पिप – PIP (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केलेल्या वैज्ञानिक चाचणीतील पिप छायाचित्रे आणि निरीक्षणे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे

यू.टी.एस्. – UTS (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर) या उपकरणाची माहिती वाचण्यासाठी UTS यावर Click करा. 

१. पिप तंत्रज्ञानाची ओळख

१ अ. चाचणीतील घटकांची आध्यात्मिक स्तरावरील वैशिष्ट्ये वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारे अभ्यासण्याचा हेतू

एखाद्या घटकात (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांत) किती टक्के सकारात्मक स्पंदने आहेत ? तो घटक सात्त्विक आहे कि नाही किंवा तो घटक आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक आहे कि नाही ?, हे सांगण्यासाठी सूक्ष्मातील कळणे आवश्यक असते. उच्च पातळीचे संत सूक्ष्मातील जाणू शकत असल्याने ते प्रत्येक घटकातील स्पंदनांचे अचूक निदान करू शकतात. भाविक आणि साधक, संतांनी सांगितलेले शब्द प्रमाण मानून त्यावर श्रद्धा ठेवतात; परंतु बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र शब्दप्रमाण नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण हवे असते. त्यांना प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक उपकरण किंवा तंत्रज्ञान याद्वारेे सिद्ध करून दाखवली असेल, तरच ती खरी वाटते.

१ आ. पिप तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घटकांची सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा असणे

या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या घटकाची (वस्तू, वास्तू, प्राणी आणि व्यक्ती यांची) सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय प्रणालीला व्हिडीओ कॅमेर्‍याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू, प्राणी किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे.

 

२. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता

अ. या चाचणीची पिप छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा चाचणीतील घटकाच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.

आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.

 

३. चाचणीतील पिप छायाचित्रे आणि निरीक्षणे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे

३ अ. मूळ नोंद (वातावरणाची मूलभूत प्रभावळ)

चाचणीमध्ये एखाद्या घटकामुळे वातावरणात झालेला पालट अभ्यासण्यासाठी त्या घटकाचे पिप छायाचित्र घेतात; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाचे पिप छायाचित्र प्रथम घ्यावे लागते. याला मूळ नोंद म्हणतात. नंतर घटकाच्या पिप छायाचित्राची मूळ नोंदीशी (वातावरणाची मूलभूत प्रभावळ दर्शवणार्‍या पिप छायाचित्राशी) तुलना केल्यानंतर त्या घटकामुळे वातावरणात झालेला पालट लक्षात येतो.

३ आ. मूळ नोंदीच्या तुलनेत वस्तूची प्रभावळ दर्शवणार्‍या पिप छायाचित्रातील रंगांच्या प्रमाणात वाढ किंवा घट होण्यामागील तत्त्व

चाचणीसाठी घटक ठेवण्यापूर्वीच्या (मूळ नोंदीच्या) तुलनेत घटक ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगाच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या घटकातून प्रक्षेपित होणार्‍या त्या रंगाशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. चाचणीसाठी घटक ठेवल्यानंतर त्यातून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते.

३ इ. प्रभावळीत दिसणार्‍या रंगांची माहिती

चाचणीतील वस्तूच्या (किंवा व्यक्तीच्या) पिप छायाचित्रांत दिसणार्‍या प्रभावळींचे रंग हे त्या वस्तूच्या ऊर्जाक्षेत्रातील विशिष्ट स्पंदने दर्शवतात. प्रभावळीतील प्रत्येक रंगाविषयी पिप संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी प्रसिद्ध केलेल्या कार्यपुस्तिकेतील (मॅन्युअलमधील) माहिती आणि महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या शेकडो चाचण्यांतील निरीक्षणांचा अनुभव यांच्या आधारे प्रत्येक रंग कोणत्या स्पंदनाचा दर्शक आहे ?, ते निश्‍चित केले आहे. ते खालीलप्रमाणे आहे.

टीप १ – घटकाच्या अंतर्बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

टीप २ – घटकाच्या केवळ बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने अल्प किंवा नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता

३ ई. सकारात्मक स्पंदने

पिप छायाचित्रातील फिकट गुलाबी, पोपटी, निळसर पांढरा, पिवळा, गडद हिरवा, हिरवा, निळा आणि जांभळा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक ते अल्प लाभदायक स्पंदने (रंग) दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे सकारात्मक स्पंदने असे संबोधले आहे.

३ उ. नकारात्मक स्पंदने

पिप छायाचित्रातील राखाडी, गुलाबी, नारिंगी आणि भगवा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक त्रासदायक ते अल्प त्रासदायक स्पंदने दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक असणार्‍या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे नकारात्मक स्पंदने असे संबोधले आहे.

३ ऊ. पिप छायाचित्रात सर्वसाधारणपेक्षा उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक रंग दिसणे अधिक चांगले असणे

पिप छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांचे स्थान (जागा) त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेले असते.

३ ए. पिप छायाचित्रातील रंगांच्या वैशिष्ट्यांचा त्या रंगाच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्याशी संबंध नसणे

पिप संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी पिप छायाचित्रात नकारात्मक स्पंदनांसाठी भगवा आणि नारिंगी, हे रंग निर्धारित केले आहेत. त्याचा आणि त्या रंगांच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा (उदा. भगवा रंग त्याग अन् वैराग्य यांचे प्रतीक आहे.) कोणताही संबंध नाही.