूही आचरण करत असून स्वतःचे जीवन उद्धरत आहेत.

 

७. गुरुकृपायोगानुसार साधनेची काही वैशिष्ट्ये !

१. दिसेल ते कर्तव्य, घडेल ते कर्म आणि भोगीन ते प्रारब्ध !
२. व्यवहारातील प्रत्येक कृतीचे अध्यात्मीकरण करणे
३. अध्यात्मातील मार्गदर्शकांचे आज्ञापालन करणे
४. व्यवहारातील नियमित कृतींना साधनेची दिशा देणे

– कै. पू. (डॉ.) वसंत बाळाजी आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात