नैसर्गिक कालविभाग : वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष

Article also available in :

 

‘सूर्य आणि चंद्र हे कालपुरुषाचे नेत्र समजले जातात. सूर्य आणि चंद्र यांच्या भ्रमणांमुळे आपल्याला काळ मोजता येतो अन् त्याचा व्यवहारात उपयोगही करता येतो. ‘वर्ष, अयन, ऋतू, मास आणि पक्ष’ या नैसर्गिक कालविभागांची माहिती या लेखाद्वारे समजून घेऊ.

१. वर्ष : सौरवर्ष आणि चांद्रवर्ष असे वर्षांचे २ प्रकार प्रचलित आहेत.

१ अ. सौरवर्ष

सूर्य वसंतसंपात बिंदूवर (टीप) आल्यापासून पुन्हा त्या बिंदूवर येण्यास सूर्याला जो वेळ लागतो, त्याला ‘सौरवर्ष’ म्हणतात. सौरवर्षाचा कालावधी ३६५.२४ दिवस इतका आहे. सौरवर्षात महिने आणि ऋतू यांचा मेळ रहातो. सध्या वापरली जाणारी ग्रेगोरियन (युरोपीय) कालगणना सौरवर्षमानाचा अवलंब करते; परंतु ग्रेगोरियन वर्षाच्या आरंभदिनाला (१ जानेवारीला) खगोलशास्त्रीय आधार नाही.

टीप – पृथ्वीचा सूर्याभोवती भ्रमण करण्याचा मार्ग (क्रांतीवृत्त) आणि पृथ्वीचा अक्ष (विषुववृत्त) एकमेकांस जिथे छेद देतात, त्या दोन बिंदूंना अनुक्रमे ‘वसंतसंपात’ आणि ‘शरदसंपात’ असे म्हणतात. वसंतसंपात हा सौरवर्षाचा आरंभबिंदू आणि शरदसंपात हा मध्यबिंदू आहे.

१ आ. चांद्रवर्ष

एका अमावास्येपासून पुढील अमावास्येपर्यंत एक चांद्रमास होतो. १२ चांद्रमासांचे एक चांद्रवर्ष होते. चांद्रवर्षाचा कालावधी ३५४.३६ दिवस इतका आहे. चांद्रवर्षात मास आणि ऋतू यांचा मेळ रहात नाही. हिजरी (इस्लामी) कालगणना चांद्रवर्षाचा अवलंब करते.

भारतीय कालगणना सौरवर्ष आणि चांद्रवर्ष या दोन्ही प्रकारांचा समन्वय साधते. भारतीय कालगणनेत वर्ष सौर आणि महिने चांद्र पद्धतीचे आहेत, म्हणजे वर्षाचा आरंभ वसंत ऋतूत होतो; पण दिनांकाने न होता तिथीने होतो. सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांमध्ये प्रतिवर्षी ११ ते १२ दिवसांचा फरक पडतो, त्यामुळे त्यांच्यात मेळ रहाण्यासाठी प्रत्येक ३ वर्षांनी ‘अधिकमास’ योजण्याची पद्धत वैदिक काळापासून चालत आली आहे. त्यामुळे भारतीय कालगणना ‘चांद्र-सौर’ (luni-solar) पद्धतीची आहे.

श्री. राज कर्वे

२. अयन : म्हणजे जाणे

सूर्य वर्षातील ६ मास उत्तर दिशेकडून आणि ६ मास दक्षिण दिशेकडून भ्रमण करतो. याला ‘उत्तरायण आणि दक्षिणायन’ म्हणतात. वास्तविक सूर्य स्थिर असल्याने तो उत्तर किंवा दक्षिण दिशेने जात नाही; परंतु पृथ्वीचा अक्ष (विषुववृत्त) ‘२३.५ अंश’ इतका कललेला असल्याने तसे भासते. सध्या प्रतिवर्षी २१ डिसेंबरला उत्तरायण अन् २१ जूनला दक्षिणायन चालू होते. उत्तरायणात दिवस मोठा होत जातो अन् दक्षिणायनात रात्र मोठी होत जाते.

 

३. ऋतू

सूर्याच्या उत्तरायण आणि दक्षिणायन भ्रमणामुळे पृथ्वीवर ‘वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर’ हे ६ ऋतू दिसतात. असे असले, तरी पृथ्वीवरील सर्व प्रदेशांमध्ये सर्व ऋतू दिसत नाहीत, उदा. पृथ्वीच्या उष्ण-कटीबंधीय प्रदेशांत ग्रीष्म आणि वर्षा हे ऋतू प्रामुख्याने दिसतात.
पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात जो ऋतू असेल, त्याचा विरुद्ध ऋतू दक्षिण गोलार्धात त्या वेळी असतो, उदा. उत्तर गोलार्धात ज्यावेळी ग्रीष्म ऋतू (उन्हाळा) असतो, त्यावेळी दक्षिण गोलार्धात हेमंत ऋतू (हिवाळा) असतो.

३ अ. व्यावहारिक कार्यांसाठी सौरऋतू आणि धार्मिक कर्मांसाठी चांद्रऋतू वापरले जाणे

सौरवर्ष आणि चांद्रवर्ष यांनुसार ऋतू मानण्याची पद्धत निराळी आहे. सौरवर्षानुसार सूर्य वसंतसंपात बिंदूवर येण्याच्या ३० दिवस अगोदर वसंत ऋतूचा आरंभ होतो (सध्या २१ फेब्रुवारी या दिवशी), तर चांद्रवर्षानुसार चैत्र मासात वसंत ऋतूचा आरंभ होतो. व्यावहारिक कार्ये सौरऋतूंना अनुसरून केली जातात, तर धार्मिक कर्मे चांद्रऋतूंना अनुसरून करण्यास धर्मशास्त्र सांगते. पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सौर आणि चांद्र ऋतूंचे आरंभ होण्याचे दिवस पुढील सारणीत दिले आहेत.

ऋतू आरंभ होण्याचे दिवस
सौरवर्ष पद्धत चांद्रवर्ष पद्धत
वसंत  २१ फेब्रुवारी चैत्र शुक्ल १
ग्रीष्म २१ एप्रिल ज्येष्ठ शुक्ल १
वर्षा २१ जून श्रावण शुक्ल १
शरद २१ ऑगस्ट आश्विन शुक्ल १
हेमंत २१ ऑक्टोबर मार्गशीर्ष शुक्ल १
शिशिर २१ डिसेंबर माघ शुक्ल १

 

४. मास : सौरमास आणि चांद्रमास असे २ प्रकारचे मास प्रचलित आहेत.

४ अ. सौरमास

आकाशाचे ३० अंश (१ राशी) भ्रमण करण्यास सूर्याला जो वेळ लागतो, त्यास ‘सौरमास’ म्हणतात. सौरमासाचा सरासरी कालावधी ३०.४३ दिवस इतका आहे. सूर्य ‘वसंतसंपात’ बिंदूवर आल्यापासून (२१ मार्च या दिवसापासून) वर्षातील पहिल्या सौरमासाचा आरंभ होतो. सौरमासांमुळे सूर्याचे उत्तरायण-दक्षिणायन भ्रमण आणि ऋतू यांचे ज्ञान होते.

४ आ. चांद्रमास

सूर्य आणि चंद्र आकाशात एकत्र आल्यावर अमावास्या होते. एका अमावास्येपासून पुढील अमावास्येपर्यंत एक चांद्रमास होतो. चांद्रमासाचा कालावधी २९.५३ दिवस इतका आहे. १२ चांद्रमासांची नावे अनुक्रमे ‘चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन’ अशी आहेत. चांद्रमासांची नावे नक्षत्रांवरून पडली आहेत. चांद्रमासांमुळे तिथी, नक्षत्रे, योग आदींचे पर्यायाने शुभाशुभ दिवसांचे ज्ञान होते. हिंदु धर्मातील सर्व सण, उत्सव, व्रते, देवतांच्या जयंती इत्यादी चांद्रमासानुसार साजरे केले जातात.

 

५. पक्ष

पक्ष (१५ दिवसांचा कालावधी) केवळ चांद्रमासात असतो. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्लपक्ष आणि पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत कृष्णपक्ष असतो. मुहूर्तांच्या दृष्टीने शुक्लपक्ष शुभ आणि कृष्णपक्ष अशुभ मानला गेला आहे.’

– श्री. राज कर्वे, ज्योतिष विशारद, गोवा. (८.१.२०२३)

 

Leave a Comment