अभ्यंग (मालीश)

Article also available in :

१. व्याख्या

संपूर्ण शरिराला अथवा शरिराच्या एखाद्या भागाला तेल लावून चोळणे याला ‘अभ्यंग’ (मालीश) असे म्हणतात.

 

२. काळ

आयुर्वेदामध्ये शरीर निरोगी राखण्यासाठी सांगितलेल्या दिनचर्येमध्ये अभ्यंग प्रतिदिन करण्यास सांगितले आहे. अभ्यंग सकाळी शौचविधी झाल्यावर रिकाम्या पोटी करावे. सूर्य मध्यावर असतांना आणि भोजनानंतर अभ्यंग करू नये.

 

३. अभ्यंग कोणी करू नये ?

पचनशक्ती मंद झाली असतांना; वमन, विरेचन इत्यादी आयुर्वेदात सांगितलेली पंचकर्मे केली असता, आदल्या दिवशीचे जेवण पचले नसतांना; तसेच सर्दी, ताप यांसारख्या रोगांमध्ये अभ्यंग करू नये.

 

४. अभ्यंगाचे लाभ

अ. अभ्यंगामुळे शरिराचा थकवा आणि वात दूर होतो.

आ. रंग सुधारण्यास आणि कांती येण्यास साहाय्य होते.

इ. दृष्टी सुधारते.

ई. रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

उ. त्वचेवर सुरकुत्या पडणे, केस गळणे यांसारखे विकार होत नाहीत.

ऊ. अभ्यंगामुळे वाताचे विकार, उदा. सांध्यांचे दुखणे, अर्धांगवात, मांसपेशींची अशक्तता इत्यादी विकार क्षीण होतात.

ए. स्नायूंमधील कडकपणा न्यून होतो आणि अंग हलके होते.

ऐ. काम करण्याचे सामर्थ्य वाढते. शरीर पुष्ट, रेखीव, पिळदार आणि कणखर होते.

ओ. मन प्रसन्न आणि उत्साही रहाते.

औ. नियमितपणे अभ्यंग केल्यास म्हातारपण उशिरा येते.

 

५. अभ्यंगासाठी वापरण्यात येणारे तेल

सामान्यपणे अभ्यंगाच्या नियमित वापरासाठी तिळाच्या तेलाचा उपयोग करावा. रोगांनुसार तेलांची निवड केली जाते. उदा. सांधेदुखीसारखे वातविकार असल्यास निर्गुंडी तेल, सहचरादी तेल इत्यादी, त्वचारोगांसाठी कडुनिंब किंवा करंज यांचे तेल, सिरा कौटिल्यासाठी (‘व्हेरिकोज व्हेन्स’) पिंड तेल किंवा प्रसारिणी तेल इत्यादी.

 

६. पूर्वसिद्धता

अभ्यंगासाठी एका वेळी साधारणपणे ५० मि.लि. तेल एका वाटीत घेऊन ते कोमट करून घ्यावे. त्यात चिमूटभर सैंधव मीठ घालावे. (सैंधव मीठ घातल्याने तेल शरीरात चांगल्या प्रकारे शोषले जाते.) तेलात थोडा कापूर मिसळावा. तसेच त्यात चिमूटभर विभूती आणि २-४ थेंब गोमूत्रही घालावे.

 

७. प्रार्थना

अभ्यंग करण्यास आरंभ करण्यापूर्वी प्रार्थना करावी. ‘हे श्रीकृष्णा, या अभ्यंगाने माझ्या शरिराच्या पेशीपेशीतील काळी शक्ती नष्ट होऊ दे. मांत्रिकांनी माझ्या शरिरात निर्माण केलेली त्रासदायक (काळ्या) शक्तींची स्थाने नष्ट होऊ देत. माझ्या शरिरामध्ये चैतन्याचा प्रवाह अखंड वाहू दे. अभ्यंग करत असतांना ‘मी तुलाच अभ्यंग करत आहे’, असा माझा भाव असू दे.’

 

८. अभ्यंगाचे प्रकार आणि कृती

८ अ. शिरोभ्यंग (डोक्याला तेल लावणे)

सर्वप्रथम दोन चमचे (थंड) तेल डोक्यावर (ताळूवर) घालावे आणि हाताच्या बोटांनी केसाच्या मुळांशी हळूहळू मर्दन करावे. केस जोरात घासू नयेत.

८ आ. कर्णपूरण (कानात तेल घालणे)

एक-आड-एक दोन्ही कानांत १० ते १२ थेंब कोमट तेल घालावे. तेल घातल्यावर २ मिनिटे तो कान वरच्या दिशेने करावा.

८ इ. पादाभ्यंग (पायाला तेल लावणे)

एक चमचा कोमट तेल पायाच्या तळव्याला बोटांपासून आरंभ करून टाचेपर्यंत लावावे. तेल लावत असतांना बोटे आणि तळवा जुळतो त्या ठिकाणी तसेच तळव्याच्या मध्यभागी चांगला दाब द्यावा. प्रतिदिन संपूर्ण शरिराला अभ्यंग करणे शक्य नसल्यास शिरोभ्यंग, कर्णपूरण आणि पादाभ्यंग तरी नियमित करावे. हे रात्री झोपतांनाही करू शकतो.

८ ई. संपूर्ण शरिराला तेल लावणे

संपूर्ण शरिराला तेल लावण्यासाठी प्रथम उताणे झोपावे. चमचाभर कोमट तेल नाभीमध्ये घालावे. १ ते २ मिनिटे हे तेल नाभीमध्ये जिरू द्यावे. नाभीमध्ये तेल जिरल्यामुळे जठराग्नी प्रदीप्त होतो. त्यानंतर हेच तेल घेऊन नाभीच्या भोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल गोल चोळावे. खाली दिलेल्या सारणीनुसार त्या त्या अवयवांना त्या त्या दिशेने चोळावे. आवश्यकतेनुसार अधिक तेल घ्यावे.

शरिराच्या पुढील भागाला अभ्यंग करून झाल्यावर पालथे झोपून दुसर्‍या व्यक्तीच्या साहाय्याने पाठ आणि कटीप्रदेश येथे अभ्यंग करून घ्यावे. पाठीला तेल लावतांना आरंभी कटीप्रदेशी मध्यभागी असलेल्या खोलगट भागावर नाभीप्रमाणेच १ ते २ मिनिटे तेल राहू द्यावे. त्यानंतर दुसर्‍या व्यक्तीने दोन्ही हातांच्या तळव्याने मणक्याच्या दोन्हीकडे, आतून बाहेरच्या दिशेने गोल गोल चोळत खालून वरच्या दिशेने खांद्यांर्पंत जावे. मानेला वरून खालच्या दिशेला अभ्यंग करावे.

८ ई १. अभ्यंगाची कृती (अवयवांनुसार अभ्यंगाची दिशा)

अवयव

अभ्यंगाची दिशा

१. पायाचा तळवा बोटांकडून टाचेकडे
२. पोट नाभीच्या भोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल
३. दोन्ही हात बोटांपासून खांद्यापर्यंत
४. दोन्ही पाय बोटांपासून जांघांपर्यंत
५. कोपरे, गुडघे, मनगटे, घोटे, खांदे आंतून बाहेर गोल
६. गळा खालून वर
७. मान वरून खाली
८. छाती हृदयाच्या भोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गोल
९. कटी आणि पाठ कटीपासून वर खांद्यांपर्यंत मणक्याच्या दोन्हीकडे, खालून वर, गोल गोल
१०. मणका खालून वर

९. व्यायाम

अभ्यंगानंतर आपल्या क्षमतेनुसार व्यायाम करावा. यामुळे तेल शरिरात मुरण्यास साहाय्य होते.

 

१०. मर्दन करणे (अंग दाबून घेणे)

व्यायामानंतर संपूर्ण देहाचे मर्दन करावे. मर्दन करतांना हातापायांच्या बोटांपासून हृदयाच्या दिशेने अंग दाबावे. यामुळे व्यायामानंतर पेशींमध्ये वाढलेल्या टाकाऊ अशा ‘लॅक्टिक अ‍ॅसिड’सारख्या (Lactic Acid) द्रव्यांचा निचरा होऊन पेशींमधील चयापचयाची प्रक्रिया सुधारते.

मर्दन हे तेल लावून (अभ्यंग करून) किंवा तेलाविनाही (अभ्यंग न करता) करता येते. ज्यांना व्यायाम करणे शक्य नाही अशा व्यक्तींनी प्रतिदिन किमान मर्दन तरी करावे. स्वतःला मर्दन करतांना आपल्याला चांगले वाटेल एवढा दाब द्यावा. मर्दन सावकाश करावे. त्यामुळे थकायला न होता प्रसन्न वाटते. दुसर्‍या व्यक्तीला मर्दन करतांना मर्दन करून घेणार्‍याला सहन होईल आणि ज्याने त्याला बरे वाटेल एवढाच दाब द्यावा.

 

११. स्नान

अभ्यंगानंतर थंड हवेत फिरू नये. अभ्यंगानंतर १५ ते २० मिनिटांनंतर बेसन किंवा मुलतानी माती लावून उष्ण किंवा कोमट पाण्याने स्नान करावे.

 

१२. कृतज्ञता

हे श्रीकृष्णा, तुझ्या कृपेमुळे साधनेसाठी प्राप्त झालेल्या या देहाला तूच अभ्यंग करवून घेतलेस, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे. ‘या अभ्यंगातून प्राप्त झालेल्या बळाचा वापर धर्मकार्यासाठी होऊ दे आणि ‘हा देह माझा नसून तुझाच आहे’ हा भाव सदैव माझ्या अंतरी राहू दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !’

– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (फाल्गुन कृष्ण पक्ष त्रयोदशी, कलियुग वर्ष५११४ (८.४.२०१३))

Leave a Comment