ज्योतिषशास्त्रानुसार भविष्य सांगण्याच्या पद्धती आणि प्रारब्धावर मात करण्यासाठी साधना अन् क्रियमाणकर्म यांचे महत्त्व

Article also available in :

प्रश्‍न : ‘ज्योतिषशास्त्र प्रारब्धानुसार घडणार असणार्‍या घटना सांगते कि क्रियमाणकर्म लक्षात घेऊनही सांगते ? साधनेने, क्रियमाणकर्माने प्रारब्धावर मात करता येते का ? किती टक्के पातळीला हे साध्य होते ? – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

१. ज्योतिषींचे प्रकार

१ अ. जन्मज्योतिषी

मागील जन्मांतील साधनेमुळे व्यक्तीला जन्मतःच ज्योतिष विद्येचे ज्ञान असते. ज्योतिषशास्त्राची केवळ तोंडओळख झाल्यास व्यक्तीला त्यातील सर्व बारकाव्यांचा आपोआप बोध होऊ लागतो.

१ आ. विद्याप्रवीण

साधनेने गुरूंकडून सूक्ष्मातून ज्योतिषविद्या धारण करतो त्या शिष्याला ‘विद्याप्रवीण’ म्हटले जाते. अशा शिष्याला व्यक्तीचे भविष्य सांगतांना पुस्तकातील शास्त्रवर्णन अथवा व्यक्तीच्या जन्मपत्रिकेची आवश्यकता भासत नाही.

१ इ. परविद्याप्रविण

काही ज्योतिषींना दिव्यात्मे, अतृप्त आत्मे किंवा देवगण सूक्ष्मातून मार्गदर्शन करून व्यक्तींच्या भविष्याविषयी सांगतात. अशा ज्योतिषाकडे स्वतःची विद्या नसते. तो इतरांवर अवलंबून असतो. त्यामुळे त्यांना ‘परविद्याप्रविण’, असे म्हणतात.

१ ई. शास्त्रज्ञान

ग्रहमान, हस्तरेषा, जन्मदिनांक, रास इत्यादींचे शास्त्रीय गणित मांडून व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. ज्योतिष सांगण्याच्या या पद्धतिला ज्योतिषांची ‘शास्त्रनीती’ म्हणतात.

१ उ. द्रष्टा

व्यक्तीची वर्तमानस्थिती, तो करत असलेली साधना आणि त्याचा पुढील आयुष्यावर होणारा परिणाम यांचे गणित मांडून भविष्य सांगितले जाते. भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचे ज्याला ज्ञान आहे, असा महात्माच असे भविष्य सांगू शकतो.

१ ऊ. गूढज्योतिष आणि त्याचे स्वरूप

१ ऊ १. मृत्यूची वेळ टाळता येणे

तंत्रमार्गातील ज्योतिषाला व्यक्तीच्या मृत्यूची अचूक वेळ ठाऊक असते. तंत्रविद्येत विशिष्ट उपासना केली की, मृत्यूवेळी शरिरात होणारी आध्यात्मिक क्रिया थांबते. मृत्यूची वेळ चुकली की, अशा व्यक्तीला नवआयुष्य प्राप्त होऊ शकते. हे नवीन आयुष्य व्यक्तीच्या पुढील जन्मातील आयुष्यातून वजा होते.

१ ऊ २. कर्मआघातांची वाट चुकवणे

एका उपासनेद्वारे चालू किंवा मागील जन्मात विशिष्ट कर्मदोषांमुळे विशिष्ट आपत्ती कोसळणार असेल, तर काही आध्यात्मिक उपायांनी कर्मदोषांची वाट चुकवली जाते; परंतु कर्मदोष परत वेगळ्या पद्धतीने प्रगट होऊन व्यक्तीला तेवढेच प्रारब्ध भोगावे लागते; पण त्याचे स्वरूप पालटलेले असते.

१ ऊ ३. ग्रहबाधानियंत्रण

व्यक्तीला विशिष्ट ग्रहांच्या युतीमुळे बाधा होणार असली, तर त्या वेळी विशिष्ट उपासना अथवा धार्मिक विधी केल्यास त्या ग्रहांचा अनिष्ट परिणाम व्यक्तीवर न होता तिला कार्यात यश प्राप्त होते; परंतु ते संकट काही काळाने परत संबंधिताला वेगळ्या स्वरूपात भोगावे लागते. पूर्वीचे राजे युद्धात जय प्राप्त होण्यासाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठी ही पद्धत वापरत.

१ ऊ ४. अंगुलीनिर्देश

काही तंत्रमार्गी ज्योतिषी मौन राहून केवळ बोटांच्या खुणांवरून निर्देश करीत भविष्य सांगतात. त्या पद्धतीला ‘अंगुलीनिर्देश’ म्हणतात. अशा व्यक्तींना आपली गूढविद्या प्रगट करायची नसते, पण संबंधित व्यक्तीला घटनांविषयी ज्ञान द्यायचे असते.

१ ऊ ४ अ. व्यक्तीच्या प्रश्‍नांची उत्तरे संख्या किंवा विशिष्ट मुद्रेने देणे : ज्योतिषाला व्यक्तीचे भविष्य सांगतांना गूढ विद्येतील सूक्ष्म संकेतानुसार बोटांची हालचाल करायची असते. त्यात ज्योतिषी एकाग्र झालेला असतो. त्यामुळे ज्योतिषी त्याचे म्हणणे शब्दरूपात न सांगता अन्य ज्ञानी व्यक्तीचे साहाय्य घेतो. अशा वेळी ज्योतिषी स्वतःच्या बोटांद्वारे व्यक्तीला प्रश्‍नांची उत्तरे देतात. बोटांची खूण आणि त्याचे अर्थही भिन्न असतात. त्यातील जाणकार तेथे उपस्थित असल्यास संबंधित व्यक्तीला त्याचे ज्ञान होऊ शकते. बोटांनी उत्तरे देण्याची पद्धत संख्या (दोन, तीन किंवा चार बोटे एकत्रित करून) किंवा विशिष्ट मुद्रेने दिले जाते, उदा. प्रश्‍न विचारणार्‍या व्यक्तीचा युद्धात विजय होणार असेल, तर तांत्रिक उजव्या हाताची केवळ तर्जनी उंचावणार किंवा आशीर्वादाचा हात करणार आणि व्यक्तीचा पराजय होणार असल्यास डाव्या तळहातावर उजवा हाताचा तळहात जोराने घासल्याच्या खुणेतून व्यक्ती युद्धात भुईसपाट, म्हणजे पराजित होणार असल्याचे संकेत दिला जातो.

हे ज्योतिषी एकाच ठिकाणी वास्तव्यास न रहात फिरते रहातात.

१ ऊ ४ आ. ज्योतिष सांगतांना बोटांनी करावयाच्या मुद्रेच्या काही पद्धती आणि नृत्यप्रकारांतील काही मुद्रा यांत साम्य आहे.

२. साधनेने प्रारब्धावर मात करता येण्याचे स्वरूप

२ अ. तीव्र प्रारब्ध

बहुतेक वेळा भोगावे लागते. साधनेने त्यात काही अंशी पालट होतो. साधनेची तीव्र इच्छा आणि ईश्‍वरी कृपा असल्यास यांतून सुटका होऊ शकते.

२ अ १. तीव्र प्रारब्धाची लक्षणे

अ. यंत्रवत जीवन : मनुष्याचे जीवन यंत्रवत झालेले असते. पूर्वी जे काही घडले ते भोगणे केवळ एवढेच अशा व्यक्तीच्या हातात असते.

आ. बुद्धीच्या अधीन होणे : मन आणि बुद्धी यांवर स्वतःचे नियंत्रण नसते.

२ अ २. तीव्र प्रारब्धावर उपाय

अ. व्यक्तीला साधना करण्याची बुद्धी होत नाही; पण त्याला सातत्याने संतसंगात ठेवणे, जागृत देवस्थानाचे दर्शन घडवणे, धर्मकार्यात प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभागी करून घेतल्यास संबंधित व्यक्तीच्या जीवनात सुधारणा होण्याची शक्यता असते.

आ. व्यक्तीला सुबुद्धी प्राप्त व्हावी आणि साधनेतील अडथळे दूर व्हावेत, यांसाठी गुर्वाज्ञेनुसार संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती यज्ञ अथवा विशिष्ट साधना करू शकतात.

२ अ ३. तीव्र प्रारब्धात परिवर्तन होण्यातील टप्पे

अ. व्यक्तीचे मन पूर्वकर्मांमुळे पुष्कळ दुःख सहन करते. त्यानंतर त्याला या जीवनात परिवर्तनाची इच्छा निर्माण होते, तेव्हा तो साधनेकडे वळतो.

आ. मागील जन्मांतील एखादे चांगले कर्म प्रगट झाल्यास त्याला उच्च आध्यात्मिक पातळीच्या संतांच्या सत्संगात जाण्याचा योग येतो, तेव्हा व्यक्तीच्या जीवनात पालट घडू शकतो.

२ आ. मध्यम प्रारब्ध

साधनेने प्रारब्धावर मात करता आल्याने प्रारब्ध भोगण्याची तीव्रता अल्प होते किंवा त्याचे स्वरूप पालटते.

२ इ. मंद प्रारब्ध

साधनेने प्रारब्धावर पूर्ण मात करता येते.

३. आध्यात्मिक पातळीनुरूप प्रारब्ध आणि क्रियमाणकर्म यांचे प्रमाण

आध्यात्मिक पातळी ५५ टक्क्यांपासून गुरुकृपेला आरंभ होतो. त्यानंतर व्यक्तीला प्रारब्धावर मात करणे सुलभ होते.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.१.२०१७)

Leave a Comment