महाल, नागपूर येथील जागृत श्री गणपति मंदिर !

श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास

केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल भारतवर्षाचे आराध्यदैवत श्री गणेश ! गणेशोत्सवाच्या कालावधीत ब्रह्मांडातील श्री गणेशाचे तत्त्व नेहमीपेक्षा १ सहस्र पटींनी अधिक प्रमाणात पृथ्वीतलावर येत असते. गणेशोत्सवासंदर्भात एक विशेष सूत्र असेही आहे की, हा उत्सव जागतिक स्तरावर सर्वांत मोठा उत्सव म्हणून सुविख्यात आहे.

गणेशभक्तांची श्री गणेशाप्रती भाव-भक्ती वृद्धिंगत व्हावी, या हेतुने आणि श्री गणेशाच्या कृपेने श्री गणेशोत्सव : दर्शन, शास्त्र अन् इतिहास या विशेष सदरात आपण श्री गणेशाशी संबंधित विशेष माहिती, उपासनाशास्त्र, विविध प्रसिद्ध गणपती मंदिरांतील गणरायाच्या मूर्तींची छायाचित्रे, ऐतिहासिक माहिती इत्यादींविषयी वैशिष्ट्यपूर्ण माहिती जाणून घेत आहोत.

नागपूर येथील महाल भागात श्री गणपतीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार श्री. मधुसूदन ताम्हणकर यांच्या घरात हे मंदिर आहे. येथील शमी वृक्ष मूळ मंदिरापासून लांब आहे. असे असूनही त्या वृक्षाची फांदी मंदिराच्या कळसाला स्पर्श करते. यातून हे मंदिर जागृत असल्याचे प्रत्ययास येते.

नागपूर शहराच्या महाल क्षेत्रात असलेल्या प्रसिद्ध गणपति मंदिरातील नयनमनोहारी श्री गणेशमूर्ती !

 

शमी वृक्षाची फांदी श्री गणपति मंदिराच्या कळसाला स्पर्श करणे, हे मंदिर जागृत असल्याचे द्योतक आहे, अशी भक्तांची श्रद्धा आहे.

श्री गणेशाची उपासना आणि त्या
उपासनेतील २१ या संख्येचे अनन्यसाधारण महत्त्व !

१. गणेश विद्या

चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा विस्तार म्हणजे गणेश विद्या !

२. गणेशमूर्तीच्या पूजनाचा कालावधी

गणेशोत्सवात किमान दीड, पाच, सात, दहा किंवा एकवीस दिवस गणेशमूर्ती ठेवतात. नंतर तिचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.

३. गणेशाशी संबंधित २१ या अंकाचे महत्त्व

३ अ. नावे : गणपतीची २१ नावे प्रसिद्ध आहेत.

३ आ. पुराणे : गणेशाची माहिती असलेली २१ पुराणे आहेत.

३ इ. स्थाने : गणपतीची जागृत असलेली २१ ठिकाणे आहेत.

३ ई. गणेशपूजनातील सामूग्री : गणेशाच्या पूजनात २१ दूर्वा, २१ मोदक, २१ फुलांचा हार, २१ विड्याची पाने, २१ प्रकारची फळे, २१ पत्री, २१ फुले आणि २१ रुपये किमान दक्षिणा अशी सामुग्री वापरतात.

३ उ. गणपतीची २१ नावे, गणेशमाहिती असलेली २१ पुराणे, गणपतीने ठार मारलेले २१ राक्षस आणि गणेशपूजनासाठी लागणारी २१ पाने अन् फुले

४. गणेशपूजनातील दूर्वांचे महत्त्व !

४ अ. गणपतीला दूर्वा वहाण्याची पद्धत : श्री गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. त्या २१, २८, १०८ किंवा १००१ याप्रमाणे वाहिल्या जातात. २१ दूर्वा वहायच्या झाल्या, तर दोन दोन दूर्वा एकत्र करून वहाव्यात आणि त्या वेळी दूर्वायुग्मं समर्पयामि । म्हणजे दोन दूर्वा अर्पण करतो, असे म्हणावे. यापेक्षा अधिक दूर्वा वहायच्या झाल्यास एकवीसच्या पुढे एकेकच दूर्वा वहातात.

४ आ. दूर्वा काढतांना म्हणावयाचा मंत्र !

त्वं दूर्वेऽमृतसम्पन्ने शतमूले शताङ्कुरे ।

शतं नाशय पापानां दीर्घायुष्यं च देहि मे ॥

अर्थ : अमृतापासून उत्पन्न झालेल्या, शेकडो मुळे आणि शेकडो अंकूर असलेल्या हे दूर्वे, तू माझी शेकडो पापे नष्ट करून मला दीर्घायुष्य दे !

४ इ. गणपतीला दूर्वा वाहतांना करायच्या २१ नावांचा उच्चार !

१. गणाधिपाय नमः। किंवा गणाधीशाय नमः ।

२. उमापुत्राय नम: ।              ३. अभयप्रदाय नम: ।

४. एकदन्ताय नम: ।              ५. इभवक्त्राय नम: ।

६. मूषकवाहनाय नम: ।           ७. विनायकाय नम: ।

८. ईशपुत्राय नम: ।               ९. सर्वसिद्धिप्रदायकाय नम: ।

१०. लम्बोदराय नम: ।            ११. वक्रतुण्डाय नम: ।

१२. अघनाशकाय नम: ।          १३. विघ्नविध्वंसकमर्णे नम: ।

१४. विश्‍ववन्द्याय नम: ।          १५. अमरेश्‍वराय नम: ।

१६. गजवक्त्राय नम: ।            १७. नागयद्योपवीतिने नम: ।

१८. भालचन्द्राय नम: ।           १९. परशुधराय नम: ।

२०. विघ्नाधिपतये नम: ।          २१. सर्वविद्याप्रदायकाय नम: ।

५. एकवीस संकष्टी चतुर्थींचा उपवास (मिठाच्या संकष्टी चतुर्थी करण्याचे व्रत) !

मंगळवारी संकष्टी चतुर्थी आल्यास तिला अंगारकी चतुर्थी असे म्हणतात. या दिवसापासून २१ चतुर्थी कराव्यात. सकाळपासून उपवास करावा. सायंकाळी गणपतीची पूजा करून २१ मोदक करावेत. एक मोदक मिठाचा करावा. भोजनास बसल्यावर मिठाचा मोदक लागला, तर भोजन तेथेच थांबवावे. शेष मोदक गायीला द्यावेत.

६. गणेश उपासनेत २१ या संख्येचे महत्त्व असण्याचे कारण

६ अ. ६ रिपू : काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर

६ आ. ५ महाभूते : पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश

६ इ. ४ अंतःकरणे : मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार

६ ई. ३ गुण : सत्त्व, रज आणि तम

६ उ. २ द्वैत : मी आणि तू

६ ऊ. १ परमेश्‍वर : सबका मालिक एक

याप्रमाणे ६ + ५ + ४ + ३ + २ + १ = २१

– ज्योतिषी श्री. ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी)

(संदर्भ : मासिक धनुर्धारी, सप्टेंबर २००७)

Leave a Comment