विश्‍वातील दुसरे सर्वांत मोठे शक्तिपीठ म्हणजे रजरप्पा (झारखंड) येथील श्री छिन्नमस्तिकादेवी !

Article also available in :

श्री छिन्नमस्तिका देवीचे मंदिर दशमहाविद्यांमध्ये श्री छिन्नमस्तिकादेवी ही सहावी विद्या आहे. झारखंडची राजधानी रांची शहरापासून अनुमाने ८० किलोमीटर अंतरावर श्री छिन्नमस्तिकादेवीचे मंदिर आहे. भैरवी-भेडा आणि दामोदर या नद्यांच्या संगमावर वसलेले हे मंदिर विश्‍वातील दुसरे सर्वांत मोठे शक्तिपीठ आहे. या मंदिरात देवीची मूर्ती नसून पीठ आहे.

मंदिर स्थापनेचा इतिहास

या मंदिराची स्थापना ६ सहस्र वर्षांपूर्वी झाली. भारतात मोगल राज्य करत असतांना अनेक वेळा त्यांनी हे मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. भारतातील इंग्रजांच्या वास्तव्याच्या वेळी इंग्रज देवीच्या दर्शनासाठी येत.

 

श्री छिन्नमस्तिकादेवीच्या रूपाचे वर्णन

देवीचे संकेतस्थळावरील छायाचित्र

मंदिराच्या उत्तरेला एका भिंतीलगत असलेल्या विशाल शिलाखंडावर श्री छिन्नमस्तिकादेवीचे दिव्य रूप विराजमान आहे. श्री छिन्नमस्तिका मंदिराच्या आतमध्ये असलेल्या शिलाखंडामध्ये देवीचे ३ नेत्र आहेत. डावा पाय समोर केलेली देवी कमळाच्या पुष्पावर उभी आहे. तिच्या पायाखाली कामदेव आणि रति रतिमुद्रेत आहेत. श्री छिन्नमस्तिकादेवीचा गळा सर्पमाळा आणि मुंडमाळा यांनी सुशोभित आहे. पसरलेला केशसांभार, बाहेर असलेली जिव्हा आणि अलंकार यांनी नटलेली देवी दिव्य रूपात आहे. उजव्या हातामध्ये तलवार आणि डाव्या हातामध्ये स्वत:चे कापलेले मस्तक आहे. देवीच्या आजूबाजूला डाकिनी आणि शाकिनी उभ्या आहेत. देवीच्या गळ्यातून रक्ताच्या ३ धारा वहात असून देवी डाकिनी आणि शाकिनी यांना रक्तपान करत आहे. एक रक्ताची धार देवीचे मस्तक स्वत: ग्रहण करत आहे. या ३ रक्तधारा हे इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तीन नाड्यांचे संतुलन करून योगमार्गामध्ये सिद्धी मिळाल्याचे दर्शक आहे.

 

मंदिराची अन्य काही वैशिष्ट्ये

१. पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना मंदिर मध्यरात्रीपर्यंत उघडे असते.

२. आसाममधील कामाख्या देवी आणि बंगालमधील तारा देवी यांच्यानंतर झारखंडमधील छिन्नमस्तिका देवीचे मंदिर हे तांत्रिक स्वरूपाची साधना करणार्‍यांचे मुख्य स्थान आहे.

३. देश-विदेशातील अनेक भक्त नवरात्री तसेच प्रत्येक अमावास्येच्या रात्री देवीच्या दर्शनासाठी येतात.

४. मंदिरासमोर बळी देण्याचे स्थान आहे. येथे देवीला प्रतिदिन बकर्‍यांचा बळी दिला जातो. बळी देण्याचे स्थान असूनही त्या ठिकाणी एकही माशी येत नाही, हे एक आश्‍चर्य आहे.

५. मंदिरासमोर पापनाशिनी कुंड आहे. रोगग्रस्त व्यक्तींनी या कुंडात स्नान केल्यास ते रोगमुक्त होतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

(संदर्भ : ‘भारत डिस्कव्हरी’चे संकेतस्थळ)

 

श्री छिन्नमस्तिका देवीची उत्पत्ती

सहस्रो वर्षांपूर्वी राक्षस आणि दानव यांच्यामुळे मानव अन् देव भयभीत झाले होते. त्या वेळी मानवांनी देवीचा धावा केला. पार्वती माता छिन्नमस्तिका देवीच्या रूपात प्रकट झाली आणि तिने खड्गाने असुरांचा संहार केला. अन्न-पाणी घेण्यास विसरून देवी केवळ दुष्टांचा संहार करत होती. त्यामुळे पृथ्वीवर रक्ताचे पाट वाहू लागले. पृथ्वीवर हाहाकार माजला. देवीने तिचे प्रचंड स्वरूप धारण केले होते. त्यावरून देवीचे ‘प्रचण्डचण्डिका’ असेही एक नाव आहे. दुष्टांचा संहार झाल्यानंतरही देवीचा राग शांत होत नव्हता. त्या वेळी भयभीत झालेल्या देवतांनी भगवान शिव यांना ‘देवीच्या प्रचंड रूपाला शांत करावे, अन्यथा पृथ्वी नष्ट होईल’, अशी प्रार्थना केली.

देवतांच्या प्रार्थनेनंतर भगवान शिव देवीजवळ गेले. त्या वेळी देवी भगवान शिव यांना म्हणाली, ‘‘हे देवा, मला पुष्कळ भूक लागली असून ती शमवण्यासाठी मी काय करू ?’’ तेव्हा भगवान शिव म्हणाले, ‘‘हे देवी, तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाची देवी आहात. तुम्ही स्वत:च शक्ती आहात. स्वत:ची मान खड्गाने कापून त्यातून येणारे शोनित (रक्त) प्राशन केले, तर तुमची भूक शमेल.’’ हे ऐकून देवीने लगेचच स्वत:ची मान कापून डाव्या हातात घेतली. शिर आणि मान वेगळे झाल्यावर त्यातून रक्ताच्या तीन धारा वाहू लागल्या. देवीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असलेल्या शाकीनी आणि डाकीनी यांनी दोन धारांतील, तर स्वत: देवीने एका धारेतील रक्त प्राशन केले. त्यामुळे देवी तृप्त झाली.

Leave a Comment