पौराणिक इतिहास लाभलेले माळवा (मध्यप्रदेश) येथील जगप्रसिद्ध ‘बाबा वैजनाथ महादेव मंदिर’ !

Article also available in :

माळवा (मध्यप्रदेश) येथील जगप्रसिद्ध ‘बाबा वैजनाथ महादेव मंदिर’

 

१. कर्नल मार्टिन याने १३७ वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करणे

‘माळव्यातील आगर येथील बाबा वैजनाथ महादेव मंदिर हे जगातील प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे. या मंदिराच्या चमत्कारिक कथांनी प्रभावित होऊन कर्नल मार्टिन याने १३७ वर्षांपूर्वी, इंग्रजांच्या शासन काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेव्हापासून या मंदिराचे विकासकार्य सतत प्रगतीपथावर आहे.

 

२. मंदिराची माहिती

माळव्यातील (मध्यप्रदेशातील) अगर गावाच्या उत्तरेला अनुमाने ४ कि.मी. अंतरावर वैजनाथ महादेवाचे प्राचीन आणि जगप्रसिद्ध मंदिर आहे. केवळ या गावातीलच नव्हे, तर आसपासच्या ग्रामीण क्षेत्रासह त्या प्रदेशातील मोठमोठ्या शहरांतूनही मोठ्या संख्येने श्रद्धाळू येथे दर्शनासाठी येतात. वैजनाथ महादेव मंदिराविषयीच्या चमत्कारी घटना आणि मंदिराचा पौराणिक इतिहास यांची माहिती नसलेली माळवा क्षेत्रात क्वचितच एखादी व्यक्ती असेल. या मंदिरात १३० वर्षांपासून प्रत्येक वर्षी दोन वेळा (कार्तिक आणि चैत्र या मासांत) पारंपारिक पद्धतीने यात्रा भरते.

 

३. मंदिराची स्थापना

या मंदिराची स्थापना कुणी आणि कधी केली, याविषयी निश्‍चितपणे सांगता येत नाही; परंतु शासकीय नोंदीनुसार डोंगरमाथ्यावर दक्षिण बाजूला पूर्वी बेटखेडा नावाचे गाव होते. त्या गावात मोड जातीच्या वैश्यांची वस्ती अधिक प्रमाणात होती. माघ शुक्ल चतुर्थी, सं. १५६३ वि. (इसवी सन १५२८) या मुहूर्तावर मोड वैश्यांनी वैजनाथ महादेव मंदिराचा पाया घातला आणि सं. १५८५ वि. (इसवी सन १५३६) मध्ये काम पूर्ण झाले.

 

४. मंदिराचे आधीचे स्वरूप

आधी हे मंदिर एखाद्या मठाप्रमाणे आणि ठेंगणे होते. ज्वालामुखी दगडापासून बनवलेल्या मंदिराच्या भिंती रुंद होत्या. या भिंतींना हवा येण्या-जाण्यासाठी एखादा झरोका अथवा खिडकी (गवाक्ष) असे काहीच नव्हते. प्रकाशाकरता मंदिरात दिवस-रात्र अखंड नंदादीप तेवत ठेवलेला असायचा.

 

५. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर

पौराणिक माहितीनुसार त्या काळी मंदिराच्या चारही बाजूंनी घनदाट झाडी होती. या झाडीत वाघ, सिंह, चित्ते, बिबटे, लांडगे, डुकरे यांसारख्या हिंस्र वन्य पशूंची संख्या पुष्कळ होती. कित्येक वर्षांपासून या मंदिराच्या जवळून एक छोटी जलधारा वहाते. या जलधारेला ‘बाणगंगा’ म्हणतात.

 

६. मंदिराच्या जीर्णोद्धाराचा इतिहास

६ अ. इंग्रज कमांडर मार्टिन याच्या पत्नीने मंदिराकडे जाणे, मंदिराची भिंत
पडल्याचे पहाणे आणि भिंतीची डागडुजी करण्याविषयी तिने मंदिरातील ब्राह्मणांना विचारणे

एका इंग्रजाने बाबा वैजनाथ महादेव मंदिराचा जीर्णोद्धार का केला, या विषयीची माहितीही इतिहासात नोंद केलेली आहे. पौराणिक कथेनुसार वर्ष १८८० मध्ये इंग्रजांचे सैन्य काबूलच्या युद्धासाठी गेले होते. या सैन्यात मार्टिन नावाचा एक इंग्रज कमांडरही होता. एके दिवशी मार्टिनची पत्नी घोड्यावर स्वार होऊन फिरत फिरत या मंदिराजवळ पोचली. मंदिराच्या एका भिंतीचा काही भाग तुटलेला पाहून मार्टिनच्या पत्नीने त्याविषयी मंदिरात पूजा करणार्‍या ब्राह्मणांकडे चौकशी केली आणि विचारले ‘‘ते नीट बांधून का घेत नाही ?’’ त्या वेळी पूजा करणारे पं. शिवचरणलाल अवस्थी यांनी तिला सांगितले, ‘‘आमच्याजवळ एवढे पैसे नाहीत. तुम्ही बांधून देत असाल, तर मोठी कृपा होईल.’’ यावर मार्टिनची पत्नी म्हणाली, ‘‘माझे पती युद्धावर गेले आहेत. ते आल्यानंतर मी त्यांना भिंत बांधून देण्याविषयी सांगीन.’’ तिचे बोलणे ऐकून उपस्थित ब्राह्मणांनी ‘मार्टिन साहेब लवकरच सुखरूप परत यावेत’, अशी प्रार्थना केली.

६ आ. पं. अवस्थी यांनी तत्कालीन रिसालदार मेजर
पं. गोपालसिंह यांना मंदिराचा जीर्णोद्धार करून देण्याची विनंती करणे

इंग्रजांचे सैन्य काबूलच्या युद्धावरून परतल्यावर पं अवस्थी यांनी मार्टिनच्या पत्नीसमवेत मंदिराची पडलेली भिंत बांधण्यासंदर्भात झालेले बोलणे तत्कालीन रिसालदार मेजर पं. गोपालसिंह यांच्या कानावर घातले आणि मंदिराचा जीर्णोद्धार करून देण्याची विनंती केली.

६ इ. मार्टिन यांनी जवळपासच्या संस्थानांच्या वकिलांच्या साहाय्याने आर्थिक साहाय्य मिळवून देणे

गोपालसिंह यांनी मार्टिन यांना हा विषय सांगितला आणि वैैजनाथ मंदिराची डागडुजी करून देण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले. मार्टिन यांनीही त्यांचे म्हणणे स्वीकारले. त्या काळी आगरमध्ये मध्य भारतातील दूतावास आणि त्यांचे कार्यालयही होते. जवळपासच्या छोट्या-मोठ्या संस्थानांचे दूत (वकील) येथे रहात असत. मार्टिनने या वकिलांना मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांच्या संस्थानांकडून आर्थिक साहाय्य प्राप्त करून देण्यास सांगितले.’

(संदर्भ : भास्कर वार्ताहर – आगर, माळवा)

Leave a Comment