२०० वर्षांचा इतिहास लाभलेला अन् नगर शहराचे श्रद्धास्थान श्री विशाल गणपति !

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश !

नगर शहराचे ग्रामदैवत माळीवाड्यातील श्री सिद्धीविनायक विशाल गणपतीचे मंदिर अत्यंत जागृत तीर्थक्षेत्र असून या मंदिराला २०० वर्षांचा इतिहास लाभला आहे. भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी ही देवता आणि मंदिर यांची ख्याती दूरपर्यंत आहे. नावाप्रमाणेच मूर्ती साडे अकरा फूट उंच असून ती पूर्वाभिमुख आणि उजव्या सोंडेची आहे. मूर्तीच्या बेंबीवर फणाधारी नाग आहे, तर डोक्यावरील पगडी पेशवेकालीन आहे.

विशाल गणपतीचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक प्रतिदिन मंदिरात येतात. गणेशोत्सव, गणेशजयंती, गुरुपौर्णिमा, सावता महाराज जयंती हे उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. जुने मंदिर लाकडात कोरीव काम करून बांधलेले होते. ते मंदिर पुरातन आणि देखणे होते. गेल्या २३ वर्षांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून आता ते पूर्णत्वाला गेले आहे.

नगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची विलोभनीय मूर्ती ! हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातील विघ्ने दूर होण्यासाठी त्याच्या चरणी शरणागत भावाने प्रार्थना करूया !

सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ गेल्या ४ वर्षांहून अधिक काळ भारतभर भ्रमण करून प्राचीन मंदिरे, वास्तू, गड आणि संग्राह्य वस्तू यांच्या छायाचित्रांचा संग्रह करत आहेत. त्यामुळेच आपल्याला या प्राचीन मंदिरे, वास्तू यांचे घरबसल्या दर्शन मिळते. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करूया !

संगीत आणि नृत्य यांत प्रवीण असलेला श्री गणपति

स्वरब्रह्माचा आविष्कार म्हणजे ओंकार. श्री गणेशालाही ओंकारस्वरूप श्री गणेशा असे म्हटले आहे. श्री गणेश वरदस्तोत्रातील अनेक श्‍लोकांवरून गणेशाचे संगीताशी असलेले नाते स्पष्ट होते. ज्ञानेश्‍वर माऊली, संत नामदेव, समर्थ रामदासस्वामी आदी संतांच्या अभंगरचनांतूनही गणेशाचा संगीताशी असलेला निकटचा संबंध लक्षात येतो. नर्तकरूपातील गणरायाच्या मूर्तीही आढळतात. सोनेरी देहकांतीच्या या गणपतीला आठ हात असून त्याचा डावा पाय पद्मासनात आहे, तर उजवा पाय अधांतरी आहे. मध्व मुनीश्‍वरांनी ये गणराया मंगलमूर्ति । पतित पावन दीनदयाळा । त्रिभुवनी सोज्वळ तुझी कीर्ती । कीर्तनरंगी नृत्य करी रे, संगीताची मिळवूनी पूर्ती ॥, अशी श्री गणेशाच्या नृत्यसंपदेची महती वर्णिली आहे. गजाननाचे नृत्य पाहून गंधर्व-अप्सराही लज्जित होतात, असे सांगतांना कवी मोरोपंतांनी श्री गणेशाचे मनोहर रूप शब्दसंपदेने आणि कल्पनासौंदर्याने उत्तमरित्या चितारले आहे.

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘ श्री गणपति ‘

Leave a Comment