शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’

१. ‘बिंदूदाबन’ – प्राथमिक ओळख

सध्याच्या कलियुगातील रज-तमात्मक वातावरणात जन्मलेला प्रत्येक जीव काही ना काहीतरी विकार घेऊनच जन्माला आलेला असतो. ‘विकार दूर करण्याच्या ‘अ‍ॅलोपॅथी’, ‘होमिओपॅथी’ यांसारख्या आधुनिक आणि आयुर्वेद या उपायपद्धती प्रचलित असतांना ‘बिंदूदाबन’ या उपायपद्धतीची आवश्यकता काय’, असा प्रश्न कोणाला पडू शकतो. ‘जुने ते सोने’ या म्हणीनुसार प्रज्ञावंत ऋषीमुनींनी शोधलेली ‘बिंदूदाबन’ ही अतिप्राचीन उपायपद्धत महत्त्वाची आहे; कारण तिला अध्यात्मशास्त्रीय आधार आहे. शरिरातील चेतनाशक्तीच्या प्रवाहांचे नियंत्रण करणारे शरिरावरील विशिष्ट बिंदू दाबल्यामुळे चेतनाशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर होऊन विकारांवर मात करता येणे, हे ‘बिंदूदाबन’ उपायपद्धतीचे सूत्र आहे. या पद्धतीमुळे त्या त्या अवयवात चेतना निर्माण होऊन त्या त्या अवयवाचीच क्षमता वाढत असल्याने ही पद्धत अधिक मूलगामी आणि परिणामकारक ठरते. व्यय नसलेल्या (बिनखर्चिक) आणि स्वतःच स्वतःवर उपाय करता येणाया बिंदूदाबन उपायपद्धतीचा अंगिकार करून दैनंदिन जीवनात तोंड द्याव्या लागणार्‍या अनेक रोगांपासून स्वतःला दूर ठेवणे सहज शक्य होते. तसेच जीवनात घडणार्‍या काही प्रसंगांत वैद्यकीय उपायांची तात्काळ निकड भासते किंवा काही प्रसंगांत डॉक्टर आणि औषधे दोन्ही उपलब्ध नसतात, अशा वेळी ही पद्धत लहान-मोठ्या सर्वांसाठीच संजीवनी ठरते.

bindu_daban
अ.  ‘आनंदप्राप्ती’ हेच मानवी जीवनाचे उद्दिष्ट असणे

सर्वोच्च सुख सातत्याने मिळावे, यासाठी मानव प्रयत्न करत असतो. त्या सुखाला ‘आनंद’ म्हणतात आणि त्यासाठी करावयाच्या प्रयत्नांना ‘साधना’ असे म्हणतात. यासाठीचे योग्य मार्गदर्शन प्रथम संत आणि नंतर गुरु करू शकतात.

आ.  मानवी देहाचे महत्त्व

मानवाचा देह हे त्याचे साधना करण्याचे माध्यम आहे. मानवाच्या देहाचे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर अस्तित्व आहे. स्थूल देह नष्ट झाला, तरी सूक्ष्म-देह तसाच रहातो आणि त्याचे कार्यही चालूच रहाते.

 

२. बिंदूदाबन उपायांची आपत्काळात जाणवणारी अत्यावश्यकता

कलियुगात रज-तमात्मक प्रभावाचा लय हा ठरलेला असल्याने सर्वच जनांना आपत्काल आहे. हा आपत्काल जितका भयावह तितकाच दुःखदायीही आहे. अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितल्याप्रमाणे विश्वावर ज्या वेळी भीषण संकटे येण्यास आरंभ होईल, त्या वेळी येणार्‍या प्रत्येक शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आपत्तीशी स्वयंपूर्ण रीतीने लढणेच आवश्यक आहे; कारण या काळात महाभयंकर विनाशाला आरंभ होणार असल्याने कोणत्याच गोष्टीचे सुबत्तादर्शक प्राबल्य सर्वसामान्य जिवांना मिळणार नाही. अशा वेळी आपत्काळात बिंदूदाबन ही पद्धत अत्यंत गुणकारी आणि अतिशय आवश्यक बनणार आहे. बिंदूदाबनाचा वापर ही येणार्‍या काळाची आवश्यकता आहे. ती जाणून प्रत्येकानेच स्वयंपूर्ण बनवणार्‍या या उपायपद्धतीचा अभ्यास आणि वापर केला पाहिजे.

 

३. ‘बिंदूदाबन उपाय’ याचा अर्थ

A2_BW

शरिरातील विशिष्ट बिंदूंद्वारे आंतरिक अवयव कार्यान्वित करण्यासाठी अनेक उपचारपद्धती प्रचलित आहेत, उदा. बिंदूदाबन (अ‍ॅक्युप्रेशर), बिंदूछेदन (अ‍ॅक्युपंक्चर), शीआत्सु, झोन थेरपी, रिफ्लेक्सॉलॉजी इत्यादी. यांपैकी बिंदूदाबन ही सर्वांत जुनी आणि सोपी उपचारपद्धत आहे.

शरिरावरील विशिष्ट बिंदूंवर दाब देऊन आंतरिक अवयव कार्यान्वित करणे आणि त्याद्वारे व्यक्तीचे स्वास्थ्य सुधारणे, तसेच देहातील त्या त्या भागाशी संलग्न शक्तीबिंदूंवर दाब देणे, म्हणजे ‘बिंदूदाबन उपाय’ (अ‍ॅक्युप्रेशर).

बिंदू हे शिवरूपी लयशक्तीचे प्रतीक असल्याने देहातील त्या त्या अवयवाशी संबंधित एकत्रित ऊर्जारूपी चेतनेचे घनीकरण झालेल्या बिंदूरूपी ठिकाणाला आवश्यक त्या प्रमाणात दाबन देऊन व्याधीवर (आजारावर) मात करणे, म्हणजेच बिंदूदाबन.

बिंदूदाबनाचे उपाय म्हणजे हातांचा वापर करून सगुण-निर्गुण स्तरावरील पंचतत्त्वांचा आधार घेऊन केलेले उपाय. येथे प्रत्यक्ष स्तरावर देहरूपी सगुण आणि अप्रत्यक्ष स्तरावर दाबनाचा आध्यात्मिक पाय यांचा वापर केलेला असल्यामुळे हे उपाय सगुण-निर्गुण स्तरावरील जाणवतात.

अ. मर्मस्थळे – मानवाच्या शरिरातील नाजूक आणि महत्त्वाची स्थाने

मानवाच्या शरिरातील काही अवयव आणि शरिराचा काही भाग पुष्कळ नाजूक अन् महत्त्वाचा असतो. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आघात झाला असता व्यक्तीला गंभीर दुखापत होऊ शकते; व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते, ती नित्याची (कायमची) अधू होऊ शकते किंवा मृत होऊ शकते. शरीरातील अशी स्थाने ‘मर्मस्थळे’ या नावाने ओळखली जातात. ती ‘मर्मस्थळे’ म्हणजेच बिंदूदाबनाची ठिकाणे होत. सहस्रो वर्षांपूर्वीपासूनच ऋषीमुनींना या मर्मस्थळांचे ज्ञान अवगत होते. त्यांनी प्रत्येक मर्मस्थळाला विशिष्ट नावही दिले आहे. आयुर्वेदातही मानवाच्या शरिरावरील महत्त्वाचे बिंदू आणि नाजूक स्थाने यांचे सविस्तर विवेचन दिलेले आढळते.

आ. मर्मस्थळांच्या माहितीचा उपयोग
स्वसंरक्षणविषयक युद्धप्रकारात केला जाणे

कोणते बिंदू (मर्मस्थळे) दाबल्यावर माणसाला बेशुद्ध करता येते किंवा माणूस मरू शकतो, याची माहिती चीनमधील लोकांना ज्ञात आहे. कोरिया आणि जपान येथील लोक ज्यूडो, कराटे यांसारख्या स्वसंरक्षणविषयक युद्धप्रकारात या माहितीचा उपयोगही करतात.

 

४. मानवी जीवनातील शुद्धता आणि बिंदूदाबन उपाय

अ. बिंदूदाबन म्हणजे ऋषीमुनींनी
देहशुद्धीसाठी शोधलेली एक उपायपद्धत

प्राचीन ऋषीमुनींनी साधनेद्वारे मानवी देहाला समजून घेऊन हा देह साधनेकरता उत्तम स्थितीत राखण्यासाठी, देहशुद्धीसाठी सांगितलेली ‘बिंदूदाबन’ ही एक उपायपद्धत आहे.

आ. सात्त्विक मन आणि बुद्धी यांच्यामुळे, तसेच बिंदूदाबन
पद्धतीने मानवी जीवनातील शुद्धता राखण्यास साहाय्य होणे

मन आणि बुद्धी यांचा उपयोग करून मानवी देहाला आपण शुद्ध ठेवू शकतो. ही कला म्हणजेच मानवाची आदर्श जीवनपद्धत आणि दिनचर्याच होय. हिच्यामध्ये पालट (बदल) झाल्यास शुद्धता घटण्यास प्रारंभ होतो. बिंदूदाबन पद्धतीने ही शुद्धता राखण्यात साहाय्य होते.

इ. चेतनाबिंदूवर दाब दिल्याने होणारी प्रक्रिया

चेतनाबिंदू हा केवळ शारीरिक त्रास दूर करण्यासाठी कारणीभूत असतो असे नाही, तर हा बिंदू अधिकाधिक चैतन्य ग्रहण करून ते पूर्ण शरिरात पसरवतो. या बिंदूवर दाब दिल्याने शक्तीची सत्त्वगुणी कंपने निर्माण होतात. या कंपनांचे चैतन्यात रूपांतर होते. हे चैतन्य पूर्ण देहात भ्रमण करू लागते. त्यामुळे वाईट शक्तींनी देहात निर्माण केलेली स्थाने विघटित होतात आणि कालांतराने देहात सर्वत्र चैतन्य पसरते.

प्रकृती आली की विकृती ही येतेच. विकृती जिवातील पृथ्वी आणि आप यांच्या कार्यकारी संयोगात्मक कार्यात बाधा आणते. ही बाधा बिंदूदाबनाच्या साहाय्याने देहातील चेतना प्रवाही रूपात सुरळीत करून दूर केली जाते.

चेतनाबिंदूवर दाब दिल्याने शरिराला होणारे सूक्ष्मातील लाभ

१. श्वसनमार्गातील अडथळे दूर होणे आणि शरिरात चैतन्य पसरणे

२. रक्तवाहिन्यांतून हृदय, यकृत, मूत्राशय आणि अन्य अवयव यांत चैतन्य पसरणे

३. प्राणशक्ती मिळणे

चेतनाबिंदूवर दाब दिल्याने मनाला होणारे सूक्ष्मातील लाभ

१. मन स्थिर होऊन बाहेरून येणारे सात्त्विक विचार ग्रहण होणे

२. घडणार्‍या घटनांना सकारात्मक प्रतिसाद देणे

३. मनात आनंदाचे तरंग निर्माण होणे

ई. बिंदूदाबन म्हणजे कुंडलिनीशक्तीच्या
प्रवाहातील अडथळे दूर करण्याची एक पद्धत 

मानवी देहातील चैतन्यशक्ती एका मुख्य प्रवाहातून वहाते. या मुख्य प्रवाहासह आणखी दोन प्रवाहांतूनही ही शक्ती प्रवाहित होते. त्यानंतर ७२,००० नाड्यांचे जाळेच सर्व शरीरभर पसरते. ही चैतन्यशक्ती स्थूल डोळ्यांनी दिसत नाही आणि तिचे मोजमापही करता येत नाही. या चैतन्यशक्तीलाच योगभाषेत ‘कुंडलिनी’ या नावाने ओळखले जाते. या शक्तीच्या मुख्य प्रवाहाला ‘सुषुम्ना’, तर दोन प्रवाहांना ‘इडा’ आणि ‘पिंगळा’ या नावांनी ओळखले जाते.

मानवी देहातील विशिष्ट सात ठिकाणी या चैतन्यशक्तीचा संचय होतो. त्यामुळे ही स्थाने म्हणजे शक्तीकेंद्रेच आहेत. या शक्तीकेंद्रांना योगभाषेत ‘कुंडलिनीचक्रे’ असे म्हटले जाते. या चक्रांचा मानवी देहातील अवयवांशी संबंध असतो. या संबंधामुळे मानवाला उन्नत होता येते. चक्रांच्या कार्यात येणार्‍या अडथळ्यांमुळे अशुद्धता निर्माण होते. खरे तर चक्रे, मन आणि बुद्धी एकमेकांवर अवलंबून आहेत. कुंडलिनीतील चक्रांत निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मानवातील गुण-दोषांचे प्रमाण पालटते, तर मानवाच्या बुद्धीपुरस्सर वागण्याचा परिणाम होऊन त्याच्यातील गुण-दोषांचे प्रमाण पालटून चक्रांतील अडथळे दूर करता येतात. बिंदूदाबन पद्धतीने मानवी देहातील चैतन्यशक्तीचे कार्य सुरळीत चालू रहाण्यात येणारे अडथळे दूर करता येतात; म्हणजेच कुंडलिनीशक्तीच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्याची ही एक पद्धत आहे.

 

५. इतिहास

भारतात ५,००० वर्षांपूर्वीपासून बिंदूदाबन उपायपद्धत प्रचलित असल्याचा सुश्रुत संहितेत उल्लेख आहे. सोळाव्या शतकात बिंदूछेदन उपायपद्धतीची जननी असलेल्या या उपायपद्धतीची माहिती अमेरिकेतील ‘रेड इंडियन’ या लोकांना होती. दुर्दैवाने उपायांच्या या प्राचीन पद्धतीचे योग्य रीतीने जतन केले गेले नाही.

कालांतराने बिंदूछेदनाच्या रूपात ही पद्धत श्रीलंकेत पोहोचली. तेथील बौद्ध साधू आणि प्रवासी यांनी तिला चीन आणि जपान या देशांत पोहोचवले. चीनमध्ये या उपायपद्धतीचे महत्त्व जाणून तिच्यावर संशोधन करण्यात आले. त्यामुळे तेथे या उपायपद्धतीचा विकास आणि प्रसार झाला. २० व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत जनमानसाला विसर पडलेल्या बिंदूदाबन आणि बिंदूछेदन या शास्त्रांचे पुनरुज्जीवन चीनचे द्रष्टे राजकीय नेते अन् कट्टर साम्यवादी माओ-त्से-तुंग यांनी १९४९ मध्ये केले. त्यानंतर १९७१ सालापर्यंत या शास्त्राचा चीनमध्ये प्रसार होऊन ते प्रचलित झाले. चीन, जपान आणि कोरिया या देशांमध्ये ‘बिंदूदाबन’ (अ‍ॅक्युप्रेशर) अन् ‘बिंदूछेदन’ (अ‍ॅक्युपंक्चर) या उपायपद्धतींना मान्यता देण्यात आली. इतकेच नव्हे, तर या उपायपद्धतींना अधिकृत उपायपद्धतींचा स्तरही (दर्जाही) देण्यात आला असून तेथील रुग्णालयांतून या उपायपद्धतींचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येत आहे.

चीनमधून ही उपायपद्धत अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रात पोहोचली आणि नंतर तिचा प्रसार जगात सगळीकडे झपाट्याने झाला. बिंदूदाबन आणि बिंदूछेदन या शास्त्रांना ‘विश्व आरोग्य संस्थेने’ (W.H.O. ने) मान्यता दिली आहे.

संदर्भ : सनातन प्रकाशित ग्रंथ ‘शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी ‘बिंदूदाबन’