‘डीजे’विषयी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळून गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि मांगल्य टिकवा ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

मुंबई – आज सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप विकृत होत असून ‘डीजे’ (मोठी संगीत यंत्रणा) संस्कृतीमुळे या उत्सवाचा मूळ आध्यात्मिक उद्देशच नष्ट होत आहे, ही अत्यंत खेदजनक गोष्ट आहे. या संदर्भात सनातन संस्थेची भूमिका राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे. यात ‘डीजे’विषयी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले नियम पाळून गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि मांगल्य टिकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की,

१. उत्सवाची सनातन परंपरा ही भक्तीमय आणि सात्त्विक वातावरण निर्माण करण्याची आहे. आपल्या सनातन धर्मात कोणत्याही देवतेची उपासना, नामजप, भजन, कीर्तन आणि पारंपरिक वाद्यांचा गजर (जसे मृदंग, टाळ, शंख, झांज) यांद्वारे वातावरणात सात्त्विकता निर्माण होते. यामुळे देवतेचे तत्त्व आकृष्ट होते आणि त्याचा लाभ भक्तांना होतो; मात्र आज उत्सवात डीजे आणून केवळ गोंगाट निर्माण केला जात आहे, ज्यामुळे पावित्र्य नष्ट होऊन देवतेचा अवमान होतो.

२. डीजेमुळे होणारे ध्वनीप्रदूषण आणि तमोगुणाची वाढ

* शारीरिक आणि मानसिक त्रास : डीजेच्या कानठळ्या बसवणार्‍या आवाजामुळे लहान मुले, वृद्ध, गरोदर महिला आणि रुग्ण यांचे आरोग्य धोक्यात येते. हृदयाचे ठोके वाढणे, बहिरेपणा येणे अशा अनेक व्याधींना नागरिकांना सामोरे जावे लागते.

* आध्यात्मिक हानी : डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे आणि ध्वनीप्रदूषणामुळे रज-तम लहरींचे प्रक्षेपण होते. आध्यात्मिकदृष्ट्या वातावरणातील मांगल्य नाहीसे होऊन तमोगुण वाढीस लागतो, ज्यामुळे उपस्थितांमध्ये मनात अशांतता आणि उग्रता निर्माण होते.

३. अश्लील गाणी आणि विकृत नृत्य यांमुळे भरकटलेला उत्सवाचा उद्देश

डीजेवर श्री गणेशाची भक्तीगीते वाजवण्याऐवजी चित्रपटांतील द्विअर्थी, कर्णकर्कश आणि असात्त्विक गाणी लावली जातात. या गाण्यांच्या तालावर मद्यधुंद होऊन काही कार्यकर्ते बीभत्स आणि हिडीस नृत्य करतांना दिसतात. अशा प्रकारांमुळे गणेशोत्सवाचे पावित्र्य पूर्णपणे लयाला गेले आहे. ही परिस्थिती पाहून सुसंस्कृत, भाविक आणि महिला वर्ग मिरवणुकांमध्ये सहभागी न होता उत्सवांपासून दूर रहाणे पसंत करत आहे. लोकांना एकत्र आणणारा उत्सव, लोकांना दूर करणारा ठरू नये.

सनातन संस्थेचे आवाहन

१. शासनाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमांचे पालन न करणार्‍या डीजेंवर पूर्ण बंदी घालावी

शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करून सार्वजनिक गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणार्‍या ‘डीजे’च्या वापरावर संपूर्ण बंदी घालावी. नियमांचे उल्लंघन करणार्‍या मंडळांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.

२. गणेशोत्सव मंडळांना आवाहन

सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्सवाचे व्यापारीकरण आणि विकृतीकरण थांबवून पारंपरिक वाद्ये, भजन आणि आरती यांना प्राधान्य द्यावे. डीजेवर होणारा अफाट खर्च थांबवून तो समाजकार्य, धर्मशिक्षण आणि गरजूंच्या सेवेसाठी वापरावा.

३. भाविकांना आवाहन

गणेशभक्तांनी अशा अपप्रकारांना मूकसंमती न देता सात्त्विक आणि शास्त्रोक्त पद्धतीने श्रींची आराधना व्हावी यासाठी डीजे च्या माध्यमातून ध्वनीप्रदूषण करणार्‍या उत्सव मंडळांना विरोध करावा.