श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सत्संगात साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !

Article also available in :

‘२९.५.२०२६ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी तेलंगाणा, झारखंड आणि महाराष्ट्र या राज्यांतून आलेल्या काही नवीन साधकांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातील काही सूत्रे या लेखात दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. देव आपले साधनेचे प्रयत्न पहात असतो आणि ‘व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देणे, त्यात मनाची सर्व प्रक्रिया सांगणे अन् त्यातून शिकणे’, असे प्रयत्न आपण करत रहाणे आवश्यक !

एक साधिका : माझे साधनेचे प्रयत्न २ – ३ मास चांगले झाले; पण त्यानंतर माझ्या साधनेच्या प्रयत्नांत खंड पडला. मला श्रद्धेने आणि अंतर्मनापासून साधना करण्याची इच्छा आहे. हे कसे करायचे ?

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : या कालावधीत काही झाले होते का ? किंवा प्रसंग घडला होता का ? नेमके काय झाले होते ?

एक साधिका : त्या वेळी २ – ३ मासांनी माझी परीक्षा होती. तेव्हा मी परीक्षेचा अभ्यास सेवा म्हणून केला. माझी परीक्षा झाल्यानंतर माझ्या मनाला रिक्तपणा जाणवू लागला. आता माझ्याकडून भावजागृतीचे प्रयत्न होत नाहीत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : काही कालावधीत व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले जमले आणि आता जमत नाहीत, असे असतांना आपल्याला त्याचा कार्यकारणभाव ठाऊक नाही. त्यामागे ‘बाहेरून होणारे त्रास (वाईट शक्तींची आक्रमणे), स्वत:चे साधनेचे प्रयत्न अल्प असणे आणि मनात येणारे विचार’, अशी विविध कारणे असू शकतात. आपल्याला ३६५ दिवस प्रत्येक दिवशी २४ घंटे साधना करायची आहे. आपण प्रयत्न करत रहायचे. देव आपले प्रयत्न पहात असतो. यासाठी ‘व्यष्टी साधनेचा आढावा नियमित देणे, त्यात मनाची सर्व प्रक्रिया सांगणे आणि त्यातून शिकणे’, असे प्रयत्न करत रहायचे, तसेच नामजपादी उपायही करायला हवेत. व्यष्टी साधनेच्या आढाव्यातून शिकून स्वतःत अंतर्मुखता येऊ लागते. ‘नकारात्मकता न्यून होणे किंवा अंतर्मुखता वाढणे’, हे सर्व ईश्वराच्या कृपेनेच होत असते.

 

२. दिवसभराचे नियोजन आणि स्वयंसूचना सत्रे केल्यानंतर मन स्थिर होऊ लागल्यावर ‘नेमकेपणाने काय करायचे आहे ?’, हे स्पष्ट होते आणि सध्या आपत्काळ असल्याने आपल्यासाठी एकेक क्षण महत्त्वाचा आहे !

कु. मेघा चव्हाण

एक साधक : माझ्यात आळस आहे. माझ्या मनात द्वंद आणि भीती असते. मी व्यवसाय वाढवू शकत नाही. मला साधनाही वाढवायची आहे. ‘व्यवसाय आणि साधना या दोन्ही गोष्टींचा समतोल (बॅलन्स) कसा राखायचा ?’, याविषयी मला समजत नाही. माझ्या मनात पुष्कळ विचार येत असतात.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : आपण दिवसभरातील २४ घंट्यांचे नियोजन करायला हवे. ‘वैयक्तिक गोष्टी, व्यवसाय आणि साधना’, हे सर्व कोणत्या वेळेत करायचे ?’, हे ठरवून नियोजन करायला हवे. तुम्ही तुमचा व्यष्टी साधनेचा आढावा घेणार्‍या सेवकाशी बोलून घ्या. नियोजन केल्यामुळे मनाला निश्चिंतता आल्यावर मनातील विचारांचे प्रमाण अल्प व्हायला साहाय्य होईल. मनातील विचार अल्प होण्यासाठी, तसेच ज्या कृती करायला, ज्या स्वभावदोषांमुळे आळस येतो, ते स्वभावदोष दूर होण्यासाठी स्वयंसूचना सत्रे करायला हवीत. त्यानंतर मन स्थिर होऊ लागल्यावर ‘नेमकेपणाने काय करायचे आहे ?’, हे स्पष्ट होईल. ‘आपल्याकडे वेळ आहे’, असे आपल्याला वाटत असते; पण सध्या आपत्काळ आहे. कधीही काहीही होऊ शकते. आपल्यासाठी एकेक क्षण महत्त्वाचा आहे.

 

३. शिकण्याच्या स्थितीत राहून साधना केल्यास प्रगती लवकर होते !

दुसरा साधक : मी संसार आणि काम यांत बुडून गेलो आहे. आश्रमात आल्यावर ‘मी लहान मुलगा असून गुरुकुलात आलो आहे’, असे मला वाटले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : तुम्हाला ‘गुरुकुलात आलो आहे’, असे वाटते’, हे चांगले आहे. गुरुकुलात कशासाठी जातात ? शिकण्यासाठीच ना ! ‘मला काही येत नाही. मला शिकायचे आहे’, असा विचार करून आणि स्वतःला जे येते, त्याचा अहंकार न बाळगता साधना केली, तरच लाभ होतो. ‘गुरु कुणाच्या तरी माध्यमातून शिकवतात’, असा भाव त्या माध्यमाप्रती असल्यास प्रगती लवकर होते.

 

४. गुरूंकडे काही मागण्याची आवश्यकता नसते, गुरु स्वतःहून देत असतात !

दुसरी साधिका : आम्ही इंदूर येथील गुरुपौर्णिमेसाठी गेलो होतो. तेव्हापासून आमच्या बर्‍याच अडचणी न्यून झाल्या. पूर्वी मी देवाकडे पुष्कळ मागत होते. आता मी काही मागत नाही. मी गुरुचरणी समर्पित होण्यासाठी प्रयत्न करते. ‘गुरूंकडे काही मागण्याची आवश्यकता नाही’, हे माझ्या लक्षात आले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : किती सुंदर सांगितले ! तुम्ही सर्व अल्प कालावधीत किती चांगले शिकलात ! आपण जसे आत्मसात् करू, तशी आपली साधना वाढत जाते. गुरूंकडे काही मागण्याची आवश्यकता नसते. गुरु देत असतात; मात्र आपण ते जाणू शकत नाही.

 

५. गुरु आपल्याला प्रारब्ध भोगण्यासाठी बळ देतात आणि पूर्वकर्र्मांविषयी विचार करण्यात वेळ न घालवता ‘क्रियमाण कर्म काय आहे’, ते पहायला हवे !

तिसरी साधिका : मी ‘गुरुच साधनेचे प्रयत्न करून घेतील, तसेच हे घरही गुरूंचे आहे’, असा भाव ठेवते. माझ्या साधनेच्या प्रयत्नांत मधून मधून खंड पडतो. माझ्या मनात पूर्वीच्या कर्मांविषयी भीती असते.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : साधनेने आपले प्रारब्ध न्यून होते, तसेच आपल्या पूर्वकर्मांमुळे आपल्यावर होणारा परिणामही न्यून होतो आणि आपण गुरुकृपेच्या छत्राखाली असल्यामुळे आपल्याला काही करावे लागत नाही. आपल्याला प्रारब्ध भोगण्यासाठी बळही गुरुच देतात. त्यामुळे पूर्वीच्या कर्मांविषयी विचार करण्यात वेळ घालवायला नको. ‘वर्तमानात माझे क्रियमाण काय आहे’, ते पहायला हवे.’

 

६. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करत राहिल्यावर काही कालावधीने परिणाम निश्चित दिसून येतो !

तिसरा साधक : माझ्या मनात अनेक विचार असल्यामुळे काही सुचत नाही. बुद्धीने अधिक विचार केला जातो. योग्य दिशेने विचार होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत ?

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : ‘विचारांना दिशा मिळणे, तसेच मन स्थिर होणे’, हे सर्व साधनेने साध्य होते. तुम्ही नामजप वाढवा आणि भावजागृतीचे प्रयत्न वाढवा. नामजप कधीपासून करता ?

तिसरा साधक : ७ वर्षांपासून. मी गुरूंच्या शोधात आहे. मनात गोंधळ चालू असतो. मी अनेक साधनेचे मार्ग पाहिले. ‘मला योग्य होईल’, असा साधनामार्ग निवडता येत नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : मनात पुष्कळ विचार असतील, तर योग्य निर्णय घेता येत नाही. सत्संगाच्या माध्यमातून प्रयत्न करत राहिल्यास अनुभूती येईल. ‘मला काय करायचे आहे ?’, तेथे लक्ष केंद्रित करून त्यावर प्रयत्न करायला हवेत. वेगवेगळ्या मार्गांनुसार साधना करत राहिल्यास गोंधळ वाढत राहील. ‘गुरुकृपायोगानुसार साधना’, हा सोपा मार्ग आहे. त्यानुसार कृती करून पहा. अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे. तुम्ही कृती केल्यावर तुम्हाला अनुभवता येईल. तुम्ही सातत्याने नामजप, स्वयंसूचना सत्र आदी साधनेचे प्रयत्न करत राहिलात, तर काही कालावधीने परिणाम निश्चित होईल. तुम्ही बुद्धीने प्रयत्न करत राहिलात, तर तुम्हाला अनुभवता येणार नाही.

 

७. व्यष्टी साधना नियमित केल्यास स्वतःतील चैतन्य वाढून सेवा आणि कार्यही चांगले होते !

चौथा साधक : माझ्यात हिंदुत्व आणण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत ? हिंदु राष्ट्रासाठी तन, मन आणि धन अर्पून सेवा करण्याची इच्छा आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : तुम्ही व्यष्टी साधनेचा आढावा नियमित दिल्यास तुमची व्यष्टी साधना चांगली होईल आणि तुमच्या साधनेचा पाया चांगला होईल. नंतर तुमची समष्टी साधनाही चांगली होईल. व्यष्टी साधनेमुळे स्वतःतील चैतन्य वाढल्याने सेवा आणि कार्यही चांगले होईल. तुमच्यात तळमळ चांगली आहे.

 

८. ‘रामराज्य’ येण्यासाठी स्वतःची साधना वाढवावी, तसेच योग्य वेळ आल्यावर रामराज्य येणारच आहे !

पाचवा साधक : याच जन्मात हिंदु राष्ट्र पहाण्याची इच्छा आहे. ‘रामराज्य यावे’, हे संस्थेचे ध्येय आहे, ते साध्य होतांना आता दिसत आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : ‘रामराज्य येणार’, याविषयी ऐकले किंवा वाचले असेल. ‘ते येणार आहे’, हे निश्चित आहे. ‘अधिकाधिक लोकांना धर्मशिक्षण देणे आणि साधना शिकवणे’, यासाठी आपण स्थुलातून जेवढे प्रयत्न करू शकतो, तेवढे प्रयत्न करायचेच आहेत. लोकांचा कल मायेकडे अधिक आहे. जे लोक राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी कार्य करू इच्छितात, त्यांच्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. जर आपण स्वत: साधना करत असू, तर परिणाम चांगला होईल. त्यासाठी साधना वाढवावी. योग्य वेळ आल्यावर रामराज्य येणारच आहे.

 

९. आश्रमात गुरूंचे वास्तव्य असल्यामुळे त्यांच्यातील चैतन्याने आश्रमात साधनेचे प्रयत्न सहजतेने होतात आणि चैतन्यात राहून केलेल्या प्रयत्नांचे फळ अधिक प्रमाणात मिळते !

सहावा साधक : काही साधकांची भाषा समजत नव्हती; मात्र त्यांच्यातील भाव लक्षात येत होता. (तेलुगु भाषिक साधक तेलुगु भाषेत बोलले. एका साधिकेने त्याचे भाषांतर करून सांगितले. तेव्हा त्यांची भाषा कळत नसूनही त्यांच्या बोलण्यातील भाव सत्संगातील सर्वांना जाणवला होता.) मी २ वेळा आश्रमात येऊन गेलो; पण येथून गेल्यावर ‘घरी प्रयत्नांत सातत्य राहिले नाही’, याची खंत वाटते. ‘आता साधनेचे प्रयत्न व्हावेत आणि मनातून जे वाटते, ते कृतीच्या स्तरावर यावे’, असे मला वाटते. आश्रमात सेवा आणि साधनेचे प्रयत्न सहजतेने होतात. बाहेर प्रयत्नपूर्वक करावे लागतात. स्वभावदोषांमुळे संघर्ष होत असतो.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : आपण आश्रमात जे सहजतेने साध्य करू शकतो, ते बाहेर साध्य होत नाही. आश्रमात गुरूंचे वास्तव्य असल्यामुळे आश्रमात चैतन्य आहे. हे चैतन्यच आपल्याला प्रयत्न करण्यासाठी बळ देते. या चैतन्यात राहून केलेल्या प्रयत्नांचे फळही अधिक प्रमाणात मिळते. संघर्ष पार केल्यावर ईश्वर भेटतो. संघर्ष होणे, हाही साधनेतीलच भाग आहे. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मनातील अडथळ्यांविषयी सांगून त्यावर मार्गदर्शन घ्या.

 

१०. शरिराने आश्रमात असाल; मात्र मनाने दुसरीकडे असल्यास आश्रमात असूनही चैतन्याचा लाभ होत नाही !

सातवा साधक : इतर साधकांनी विचारलेले प्रश्न आणि त्यावर तुम्ही केलेले मार्गदर्शन, यांतून मला बरेच शिकायला मिळाले.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ : संपूर्ण विश्वात हा आश्रम एक चैतन्याचा स्रोत आहे. याचा लाभ करून घ्यायला हवा. शरिराने आश्रमात असाल; पण मनाने दुसरीकडे असल्यास आश्रमात असूनही चैतन्याचा लाभ होत नाही. आपल्यात जेवढा देव आणि गुरु यांच्या प्रती भाव असेल, तेवढ्या प्रमाणात आपण चैतन्य ग्रहण करू शकतो. पृथ्वीतलावर कुठेही एवढे चैतन्य मिळणार नाही. आपण स्वबळावर साधनेचे प्रयत्न करत असतो. देवाच्या चैतन्यामुळे ‘आपल्यातील अनेक वर्षांपासून असलेल्या प्रबळ स्वभावदोषांची तीव्रता न्यून होणे, आपल्यात भाव निर्माण होणे, भाववृद्धी होणे, आध्यात्मिक त्रास न्यून होणे’, हे साध्य होत असते. सर्वांनी व्यष्टी साधनेचे आणि समष्टी साधनेचे प्रयत्न वाढवावे. शुद्ध मनाने प्रयत्न करायचे आहेत. ‘शुद्ध मनाने केलेली सेवा’, ही ईश्वरचरणी पोचते. आपण युद्धजन्य परिस्थितीविषयी वृत्तपत्रांतून वाचत आहोत. अनेक संतांनी सांगितले आहे, ‘‘तिसरे महायुद्ध होणार आहे.’’ त्यापूर्वीच आपण साधना वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. अध्यात्मात उन्नतांचे ऐकायचे आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जायचे असते.’

– संग्राहक : कु. मेघा चव्हाण, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.