रोगनिवारणासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे महत्त्व

रोगनिवारण्यासाठी शिव-स्वरोदयशास्त्राचे (शिवाने सांगितलेले स्वराचे, म्हणजे श्वासाच्या नियमनावरील शास्त्राचे) महत्त्व येथे पाहूया.

 

१. विकार झाला असता
स्वर (श्वास) पालटल्याने त्या विकाराला असणारी
शरिरातील पूरक स्थिती पालटून ती विरुद्ध झाल्याने विकार बरा होणे

P_Mukul_Gadgil
पू. डॉ. मुकुल गाडगीळ

निरोगी मनुष्याच्या श्वासोच्छ्वासामध्ये दिवसभरातील २४ घंट्यांत एक घंटा सूर्यस्वर (उजव्या नाकपुडीने श्वासोच्छ्वास), त्यानंतर पुढील एक घंटा चंद्रस्वर (डाव्या नाकपुडीने श्वासोच्छ्वास) आणि त्यानंतर पुन्हा एक घंटा सूर्यस्वर असे चक्र चालू असते. जेव्हा सूर्यस्वराचा चंद्रस्वर होतो, तेव्हा तो पालट होत असतांना मधली २ – ४ मिनिटे सुषुम्ना स्वर, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांतून श्वासोच्छ्वास चालू असतो. या चक्रामध्ये पालट होऊन मनुष्याचा स्वर अयोग्य चालत असल्यास, म्हणजे सूर्यस्वराच्या ऐवजी चंद्रस्वर किंवा चंद्रस्वराच्या ऐवजी सूर्यस्वर चालत असल्यास त्याला विकार होतो, असे शिव-स्वरोदयशास्त्र (शिवाने सांगितलेले शास्त्र) सांगते. तेव्हा मनुष्याचा तो स्वर तो विकार होण्याला पूरक असतो.

त्या वेळी त्या विकारावर उपाय म्हणून तो स्वर पालटल्यास, म्हणजे नाडीद्वारे चाललेले ऊर्जावहनाचे स्वरूप पालटल्यास त्या विकाराला असणारी पूरक स्थिती पालटून ती विरुद्ध होते. त्यामुळे आपोआपच तो विकार न्यून होत जातो. चंद्रस्वरामुळे चंद्रनाडीद्वारे शीतल प्राणशक्तीप्रवाह आणि सूर्यस्वरामुळे सूर्यनाडीद्वारे उष्ण प्राणशक्तीप्रवाह मिळतो. अशा प्रकारे श्वासोच्छ्वासावर, म्हणजे स्वरावर नियंत्रण ठेवून विकाराला बरे करता येते.

 

२. चंद्रस्वर (चंद्रनाडी) आणि सूर्यस्वर (सूर्यनाडी)
या सूक्ष्मातील संकल्पना असल्याने 
त्यांच्याद्वारे
विकार बरे होत असल्याविषयीची माहिती वैद्यकशास्त्राला नसणे

चंद्रस्वर आणि सूर्यस्वर म्हणजे अनुक्रमे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांतून वहाणारा श्‍वासाचा प्रवाह. नाड्या या सूक्ष्म आहेत. योगशास्त्रानुसार त्यांची संकल्पना आहे. याउलट वैद्यकशास्त्र प्रत्यक्ष दिसणार्‍या शरीरशास्त्रावर आधारलेले असल्याने त्यामध्ये नाडी ही संकल्पना समाविष्ट केलेली नाही. त्यामध्ये केवळ आपण कधी डाव्या नाकपुडीने श्‍वास घेतो, तर कधी उजव्या नाकपुडीने श्‍वास घेतो, एवढेच अंतर्भूत आहे. त्यामुळे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्र या दोन्ही शास्त्रांमध्ये चंद्रस्वर किंवा सूर्यस्वर यांचा विकार बरे होण्याच्या दृष्टीने काहीच विचार झालेला नाही.

 

३. रोगनिवारणासाठी ईश्वराने आपल्या शरिरातच
दिलेल्या 
वरदानांचा लाभ स्वरोदयशास्त्रात दिल्याप्रमाणे करून घ्या !

खरे पाहिले, तर ईश्वराने मनुष्याची निर्मिती किती उत्कृष्ट आणि परिपूर्ण केली आहे, हे लक्षात येते. त्याने शरिरात चंद्रनाडी, सूर्यनाडी आणि सुषुम्ना नाडी या मुख्य नाड्या, तसेच सर्व शरीरभर जाणार्‍या इतर सहस्रो नाड्या निर्माण केल्या अन् त्यांतून प्रत्येक इंद्रियाला प्राणशक्ती, म्हणजे ऊर्जाप्रवाह मिळण्याची सोय केली. तसेच शरिरात रोग निर्माणच होऊ नये, यासाठी शीतल आणि उष्ण यांपैकी हवा तो शक्तीप्रवाह मिळण्याकरता अनुक्रमे चंद्रनाडी आणि सूर्यनाडी यांची सोय केली. त्यांशिवाय आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी सुषुम्ना नाडी निर्माण केली. ईश्‍वराच्या या वरदानांची अनुभूती सत्ययुगाच्या प्रारंभी सर्वच जण घेत होते. तेव्हा सर्व जण सदाचारी आणि निसर्ग अन् भगवंत यांच्या नियमांचे पालन (धर्माचरण) करणारे होते. त्यामुळे सर्व जण बलवान, शक्तीमान, सुदृढ आणि ज्ञानी होते. रोग म्हणजे काय, हे त्यांना माहितीही नव्हते. त्यानंतर पुढे जसा काळ गेला, तसा पुढील प्रत्येक युगात मनुष्याची अधिकाधिक अधोगती होत गेली. ईश्‍वराने त्याच्या शरिरातच दिलेल्या वरदानांची जाणीव त्याला राहिली नाही आणि तो बाह्य गोष्टींकडे, म्हणजे मायेकडे आकर्षिला गेला. त्यामुळे त्याचे अधःपतन झाले, तसेच त्याचे आरोग्यही बिघडत गेले. स्वरोदयशास्त्राद्वारे ईश्‍वराच्या या वरदानांची जाणीव साक्षात शिवाने आपल्याला करून दिली आहे. आपण त्याचा लाभ करून घेऊया.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.२.२०१६)

 

क्षमा मागतांना उजव्या हाताने डावा कान
आणि डाव्या हाताने उजवा कान पकडून 
क्षमा मागण्याचे
महत्त्व आणि ते शिव-स्वरोदयशास्त्रावरच आधारलेले असणे

एखादी चूक झाल्यावर क्षमा मागायची झाल्यास साधक दोन्ही कान पकडून (उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान पकडून) क्षमा मागतात. कान, म्हणजे कानाची पाळी पकडल्याने त्या कानाच्या बाजूची नाडी (डावा कान असेल, तर चंद्रनाडी आणि उजवा कान असेल, तर सूर्यनाडी), म्हणजे त्या बाजूच्या नाकपुडीने श्‍वासोच्छ्वास चालू होतो. दोन्ही कान पकडल्यास सुषुम्ना नाडी, म्हणजे दोन्ही नाकपुड्यांनी श्‍वासोच्छ्वास चालू होतो. सुषुम्ना नाडी ही आध्यात्मिक स्तराची नाडी आहे. ती चालू असणे म्हणजे आध्यात्मिक उन्नतीचे लक्षण आहे. त्या नाडीने अंतर्मुखता प्राप्त होत असल्याने क्षमा मागतांना दोन्ही कान पकडण्याचे महत्त्व आहे. यामध्ये उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान पकडण्याचे कारण म्हणजे डावी बाजू ही निर्गुण आणि उजवी बाजू ही सगुण असल्याने डाव्या कानाला उजव्या हाताने पकडल्यास निर्गुणाला सगुणाचे साहाय्य मिळते. त्याचप्रमाणे उजव्या कानाला डाव्या हाताने पकडल्यास सगुणाला निर्गुणाचे साहाय्य मिळते. त्यामुळे ती ती नाडी जलद गतीने कार्यरत होते, असे जाणवले. प्रत्यक्षातही डाव्या नाकपुडीने श्‍वास चालू नसतांना डाव्या कानाला डाव्या हाताने पकडल्यास डावी नाकपुडी चालू व्हायला पुष्कळ वेळ लागला. हेच डाव्या कानाला उजव्या हाताने पकडल्यावर डावी नाकपुडी लगेच चालू झाली, असे लक्षात आले. हे शिव-स्वरोदयशास्त्रावरच (शिवाने सांगितलेले स्वराच्या, म्हणजे श्‍वासाच्या नियमनावरील शास्त्रावर) आधारलेले आहे, हे कळते.

– (पू.) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२१.२.२०१६)