२०१६ या वर्षाची अक्षय्य तृतीया म्हणजे सनातनच्या इतिहासातील सोनियाचा दिवस !

MAVV_Icon
महर्षि

 

१. अक्षय्य तृतीयेपासून सनातनचे कार्य
विश्‍वव्यापक होण्यास आरंभ होणार आहे, असे महर्षींनी सांगणे

IMG_0237_c
महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमावर लावण्यासाठी आणलेल्या कळसाचे ध्यानमंदिरात केलेले पूजन

९.५.२०१६ या दिवशी अक्षय्य तृतीया होती. या दिवशी गोव्यातील रामनाथी आश्रमावर तीन ठिकाणी महर्षींच्या आज्ञेनुसार तीन कळसांची स्थापना करण्यात आली. हे कळस वर्तमानकाळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचे प्रतिनिधीत्व करणारे आहेत. कळसस्थापनेनंतर सनातनच्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्याला आणखी प्रसिद्धी मिळणार आहे, तसेच हे कार्य भगवंताचेच असल्याने ते विश्‍वव्यापक होणार आहे, असे महर्षींनी आधीच सांगितले आहे.

 

२. कळसस्थापनेचा संबंध तीन प्रकारच्या काळांशी आहे,
असे महर्षींनी सांगणे आणि या वाक्याचा कळलेला भावार्थ !

२ अ. कळसस्थापनेच्या माध्यमातून महर्षींनी
सनातनच्या कार्याला एक प्रकारे काळच अनुकूल करून देणे

यावरून असे लक्षात आले की, तीन काळांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या कळसांच्या माध्यमातून एकप्रकारे महर्षि सनातनच्या कार्याला काळच अनुकूल करून देणार आहेत. काळगतीपुढे माणसाचे काही चालत नाही. तुम्हाला काळ पूरक नसेल, तर कार्यात अपयश येते किंवा कार्याची गती मंदावते; परंतु आता महर्षींच्या आशीर्वादामुळे काळच ज्याचा पिता बनला त्याने कार्य कसे वाढेल ?, याविषयी चिंता करण्याचे काहीच कारण नाही, असे जाणवले.

२ आ. काळगतीचे नियमन करणारा तो विश्‍वनियंताच जर
आपल्याला साहाय्यभूत ठरला, तर हिंदु राष्ट्र येणारच यात शंका नाही, असे वाटणे

काळगतीचे नियमन करणारा तो विश्‍वनियंताच जर आपल्याला साहाय्यभूत ठरला, तर हिंदु राष्ट्र येणारच यात शंका नाही, असे वाटले आणि काळालाच अनुकूल करून देणार्‍या महर्षींविषयी आता काय बोलायचे, असा विचार येऊन शब्दच खुंटले आणि डोळ्यांत केवळ पाणी उभे राहिले.

 

३. ६.५.२०१६ या दिवशी तिरुपती येथील
तिरुमला डोंगरावर झालेल्या नाडीवाचनानंतर महर्षींनी
कळसांतील देवतांच्या आवाहनासंदर्भात महत्त्वाचे सूत्र सांगितले

३ अ. प.पू. डॉक्टरांची कुलदेवी श्री योगेश्‍वरीदेवी हीच
वर्तमानकाळाचे प्रतिनिधीत्व करणारी शक्ती आहे, असे महर्षींनी सांगणे

प.पू. डॉक्टरांच्या हस्ते कळस स्थापन करतांना त्यांच्या कुलदेवीला, म्हणजेच श्री योगेश्‍वरीदेवीला आवाहन करावे. हीच देवी आता साधकांना वर्तमानकाळात सांभाळणार आहे आणि त्यांची आईप्रमाणे काळजी घेणार आहे. ही देवी वर्तमानकाळाचे प्रतिनिधीत्व करणारी आहे.

३ आ. भूतकाळाचे प्रतिनिधीत्व करणारी शक्ती म्हणजे श्री वज्रेश्‍वरीदेवी
आणि तिला कळसात येण्यासंबंधी आवाहन करावे, असे महर्षींनी सांगणे

रामनाथी आश्रमात सर्वांत उंच ठिकाणी लावल्या जाणार्‍या कळसामध्ये वज्रेश्‍वरीदेवीला आवाहन करावे. हा कळस म्हणजे भूतकाळ आहे. तो प.पू. भक्तराज महाराजांचे (बाबांचे) प्रतिनिधीत्व करणारा आहे. प.पू. बाबांप्रमाणे सार्‍या पृथ्वीवर भ्रमण करणार्‍या कार्तिकपुत्रीकडून (पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्याकडून) याची स्थापना करावी. आपत्कालात तिच्यामुळे सार्‍या साधकांचे रक्षण होणार आहे. ती तेथे नाही, तर तिच्या यजमानांकडून (पू. (श्री.) मुकुल गाडगीळ यांच्याकडून) याची स्थापना व्हावी, असे महर्षींनी सांगितले.

३ इ. पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते चढवल्या
जाणार्‍या कळसात भविष्यकाळाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या
श्री राजराजेश्‍वरीदेवीला आवाहन करावे, अशी महर्षींनी आज्ञा करणे

पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते चढवल्या जाणार्‍या कळसामध्ये येण्याविषयी श्री राजराजेश्‍वरीदेवीला आवाहन करावे. या कळसाची स्थापना पू. (सौ.) बिंदाताईंच्या हस्ते करावी. हा कळस भविष्यकाळाचे प्रतिनिधीत्व करणारा आहे. पू. (सौ.) बिंदाताई या भविष्यकाळाच्या कार्यवाहक आहेत. त्या साधकांना मातृवात्सल्याने घडवणार्‍या आहेत, असे महर्षींनी सांगितले.

४. कळसस्थापनेच्या वेळी
तुम्ही तिरुपती बालाजीच्या मंदिरात
असायला हवे;कारण या भूलोकातील वैकुंठातूनच
एक दिव्य शक्ती तुम्ही येथे असण्याने रामनाथीला जाणार
आणि त्या त्या कळसांमध्ये स्थापन होणार, असे महर्षींनी सांगणे

कळसस्थापनेच्या वेळी तुम्ही (पू. सौ. अंजली गाडगीळ) तिरुपती बालाजीच्या मंदिरात असायला हवे. तिरुपती बालाजी म्हणजे जणुकाही भूलोकातील वैकुंठच आहे. या वैकुंठातूनच एक दिव्य शक्ती तुम्ही येथे असण्याने रामनाथीला जाईल आणि त्या त्या कळसांमध्ये स्थापन होईल, असे महर्षींनी सांगितले आणि म्हणूनच आम्ही उद्या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिरुपतीला दर्शनाला जाऊ. हे दर्शन म्हणजे दिव्य दर्शन असणार !, असे महर्षींनी सांगितले आहे.

प्रार्थना !

महर्षींनाच आम्ही प्रार्थना करत आहोत की, तुम्ही सूक्ष्मातून काय काय करत आहात, ते आमच्या मानवी बुद्धीला कळत नाही; परंतु तुम्ही सांगत असलेल्या प्रत्येक कृतीमध्ये सर्व देवच करत आहे, हा भाव मात्र आमचा निरंतर जागृत राहू दे, हीच तुमच्या चरणी कळकळीची प्रार्थना. आणखी काय बरे आम्ही करू शकतो ? तुम्ही तर सर्वच जाणता !

काळवाचक अशी सर्वज्ञता असणार्‍या, सर्व ब्रह्मांडाचे योगक्षेम वहाणार्‍या, तसेच मातृवात्सल्यभावाने साधकांची अतीव काळजी घेणार्‍या महर्षींच्या चरणी आम्हा साधकांचा कोटी कोटी नमस्कार !

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, तिरूपती, आंध्रप्रदेश. (८.५.२०१६, सकाळी ८.४६)

 

प.पू. डॉक्टरांचे, तसेच रामनाथी आश्रमाचे
रक्षण होण्यासाठी महर्षींनी दिलेले तीन कळस !

Anjali_Gadgil
पू. (सौ). अंजली गाडगीळ

पुढे आपत्काळात येणार्‍या अनेक प्रकारच्या संकटांपासून, तसेच वीज पडण्यापासून प.पू. डॉक्टरांचे, तसेच आश्रमांचे रक्षण होण्यासाठी महर्षींनी करुंगाळी वृक्षाच्या लाकडाचा तुकडा घालून मंत्रशक्तीने भारीत केलेले तीन कळस दिले. पूर्वीच्या काळी मंदिरांवर वीज पडू नये, तसेच वातावरणातील नकारात्मक स्पंदने त्या त्या वास्तूपासून दूर ढकलली जावीत, यासाठी मंदिरावर तांब्याचा कळस बसवला जात असे.

१. विजेला स्वतःपासून दूर ढकलण्याची ताकद असणारा करुंगाळी वृक्ष

मंदिराचे वीज पडण्यापासून रक्षण होण्यासाठी या तांब्याच्या कळसात करुंगाळी नावाच्या विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीचे लाकूड बसवले जाई. अत्यंत दुर्मिळ झालेला हा वृक्ष विजेला दूर ढकलणारा आहे. हा वृक्ष उंच पर्वतावरील जंगलात आढळतो. पूर्वी अशा कळसावर कुंभाभिषेक केला जाई.

२. महर्षींची सनातनवर असलेली कृपा !

विजेपासून रक्षण करणार्‍या या वनस्पतीची माहिती महर्षींनीच नाडीपट्टीतून आम्हाला दिली आणि ही वनस्पती आम्हाला उपलब्ध करून देऊन ती या तीन प्रकारच्या कळसांमध्ये बसवून हे कळस मंत्रशक्तीने भारीत करून आमच्याकडे सोपवले. महामृत्यूंजय होमाच्या दिवशीच हाही विधी पार पडला.

३. कळसाच्या आत अनेक दैवी वस्तू
घालून हे कळस महर्षींनी साधकांच्या कह्यात देणे

या कळसाच्या आत कापूर, नवरत्न, टरफलासहित असणारे तांदूळ, तसेच करुंगाळी वृक्षाचे लाकूड घालून मगच हे कळस विधिवत् मंत्रशक्तीने भारीत केले गेले. असे कळस महर्षींनी आमच्या कह्यात दिले.

४. करुंगाळी लाकडाने युक्त असणारे असे १७ तांब्यांचे कळस पुढे
अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठीही देण्यात येतील, असे महर्षींनी सांगणे

पुढे येणार्‍या प्रलयंकारी काळात आकाशात भयंकर विजा चमकतील. या विजा आश्रमावर पडू नयेत; म्हणून महर्षि किती काळजी घेत आहेत, ते महर्षींच्या पुढील उद्गारांवरून कळले. पुढे असेच १७ कळस बनवून अध्यात्म विश्‍वविद्यालयासाठी देण्यात येतील. अध्यात्म विश्‍वविद्यालयात अनेक विभाग असतील. या विभागांचे वीज पडण्यापासून रक्षण होण्यासाठीही पुढे उपाययोजना करण्यात येईल. त्यातीलच हा एक भाग असल्याचे महर्षि म्हणाले.

– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (४.२.२०१६, सकाळी ९.१८)

 

कलशारोहणाच्या संदर्भात महर्षींनी सांगितलेले देवरहस्य !

१. महामृत्यूंजय, नवग्रह आणि सुदर्शन यज्ञात तांब्याचे ३ कळस अन्
करुंगाळी नावाच्या एका दिव्य वृक्षाचे लाकूड यांचे विधीवत् पूजन करण्यात येणे

२ आणि ३ फेब्रुवारी २०१६ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने ईरोड येथील पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या घरी महामृत्यूंजय, नवग्रह आणि सुदर्शन यज्ञ झाले. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या हस्ते नाडीभक्त वेदब्राह्मण श्री. गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचा मुलगा वेदमूर्ती श्री. अरुण यांनी यज्ञाचा संकल्प करवून घेतला. या यज्ञात तांब्याचे ३ कळस आणि करुंगाळी नावाच्या एका दिव्य वृक्षाचे लाकूड यांचे विधीवत् पूजन करण्यात आले. करुंगाळी वृक्षाचे लाकूड कळसाच्या पोकळीत जाईल, असे कापण्यात आले. करुंगाळी वृक्षाच्या या लाकडामध्ये विजेपासून रक्षण करण्याची शक्ती आहे. या कळसांमध्ये वेदमंत्रोच्चार करत नवधान्य आणि ब्रह्मांडातील स्पंदने आकर्षित करणारी सात्त्विक सामुग्री ठेवण्यात आली.

२. वसंतपंचमीच्या दिवशी परात्पर
गुरु डॉ. आठवले यांच्या शुभहस्ते कळसांचे पूजन होणे

यानंतर १२.२.२०१६, म्हणजेच वसंतपंचमीच्या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या शुभहस्ते या तीन कळसांंचे पूजन करण्यात आले. (वसंतपंचमीच्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु श्री अनंतानंद साईश यांनी त्यांचे भक्तराज असे नामकरण केले होते. – संकलक)

३. कळसस्थापनेविषयी महर्षींनी सांगितलेली सूत्रे

३ अ. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची प्रतीके असणार्‍या कळसांची स्थापना झाल्यावर रामनाथी आश्रमाला मंदिराचे रूप येणार आहे !

महर्षि म्हणाले, हेे तीन कळस म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांची प्रतीके आहेत. भूतकाळ म्हणजे प.पू. भक्तराज महाराज, वर्तमानकाळ म्हणजे प.पू. डॉक्टर आणि भविष्यकाळ म्हणजे प.पू. डॉक्टरांचे उत्तराधिकारी. गुरूंचे गुरु म्हणजे प.पू. भक्तराज महाराज यांच्या आशीर्वादानेच सनातन संस्था आणि सनातन आश्रम यांची स्थापना झाली. आताचे गुरु म्हणजे श्रीमत् नारायणस्वरूप प.पू. डॉक्टर यांच्या अस्तित्वाने रामनाथी आश्रमाचे तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले आणि प.पू. डॉक्टरांचे पुढील उत्तराधिकारी यांच्या माध्यमातून हे तीर्थक्षेत्र पुढील अनेक वर्षे जगभरातील साधकांना अध्यात्माच्या मार्गावर नेईल. आश्रमावर कळसांची स्थापना झाल्यावर गुरु रहात असलेल्या रामनाथी आश्रमाला मंदिराचे रूप येऊन पूर्णत्व प्राप्त होईल.

३ आ. कळसांंची स्थापना परात्पर गुरु डॉ. आठवले, उत्तरापुत्री पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि कार्तिकपुत्री पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अनुपस्थितीत त्यांचे पती पू. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते होईल !

पृथ्वीवर सध्या गुरु, उत्तरापुत्री पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि कार्तिकपुत्री पू. (सौ.) अंजली गाडगीळ असे तीन संत पृथ्वीच्या कळसांसारखे आहेत. हे तीन संत म्हणजे ईश्‍वराने सनातनच्या सर्व साधकांना दिलेली सर्वोत्तम भेट आहे; म्हणून या तीन संतांच्या हस्ते अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तीन कळसांची स्थापना व्हायला हवी. या दिवशी आपण गुरूंचे (प.पू. डॉक्टरांचे) वडील बाळाजी (पू. बाळाजी वासुदेव आठवले) यांना विसरून कसे चालेल ? त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्तिकपुत्रीने (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी) अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तिरुपति येथील बालाजीच्या मंदिरात असायला हवे. कार्तिकपुत्रीच्या जागी तिचे यजमान पू. डॉ. मुकुल गाडगीळ हे रामनाथी आश्रमात कळसाची स्थापना करतील.

३ इ. रामनाथी आश्रमात कळसांची स्थापना कुणाच्या हस्ते होईल ?

एका कळसाची स्थापना प.पू. डॉक्टरांच्या हस्ते करायला हवी. एका कळसाची स्थापना पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करावी आणि अन्य एका कळसाची स्थापना पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते करावी. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुपारी १२.१५ ते १.४५ या वेळेत कळसांची स्थापना होऊन पुढील विधींना आरंभ करायला हवा. गुरूंच्या आश्रमातील वेदपाठशाळेेतील वेदब्राह्मणांच्या हस्ते हे सर्व विधी व्हायला हवेत; कारण हे साधक-पुरोहित प्रत्येक विधी भावपूर्ण आणि सुंदर करतात. यापुढेही आश्रमात होणारे सर्व विधी हेच साधक-पुरोहित करतील.

३ ई. कळसस्थापनेच्या वेळी कोणत्या देवतेचे आवाहन करण्यात येणार आहे ?

भूतकाळाचे प्रतीक असलेल्या आणि पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते उभारण्यात येणार्‍या कळसाच्या स्थापनेच्या वेळी श्री वज्रेश्‍वरीदेवीचे; वर्तमानकाळाचे प्रतीक असलेल्या अन् प.पू. डॉक्टरांच्या हस्ते उभारण्यात येणार्‍या कळसाच्या स्थापनेच्या वेळी त्यांची कुलदेवता श्री योगेश्‍वरीदेवी हिचे आणि भविष्यकाळाचे प्रतीक असणार्‍या पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या हस्ते उभारण्यात येणार्‍या कळसाच्या स्थापनेच्या वेळी श्री राजराजेश्‍वरीदेवीचे आवाहन करण्यात येणार आहे.

३ उ. या कळसारोहण सोहळ्याला आणि साधकांना ब्रह्मा, विष्णु, महेश, सर्व देवता अन् ८८ सहस्र ऋषिगण आशीर्वाद देतील !

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ब्रह्मा, विष्णु, महेश, सर्व देवता आणि ८८ सहस्र ऋषिगण आकाशमंडळातून या कळसांमध्ये चैतन्य प्रक्षेपित करणार आहेत अन् सर्व साधकांना आशीर्वाद देणार आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी होणार्‍या या मंगलमय कार्याला आम्हा सप्तर्षींचे संपूर्ण आशीर्वाद आहेत.

 

 श्रीमत् नारायण आणि सप्तर्षि यांच्या चरणी व्यक्त केलेली कृतज्ञता !

हे श्रीमन्नारायणा, तू आम्हाला गुरुरूपात दर्शन दिलेस आणि आम्हा सर्व साधकांवर कृपा केलीस. आम्ही भूलोकात राहून तू आम्हाला रामनाथी आश्रमाच्या रूपात वैकुंठलोक दाखवलास, यासाठी आम्ही तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत. सप्तर्षींच्या साधकांवर असलेल्या अपार प्रेमामुळे श्रीमत् नारायणाची दिव्य लीला आम्हाला अनुभवायला मिळत आहे. यासाठी आम्ही सर्व साधक सप्तर्षींच्या चरणीही अनंत कोटी कृतज्ञ आहोत !
– (पू.) सौ. अंजली गाडगीळ, बेंगळुरू, कर्नाटक. (४.५.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात