प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्रता आणि एकांत या शब्दार्थांच्या गुंफणीतून उलगडलेले साधनामय जीवनाचे रहस्य !

PP_pande_maharaj
प.पू. पांडे महाराज

१५.११.२०१५ पासून प.पू. पांडे महाराज यांनी साधकांना शारीरिक व्याधींसाठी मंत्र देण्याची सेवा चालू केली. त्या वेळी त्यांना साधकांच्या शारीरिक व्याधी वेगळ्या असल्या, तरी त्यांच्या मानसिक जडणघडणीत साम्य असल्याचे आढळून आले. शारीरिक व्याधी हा प्रारब्धाचा भाग आहे, हे सर्वांनाच ठाऊक आहे; पण अनेक जण असे म्हणतात, साधनेसाठी माझे मन एकाग्र होत नाही. मला एकांत पाहिजे. माझी साधना नीट होत नाही. असे विचार ज्यांच्या मनात येतात, त्यांच्यासाठी प.पू. पांडे महाराज यांनी एकाग्र आणि एकांत म्हणजे नक्की काय ? ते कसे साध्य करायचे ? याविषयी केलेले सुंदर विश्‍लेषण या लेखात आपण पहाणार आहोत. साधकांनी त्यांच्या साधनाजीवनात या विचारांचे चिंतन आणि परिपाठ करून जर ही सूत्रे अवलंबिली, तर त्यांना त्यांचा नक्कीच लाभ होऊन या लिखाणाचे सार्थक झाले, असे म्हणता येईल.

१. ऋषींनी आध्यात्मिकदृष्ट्या विशद केलेली अंक आणि वर्ण यांची निर्मिती : शून्याचा शोध भारतातील आर्यभट्ट यांनी लावला. त्यानंतर त्यापासून १ ते ९ या अंकांची निर्मिती झाली. पुढे नवव्या शतकात या १ ते ९ या अंकांची परार्धपर्यंत मोजणी सांगितली गेली. नवव्या शतकानंतर हे अंक भारतातून जगभरात आयात केले गेले आणि पुढील अंकरचना सर्वत्र नावाजली गेली, प्रसिद्ध झाली; परंतु ही भगवंताची अंकांची लीला मायेतील व्यवहार चालण्यासाठी आहे. प्रत्यक्षात आपल्या ऋषींनी अंक आणि वर्ण यांची आध्यात्मिक दृष्ट्या विशद करणारी निर्मिती सांगितली आहे. हे १ ते ९ अंक ०शी (शून्याशी) निगडित म्हणजेच ब्रह्माशी निगडित असून ते पुन्हा शून्यातच विलीन होतात, म्हणजेच पुन्हा ब्रह्मातच विलीन होतात. सर्वांत शेवटी शून्यसुद्धा शून्यातीत होऊन निर्गुण-निराकार अशा मूलतत्त्वरूपी भगवंतात विलीन होते. याविषयीचे स्पष्टीकरण संत ज्ञानेश्‍वर महाराजांसह अनेक संतांनी अध्यात्माचे विश्‍लेषण करतांना केल्याचे आढळून येते.

२. एकांत आणि एकाग्रतेने केलेल्या साधनेने जीव मायेत बद्ध न होता ईश्‍वराशी अनुसंधानित राहून जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होणे : अशा या एकांत आणि एकाग्र या शब्दांच्या व्याख्येवरून लक्षात येते की, याप्रमाणे आचरण करत साधना केल्यास सतत भगवंताशी अनुसंधानित रहाता येते. साहजिकच अशा रीतीने मायेशी संबंध न आल्याने तो जीव मायेशी बद्ध होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. तसेच तो अशा भगवत् स्मरणात सतत राहिल्याने मृत्यूसमयीसुद्धा भगवंताशी सहज सुलभरित्या तादाम्य पावतो. त्यामुळे त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आणि तो जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होतो.

३. शून्याऐवजी एकाशी म्हणजेच मायारूपी फाट्याशी निगडित राहिल्याने अन्य पंथीय जीवनभर भौतिक सुखाच्या मागे लागणे आणि स्वर्गप्राप्तीचे मर्यादित लक्ष्य ठेवणे : जे मानवनिर्मित पंथ आहेत, त्यांनी शून्यापासून निर्माण झालेल्या एकच्या ऐवजी केवळ मायारूपी फाटा म्हणजे एक असे गृहीत धरून त्यावर आधारित पुढील अंकगणना केली. मायारूपी फाटा भौतिकाचा दर्शक आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि आचार हे मायेतील भौतिक सुखाशी निगडित राहून कार्य करत आहेत. त्यांच्या जीवनाचे ध्येय जीवनभर भौतिक सुख अधिकाधिक मिळवणे, हे असून आणि त्यानंतर हे सर्वोच्च सुख केवळ स्वर्गातच मिळते, अशी त्यांची धारणा असल्याने त्यांच्या जीवनाचे लक्ष्य केवळ स्वर्गप्राप्ती करणे, एवढेच आहे.

४. स्वर्गाची अभिलाषा धरून (प्रत्यक्षात नरकतुल्य) कर्म करणारे जन्ममरणाच्या फेर्‍यांत अडकणे : श्रीकृष्णाने गीतेत म्हटले आहे, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ९, श्‍लोक २१) म्हणजे पुण्य करून स्वर्गात गेलेल्याला त्याचे पुण्य संपल्यावर पुन्हा मर्त्यलोकात जन्माला यावे लागते; परंतु स्वर्गाची अभिलाषा करणारे आजचे हे भौतिक पंथीय लोक अपेक्षा मात्र स्वर्गाची करतात आणि कर्म मात्र नरकात जावे लागेल, असे करतात. अशा प्रकारच्या सकाम कर्माची इच्छा करणारे जन्म मरणाच्या फेर्‍यांत अडकले जातात. – प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.१.२०१६)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात