ईश्‍वरी राज्याची प्रतिकृती असलेला सनातनचा प्रत्येक आश्रम म्हणजे व्यवस्थापनाचे आदर्श उदाहरण !

sushma_kulkarni
सौ. सुषमा कुलकर्णी

माझ्या मनात रामराज्याविषयीचे विचार येत होते. रामराज्यात कुणीही खोटे बोलत नव्हते. कुणीही चोर्‍यामार्‍या आणि लबाडी करत नव्हते. लोकांमध्ये असूया, हेवेदावे आणि द्वेष नव्हता. सर्व प्रजा साधी आणि सरळमार्गी होती. सर्व प्रजा देवावर नितांत श्रद्धा असणारी आणि ईशचिंतनात मग्न, म्हणजे साधनारत होती.

या राज्यात कुणी कोणतेही कर्म करत असले, तरी त्याचे अंतिम ध्येय ईश्‍वरप्राप्तीच होते. त्यामुळे त्यांना कसलीही चिंता, काळजी किंवा लालसा नव्हती; म्हणून प्रजा अत्यंत समाधानी आणि आनंदी होती. मग विचार आला की, जर असे असेल, तर ईश्‍वरी राज्य येण्याची वाट का पहातोय आपण ? सनातन आश्रमात ईश्‍वरी राज्यच तर आहे. ‘अशी स्थिती कुठे पहायला मिळेल ?’, असा विचार करत असतांना सनातनच्या आश्रमांविषयी विचार मनात आले.

1414167809_sanatan_ashram_ramnathi_goa

 

१. सनातन संस्थेची आदर्श आश्रम जीवनपद्धती !

१ अ. सनातनच्या सर्वच आश्रमांतील साधक
प्रेमळ, गुणी आणि आचारधर्माचे पालन करणारे असणे

सनातनच्या कुठल्याही आश्रमात जा. सनातनच्या एका आश्रमातून दुसर्‍या आश्रमात आलो आहोत, असे मुळीच जाणवत नाही; कारण सर्व साधक अत्यंत प्रेमळ, गुणी आणि आचारधर्माचे पालन करणारे आहेत. त्यामुळे वेगळेपणा वाटत नाही. प.पू. डॉक्टरांनी साधकांना तसे घडवले आहे आणि तसे बाळकडूही पाजले आहे.

१ आ. साधकाची हरवलेली वस्तू जशीच्या तशी मिळणे

सनातनच्या आश्रमात कधीही वस्तूंची चोरी होत नाही. एखाद्या वेळी एखादा साधक त्याच्या वस्तू विसरला अगदी पैशांचा बटवा विसरला आणि कुणाला तो दिसला, तरी तो ती वस्तू उचलून फलकाजवळ ठेवतो आणि फलकावर ही वस्तू ज्याची असेल, त्याने त्याचे नाव फलकावर लिहून घेऊन जावी, अशी सूचना लिहितो. तो बटवा, थैली कुणीही उघडून बघत नाही. इतका प्रामाणिकपणा आणि सरळपणा आजच्या युगात येथे अनुभवायला मिळतो.

१ इ. साधक एकमेकांशी सलोख्याने वागत असणे

एकमेकांविषयी इर्षा, स्पर्धा, उणेदुणे आणि भांडण-तंटा असल्या गोष्टी इथे घडणे शक्य नाही. मोठ्या स्वरात बोलणे, थट्टा-विनोद आणि वायफळ बोलणे (गप्पागोष्टी) इत्यादीही येथे ऐकायला मिळत नाही.

१ ई. साधक वेळेचा सदुपयोग करत असणे

येथे कुणालाही रिकामा वेळच नसतो. आपल्या सेवेतून वेळ मिळालाच, तर साधक लगेच ध्यानमंदिरात नामजपाला बसतात. साधकांना थकवा जाणवत असेल, तर ते आपापल्या खोल्यांमध्ये विश्रांती घेतात.

१ उ. साधक दिलेली सेवा प्रामाणिकपणे करत असणे

आश्रमातील प्रत्येक साधक त्याची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करतो. कुणालाही एकमेकांच्या सेवांकडे लक्ष द्यावे लागत नाही. येथे कुणी कोणाचा बॉस नाही. त्यामुळे सुपरवायझिंग करावे लागत नाही. कोणालाही सेवेचा आग्रह (सक्ती) नसतो. साधक वेळेचे, कर्तव्याचे आणि आश्रमातील कार्यपद्धतींचे पालन व्यवस्थितपणे, तसेच आश्रमाची स्वच्छताही व्यवस्थित करतात.

१ ऊ. साधकांची स्वीकारण्याची वृत्ती

एखाद्या साधकाची त्याच्यातील स्वभावदोषांमुळे चूक झाली, तर त्याला अत्यंत प्रेमाने त्याची जाणीव करून दिली जाते. कुठलीही चूक हे अयोग्य कर्म असल्याने धर्मशास्रानुसार कर्मफलन्यायाने त्याचे पाप लागतेच. त्यासाठी त्याला चुकीची जाणीव करून देतांनाच योग्य दृष्टीकोन कोणता असला पाहिजे ?, हेही सांगितले जाते. त्यामुळे साधक त्याची चूक स्वीकारून झालेल्या चुकीसाठी प्रायश्‍चित्त घेतो आणि पुढे ती चूक होऊ नये, यासाठी प्रयत्नही (दक्षताही घेतो) करतो. अशा प्रकारे चूक स्वीकारून प्रायश्‍चित्त घेतल्यामुळे त्या प्रसंगातून साधकाची ईश्‍वरप्राप्तीची तळमळ वाढते; म्हणून अशा साधकाकडे श्रीगुरुमाऊलीचे विशेष लक्ष असते. ती आमची सद्गुरु माऊलीच ना !

१ ए. घरी ऐहिक सुख उपभोगत असलेले साधकही त्या
सुखाचा त्याग करून आश्रमात समाधान, आनंद आणि शांती अनुभवत असणे

आश्रमात सर्व साधक अत्यंत समाधानी आणि आनंदात असतात. कोट्यधीश असलेले साधकही ऐहिक सुखाचा त्याग करून सनातनच्या आश्रमात आले आहेत; कारण त्यांना त्यांच्या घरातही मिळत नसलेले समाधान, आनंद आणि शांती सनातनच्या आश्रमात मिळते. त्यामुळे भगवंत निवास कसा असतो ?, हे येथे अनुभवायला मिळते.

 

२. कृतज्ञता

२ अ. बाहेरच्या कलियुगाची झळ लागू देत नसल्याविषयी

आम्ही सर्व साधक श्रीकृष्णाच्या, प.पू. डॉक्टरांच्या कुशीत अत्यंत सुरक्षित आहोत; कारण बाहेरच्या कलियुगाची झळही श्रीगुरुमाऊली आम्हाला लागू देत नाही. ही त्यांची केवढी मोठी कृपा आमच्यावर आहे.

२ आ. अशा आदर्श वातावरणात रहायला मिळणे हे साधकांचे महाभाग्यच !

ईश्‍वरी राज्याची प्रतिकृती म्हणजे सनातन आश्रम ! प.पू. डॉक्टरांनी आम्हाला अशा आदर्श वातावरणात ठेवले आहे. हे आम्हा साधकांचे महाभाग्यच ! ज्यांना ईश्‍वरी राज्याची आदर्श जीवनपद्धत बघायची असेल, त्यांनी सनातनच्या आश्रमात येऊन बघावे. या आश्रमाच्या निर्मात्याचे गुणगान गायला शब्दच नाहीत. त्याच्या लीलेचे वर्णन करायला शब्दभांडारही अपूर्ण पडेल. मग मी पामर त्याचे वर्णन काय करणार ? या अनंताचे सर्वच अनंत आहे. त्याचे गुणगान करतांना वेदही थकले आणि त्यांनी केवळ नेती नेती म्हटले. तेथे मी काय लिहिणार आणि वर्णन करणार ? देवा, भगवंता, अनंता, तुझ्या चरणी कोटी कोटी नमस्कार आणि कृतज्ञता !

२ इ. साधकांवर कृपाशीर्वादाचा अखंड वर्षाव करत असल्याविषयी

ईश्‍वरी राज्य म्हणजे रामराज्य. ते कसे असते, हे आम्हा सर्व साधकांना श्रीगुरुमाऊलीने केवळ दाखवले नाही, तर ते भोगायलाही दिले. गुरुमाऊलीने आम्हा सर्वांना सतत साधनेत ठेवले आणि आमच्या मनुष्यजन्माचे सार्थक होण्यासाठी आमच्यावर कृपाशीर्वादाचा अखंड वर्षाव करत राहिली; म्हणून आम्ही गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञ आहोत.

प.पू. डॉक्टर, माझ्या मनात कुठलाही विचार नसतांना मला लिहायला सुचवलेत आणि लिहूनही घेतलेत. अन्यथा हे सर्व लिहिण्याची माझी पात्रता नाही. तुम्हीच सुचवलेले तुमच्याच कृपेने तुमच्या चरणी अर्पण करते.

तुमच्या कृपाप्रसादासाठी सदैव आतुरलेली,

– सौ. सुषमा कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
(२३.९.२०१५)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात