१. ‘यावर्षी महालय श्राद्ध कधी करावे ?
१ अ. उत्तर : पितृपक्षाच्या काळात २७.९.२०२६ ते १०.१०.२०२६ या कालावधीत महालय श्राद्ध करू शकतो.
१. अगदी प्राचीन आणि तंतोतंत श्राद्धशास्त्राचा विचार केला, तर पितृपक्षात प्रतिदिन एक, अशी १५ महालय श्राद्धे पूर्वी केली जात असत. सध्याच्या काळात हे शक्य नसल्याने न्यूनतम आपल्या वडिलांची जी मृत्यू तिथी आहे, त्या पितृपक्षातील तिथीला महालय श्राद्ध केले जाते, उदा. वडिलांची मृत तिथी कार्तिक शुक्ल किंवा कृष्ण अष्टमी असल्यास महालय काळातील ‘अष्टमी’ या तिथीला श्राद्ध करावे.
२. वडिलांचे अपघाती निधन झाले असेल किंवा शस्त्राने आघात होऊन मृत्यू आला असेल, तर महालय श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी केले जाते.
३. असे असल्यामुळे ज्यांचा चतुर्दशीच्या दिवशी नैसर्गिक मृत्यू जरी झाला असेल, तरी त्यांचे श्राद्ध चतुर्दशीच्या दिवशी न करता अमावास्येच्या दिवशी करण्याची पद्धत आहे.
२. पितृपक्षात आमच्या ठरलेल्या तिथीला घरातील अडचणींमुळे किंवा सुवेर-सुतक इत्यादी आल्यामुळे महालय श्राद्ध करता आले नसेल, तर काय करावे ?

२ अ. उत्तर : आपल्या नियोजित तिथीला श्राद्ध करता आले नाही, तर सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करावे.
३. वडिलांच्या मृत्यूची तिथी ठाऊक नसेल, तर श्राद्ध कधी करावे ?
३ अ. उत्तर : सर्वपित्री अमावास्येच्या दिवशी श्राद्ध करावे.
४. आम्ही वैष्णव आहोत. आमच्याकडे एकादशीला सगळ्यांचा उपवास असतो; मात्र वडिलांची मृत्यू तिथी एकादशीच आहे, तर श्राद्ध कधी करावे ?
४ अ. उत्तर : अशा प्रसंगी द्वादशीच्या दिवशी अथवा सर्वपित्री अमावास्येला श्राद्ध करता येते.
५. आम्ही आई-वडिलांचे श्राद्ध करतोच, मग महालय श्राद्ध करण्याची आवश्यकता काय ?
५ अ. उत्तर : आपल्याला वर्षात एकूण ९६ श्राद्धे करण्यास सांगितलेली आहेत. विस्तारभयाने ती या लेखात देणे शक्य नाही; मात्र प्रत्येकाने न्यूनतम प्रत्येक वर्षी आपल्या आई आणि वडील यांच्या मृत तिथीला ‘सांवत्सरिक श्राद्ध’, म्हणजे ‘वर्षश्राद्ध’ अन् पितृपक्षाच्या काळात ‘महालय श्राद्ध’, अशी तीन श्राद्धे करणे अत्यंत आवश्यक आहे.
६. महालय श्राद्धामध्ये कोणत्या पितरांसाठी अन्न, पिंड आणि उदक (पाणी) दिले जाते ?
६ अ. उत्तर : वडील-आजोबा-पणजोबा, आई-आजी-पणजी, आईचे वडील-आजोबा-पणजोबा, आईची आई-आजी-पणजी, सावत्र आई, पत्नी, मुलगा, मुलगी, काका, मामा, आत्या, मावशी, सासू-सासरे, शिष्य, गुरु, शिक्षण देणारे विद्यागुरु आणि आध्यात्मिक ज्ञान देणारे मोक्षगुरु यांना महालय श्राद्धात अन्न, पिंड अन् उदक (पाणी) दिले जाते.
त्याचप्रमाणे महालय श्राद्धामध्ये ४ धर्मपिंडे देणे महत्त्वाचे असते. ‘आपल्या पूर्वज ऋषिमुनींनी समाज आणि समाजऋण यांचा किती बारकाईने विचार केला आहे ?’, हे यातून लक्षात येते. ही धर्मपिंडे पुढीलप्रमाणे आहेत.
१. आब्रह्मणो ये पितृवंशजाता मातुस्तथा वंशभवा मदीयाः ।
वंशद्वयेस्मिन्ममदासभूता भृत्यास्तथैवाश्रितसेवकाश्च ।।
मित्राणि सख्यः पशवश्च वृक्षा दृष्टाश्च पृष्टाश्च कृतोपकाराः ।
जन्मान्तरे ये मम सङ्गताश्च तेभ्यः स्वधा पिण्डमहं ददामि ।।
अर्थ : सृष्टीकर्ता ब्रह्मदेवाच्या काळापासून माझे आई आणि वडील यांच्या कुळात जे लोक जन्माला आले असतील, तसेच या दोन्ही कुळांतील माझे जन्मांतरीचे अथवा या जन्मीचे कुणी दास, आश्रित किंवा सेवक, मित्र, सखे-सोयरे, पशू, झाडे, दृश्य स्वरूपात आलेले, स्पर्शरूपात आलेले, माझ्यावर निरनिराळे उपकार केलेले, अन्य जन्मांमध्ये जे माझ्या समवेत होते, त्या सर्वांना मी पिंड देतो.
२. पितृवंशे मृता ये च मातृवंशे तथैव च ।
गुरुश्वशुरबन्धूनां ये चान्ये बान्धवा मृताः ।।
ये मे कुले लुप्तपिण्डाः पुत्रदारविवर्जिताः ।
क्रियालोपगताश्चैव जात्यन्धाः पङ्गवस्तथा ।।
विरूपा आमगर्भाश्च ज्ञाताज्ञाताः कुले मम ।
धर्मपिण्डो मया दत्तो ह्यक्षय्यमुपतिष्ठतु ।।
अर्थ : माझ्या पितृकुळातील अथवा मातृकुळातील समस्त व्यक्ती, तसेच माझे गुरु, सासरे, बंधू आणि त्यांचे मृत आप्तस्वकीय, तसेच माझ्या कुळातील ज्या व्यक्ती पत्नी अथवा पुत्र नसल्याने पिंड अन् उदक यांच्यापासून वंचित राहिल्या असतील, तसेच ज्यांच्या श्राद्ध इत्यादी क्रियांचा लोप झाला असेल त्यांना, तसेच जे जन्मांध, पांगळे किंवा विरूप आहेत, जे गर्भ गर्भाशयातून अपक्व स्थितीत गळून पडले असतील, तसेच ज्ञात-अज्ञात बांधव असतील, त्या सर्वांना मी धर्मपिंड देतो.
३. असिपत्रवने घोरे कुम्भीपाके च ये गताः ।
तेषामुद्धारणार्थाय इमं पिण्डं ददाम्यहम् ।।
अर्थ : जे ‘असिपत्र’ आणि ‘कुंभीपाक’ नावाच्या नरकात गेले असतील, त्यांच्या उद्धारासाठी मी हा पिंड देतो.
४. उच्छिन्नकुलवंशानां येषां दाता कुले न हि ।
धर्मपिण्डो मया दत्तो ह्यक्षय्यमुपतिष्ठतु ।।
अर्थ : ज्यांच्या संपूर्ण कुळाचा नाश झाल्यामुळे त्यांना कुणी पिंड देत नाही, त्या सर्वांना मी धर्मपिंड देतो.’
– श्री. अमर जोशी, सनातन वेदपाठशाळा, गोवा. (२३.९.२०२६)

‘कोरोना’ महामारीच्या पार्श्वभूमीवर शास्त्र विधानानुसार पुढीलप्रमाणे श्राद्धविधी करा !
श्राद्ध संबंधित प्रश्न आणि त्यांची उत्तरे
दहाव्या दिवशी पिंडाला कावळा शिवणे महत्त्वाचे का समजले जाते ?
श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली हे कसे ओळखावे ?
‘वर्षश्राद्ध’ आणि ‘पितृपक्षातील श्राद्ध’ असे वर्षातून दोनदा श्राद्ध का करावे ?
श्राद्ध करण्यात अडचणी आल्यास त्या दूर करण्याचे मार्ग