पिंडदान करण्यामागील अध्यात्मशास्त्र

प्रस्तूत लेखातून आपण ‘श्राद्धामध्ये भाताच्या पिंडाचे दान का करावे ?’, ‘गर्भवतीने पिंड पाहू नये, यामागील कारण काय ?’, ‘मंगलकार्यानंतर पिंडदान वर्ज्यका मानले जाते ?’ इत्यादी कृतींमागील अध्यात्मशास्र जाणून घेऊया.

 

१. श्राद्धामध्ये भाताच्या पिंडाचे दान का करावे ?

भाताचा गोल बनवून त्यावर संस्कार केल्यावर त्याचे रूपांतर पिंडात झाल्याने लिंगदेहाला वायूमंडलात येऊन मंत्रोच्चारामुळे पुढची मार्गक्रमणा करणे सोपे जाणे

‘भातामध्ये वापरलेले तांदूळ हे सर्वसमावेशक आहेत. तांदळाचा जेव्हा भात केला जातो, त्या वेळी त्यातील रजोगुण वाढतो. या प्रक्रियेत तांदळातील पृथ्वीतत्त्वाचे प्रमाण अल्प होऊन आपतत्त्वाचे प्रमाण वाढते. आपतत्त्वाच्या प्रभावामुळे भातातून प्रक्षेपित होणार्‍या सूक्ष्म-वायूमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. ज्या वेळी दहाव्या दिवशी मृतदेहाला आवाहन करून भाताचा गोल बनवून त्यावर संस्कार केले जातात, त्या वेळी त्याचे रूपांतर पिंडात होते, म्हणजेच भाताच्या भोवती निर्माण झालेल्या आर्द्रतादर्शक प्रभावळीकडे वायूमंडलातील लिंगदेहातून प्रक्षेपित होणार्‍या रजतमात्मक लहरींचे संस्करण होते. त्यामुळे भाताची ही प्रतिकृती लिंगदेहाच्या पिंडासमान म्हणजेच प्रकृतीसमान भासते; म्हणून त्याला ‘भाताचा पिंड’ असे नाव देण्यात येते. या रजोगुणी पिंडाच्या वातावरणकक्षेत लिंगदेहाला प्रवेश करणे सोपे गेल्याने मंत्रोच्चारणाने भारलेल्या वायूमंडलाचा त्याला लाभ होऊन सूक्ष्म बळ प्राप्त झाल्याने पुढची मार्गक्रमणा करणे सोपे जाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.६.२००५, दुपारी २.२५)

पिंडदान चलच्चित्रपट (Pinddan Video)

२. पिंडाकरता सर्व अन्नांतील थोडा थोडा भाग घेण्यामागील शास्त्र काय ?

अन्नातील सर्व पदार्थांचा वाटा पिंडाद्वारे मिळाल्याने लिंगदेहाच्या आसक्तीविषयक
भावना अल्प होण्यास साहाय्य होऊन लिंगदेह भूलोकात अडकण्याची शक्यता अल्प होणे

‘पिंड हा लिंगदेहाचे प्रतिनिधित्व करतो. ज्या वेळी लिंगदेह हा प्रत्यक्ष देहापासून विलग होतो, त्या वेळी तो वायूमंडलात मनातील संस्कारांची अनेक आवरणे लपेटून बाहेर पडतो. आसक्तीदर्शक घटकांमध्ये अन्नाचा सहभाग सर्वांत जास्त प्रमाणात असतो. प्रत्येक जिवाची अन्नाविषयीची आवड-निवड वेगळी असते. या सर्व आवडींचे निदर्शक म्हणून गोड, तिखट अशा प्रत्येक चवीतील पदार्थांनी युक्त असलेल्या अन्नांतील थोडा थोडा भाग घेऊन त्याच्या साहाय्याने पिंड बनवून तो श्राद्धस्थळी ठेवला जातो. यामुळे श्राद्धातील मंत्रोच्चारातील संकल्प–विधीच्या पिंडांवर केलेल्या संस्करणात्मक क्रियेमुळे त्या त्या अन्नपदार्थांतील सूक्ष्म-वायू कार्यरत होऊन बाह्य वायूमंडलात प्रक्षेपित होतात. श्राद्धातील संकल्पविधीमुळे श्राद्धस्थळी आलेल्या लिंगदेहांना तो तो अन्नाचा हविर्भाग सूक्ष्म-वायूंच्या माध्यमातून मिळणे शक्य झाल्याने लिंगदेह संतुष्ट होतात. त्या त्या पदार्थांचा वाटा मिळाल्यामुळे लिंगदेहाच्या आसक्तीविषयक भावना अल्प होण्यास साहाय्य झाल्याने लिंगदेह भूलोकात अडकण्याची शक्यता अल्प होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ७.१२.२००५, दुपारी १२.२२)

३. पिंड मधासह का द्यावा ?

मधामध्ये पितरलहरींना आकृष्ट आणि पिंडातच
बद्ध करण्याची क्षमता असल्याने पिंड मधासह दिला जाणे

‘मधुरसातून प्रक्षेपित होणार्‍या आल्हाददायक आणि थंडावा निर्माण करणार्‍या आपतत्त्वयुक्त लहरींकडे पितरलहरी अल्प कालावधीत आकृष्ट होऊन पिंडातच बद्ध होतात. मधामध्ये पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी संबंधित पितरलहरींना आपल्या माधुर्ययुक्त सुगंधाने प्रसन्न करण्याची अन् त्यांना पिंडातच बद्ध करण्याची क्षमता असल्याने पिंड मधासह दिल्याने तो दीर्घकाळ पितरलहरींनी भारित रहातो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.८.२००६, रात्री ८.२९)

४. पितृपक्षात करण्यात येणार्‍या श्राद्धातील धर्मपिंडाने आई आणि वडील या दोघांच्या कुळातील ब्रह्मदेवापासूनच्या स्वतःच्या पिढीपर्यंतच्या सर्व पितरांना लाभ कसा होतो ?

‘ब्रह्मदेव हा इच्छाशक्तीशी निगडित असल्याने, स्वतःला ब्रह्मात्मक इच्छाऊर्जेचा अंश समजून आवाहन केल्याने ब्रह्मांडातील इच्छालहरी कार्यरत होतात. त्यामुळे आपल्या कुळाशी संबंधित, तसेच देवाणघेवाण हिशोबाशी संबंधित सर्व लिंगदेहांना या आवाहनातून केलेल्या श्राद्धकर्मातून गती प्राप्त होते आणि आपला साधना करण्याचा मार्ग सुकर होतो. यासाठी ब्रह्माच्या इच्छाशक्तीच्या बळावर लिंगदेहांना आवाहन करणे महत्त्वाचे ठरते. वेगवेगळ्या स्तरांत अडकलेले लिंगदेह बहुतांशी वासनांशी, म्हणजेच विविध प्रकारच्या इच्छा-आकांक्षांशी संबंधित असल्याने, तसेच या सर्व भाव-भावनांची मूळ निर्मितीचब्रह्मदेवाच्या इच्छाशक्तीतून झालेली असल्याने ‘ब्रह्मदेवा-पासून’ असा उल्लेख मंत्रामध्ये केला आहे. ब्रह्मदेवाची इच्छाशक्ती ही सूक्ष्म असल्याने, तिची व्याप्ती तसेच परिणामकारकताही अधिक असते. त्यामुळे या इच्छाशक्तीच्या बळावर केलेल्या एका पिंडदानाने सर्वांना लाभ होण्यास साहाय्य होते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.३.२००५, दुपारी १.४०)

५. एखादा वासनात्मक लिंगदेह गर्भाकडे आकृष्ट होऊन गर्भाच्या माध्यमातून जन्म घेण्याची शक्यता असल्याने गर्भवतीने पिंड पाहू नये

‘गर्भ हा अतिशय संस्कारक्षम, संवेदनाक्षम आणि वातावरणातील कोणत्याही प्रकारच्या लहरींना आकर्षून घेणारा असतो; म्हणून शक्यतो गर्भवती स्त्रीला रज-तमात्मक वायूमंडलात आणू नये, तसेच तिने रज-तमात्मक अशी कोणतीच कृती करू नये; कारण याचा परिणाम गर्भावर होऊन त्यावर रज-तमात्मक संस्कार होण्याची शक्यता असते. गर्भवतीने पिंड पहाणे, म्हणजेच रज-तमात्मक वातावरणात येणे. मृत्यूनंतरच्या विधींमध्ये केल्या जाणार्‍या आवाहनामध्ये पिंडाच्या जवळ ते ते लिंगदेह आलेले असतात. एखादा वासनात्मक लिंगदेह गर्भाकडे आकृष्ट होऊन गर्भाच्या माध्यमातून जन्म घेऊन सर्वांनाच त्रास देऊ शकतो. यामुळे तो लिंगदेहही परत भूलोकातच अडकण्याची शक्यता असते, तसेच गर्भवती आणि गर्भ या दोघांनाही त्रास होण्याची शक्यता असते; म्हणून गर्भवतीने शक्यतो रज-तमात्मक वातावरण टाळणे श्रेयस्कर आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.६.२००५, दुपारी ३.४६)

६. मंगलकार्यानंतर पिंडदान वर्ज्य का मानले जाते ?

‘पिंड हा प्रत्यक्ष सगुण रूपे लिंगदेहाचे प्रतिनिधित्व करतो. मंगलकार्यात देवतांना उद्देशून सर्व आवाहनात्मक विधी असल्याने वास्तूही चैतन्याने पुनित झालेली असते. श्राद्धविधीत पिंडाला उद्देशून पितरांविषयक सर्व विधी केले गेल्याने स्थापित पिंडस्थळी थोड्याफार प्रमाणात रज-तमयुक्त लहरींचे संक्रमण होत रहाते. यामुळे पिंडाच्या माध्यमातून प्रत्यक्ष लिंगदेहाला स्थान न देता श्राद्धातील सर्व विधी संकल्पाने पार पाडले जातात आणि मंगलकार्यातून निर्माण झालेल्या सात्त्विक लहरींना टिकवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच मंगलकार्यानंतर पिंडासहित श्राद्ध केले असता, पितर तसेच त्यांना त्रास देणार्‍या इतर वाईट योनी वायूमंडलात प्रवेश करण्याच्या शक्यतेत वाढ होते; म्हणून श्राद्धकर्मातून निर्माण होणार्‍या त्रासदायक स्पंदनांत घट करण्यासाठी मंगलकार्यानंतर पिंडदान वर्ज्यमानले जाते, तसेच श्राद्ध आटोपल्यानंतरही प्रत्येक वेळी श्री गुरुदेव दत्तांना ‘वास्तूतील रज-तमयुक्त लहरींचे निर्दालन करण्यासाठी’ प्रार्थना करणे इष्ट ठरते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१२.२००५, दुपारी २.२४)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

 

Leave a Comment