गुरुकृपायोगानुसार साधनेचे प्रकार आणि अष्टांग साधनेचे टप्पे

अनुक्रमणिका

जीवनातील दुःखांना धैर्याने सामोरे जाण्याचे बळ आणि सर्वोच्च प्रतीचा सतत टिकणारा आनंद केवळ साधनेनेच मिळतो. साधना म्हणजे ईश्वरप्राप्तीसाठी करायचे प्रयत्न. ‘साधनानाम् अनेकता’ म्हणजे अनेक प्रकारच्या साधना असतांना नेमकी कोणती साधना करायची, याविषयी बहुतेकांच्या मनाचा गोंधळ उडतो. त्यातच प्रत्येक पंथ अन् संप्रदाय म्हणतो की, आमचीच साधना सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे त्या गोंधळात अधिकच भर पडते. मग साधना नेमकी कोणत्या मार्गाने करायची ?

कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी त्याने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी अखेर गुरुकृपेविना गत्यंतर नाही. म्हणूनच म्हटले आहे, ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘शिष्याचे परममंगल (मोक्षप्राप्ती) केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ गुरुकृपेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल होणे, यालाच ‘गुरुकृपायोग’ असे म्हणतात. ‘गुरुकृपायोग’चे वैशिष्ट्य म्हणजे सर्व साधनामार्गांना सामावून घेणारा, असा हा ईश्वरप्राप्तीचा सहजसोपा मार्ग आहे.

या लेखात गुरुकृपायोगानुसार साधनेच्या व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांविषयी जाणून घेऊ.

व्यष्टी साधना आणि समष्टी साधना हे गुरुकृपायोगानुसार साधनेचे दोन प्रकार आहेत. व्यष्टी साधना म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न. समष्टी साधना म्हणजे समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न.

 

१. अष्टांग साधनेच्या टप्प्यांचा निकष
साधकाच्या गुणवत्तेवर अवलंबून असणे

अ. निकष १ – साधकामध्ये पुष्कळ स्वभावदोष आणि अहं असणे

अशा साधकाने अष्टांग साधनेच्या पुढील टप्प्यांनुसार प्रयत्न करावेत.

१. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन,

२. अहं-निर्मूलन,

३. नामजप,

४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न,

५. सत्संग,

६. सत्सेवा,

७. सत्‌साठी त्याग आणि

८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)

आ. निकष २ – साधकामध्ये भक्तीभाव असणे

भक्तीप्रधान वृत्ती असलेल्या साधकाने अष्टांग साधनेच्या पुढील टप्प्यांनुसार प्रयत्न करावेत.

१. नामजप,

२. पुढच्या टप्प्याचा भक्तीभाव जागृत करण्यासाठी करायचे प्रयत्न,

३. सत्संग,

४. सत्सेवा,

५. स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन,

६. अहं-निर्मूलन,

७. सत्‌साठी त्याग आणि

८. इतरांविषयी प्रीती (निरपेक्ष प्रेम)

 

२. व्यष्टी साधना

व्यष्टी साधनेची अंगे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. कुलाचार, सण-व्रते, विविध धार्मिक कृती इत्यादींचे आचरण

पुढीलसारख्या गोष्टींचा समावेश धर्मपालनात होतो.नित्यनेमाने चालत आलेल्या कुलाचारांचे पालन, कुलदेवतेची पूजाअर्चा, तिचे स्त्रोत्रपठण, तिच्या दर्शनाला जास्तीतजास्त वेळा जाणे इत्यादी करणे.नमस्कार, आरती, वाढदिवस, मुंज इत्यादी धार्मिक कृती करणे गुढीपाडवा, गणेश चतुर्थी, दसरा इत्यादी सण, उत्सव आणि व्रते शास्त्रानुसार साजरे करणे. या धार्मिक कृतींमुळे ईश्वराविषयी भक्तीभाव निर्माण व्हायला साहाय्य होते.

आ. स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आणि गुण-संवर्धन करणे

प्रत्येक व्यक्तीमध्ये राग, चिडचिडेपणा, आळस, विसराळूपणा इत्यादी स्वभावदोष कमी-अधिक प्रमाणात असतात. स्वभावदोषांमुळे स्वतःच्या तसेच इतरांच्या साधनेची कशी हानी होते, हे कळण्यासाठी एक उदाहरण पाहू. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव पुष्कळ रागीट आहे आणि लहान लहान कारणांवरूनही तो दुसऱ्यांवर रागावत असतो. त्यामुळे त्याची मनःस्थिती बिघडल्याने कोणतीही कृती किंवा सेवा करतांना त्याला मनाची एकाग्रता साधता येत नाही आणि त्याच्या हातून चुका होऊन त्याची कार्यक्षमता अल्प होते. तसेच रागावण्यामुळे त्याला साधनेतून मिळणारे समाधान टिकवता येत नाही. असा मनुष्य जेव्हा इतरांशी रागावून बोलतो, तेव्हा इतरांना वाईट वाटते किंवा ते दुःखी होतात. याची परिणती इतरांचीही मनःस्थिती बिघडण्यात होते. तसेच पुढे इतरांना त्याच्याशी बोलतांना एकप्रकारचा ताण जाणवतो, म्हणजेच इतरांना त्याच्याशी सुसंवाद साधता येत नाही. याचा परिणाम समष्टीच्या एकूण कार्यक्षमतेवर होतो.

स्वभावदोष असण्याचा आणखी एक तोटा म्हणजे स्वभावदोषांचा लाभ उठवून वाईट शक्तींचे त्रास बळावू शकतात. म्हणून प्रत्येकानेच स्वभावदोष दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते. साधना करतांना आपण साधनेतील पुढचे पुढचे टप्पे जरी गाठत असलो, तरी आपल्यातील स्वभावदोष पूर्णतः दूर होईपर्यंत त्यांच्या निर्मूलनासाठी सातत्याने प्रयत्न चालूच ठेवावे लागतात.

साधकामधील स्वभावदोष हे त्याच्या साधनेसाठी अडथळे असतात. त्याचबरोबर त्याचे काही गुण साधनेसाठी साहाय्यक ठरतात. त्यामुळे साधनेमध्ये स्वभावदोष-निर्मूलनाला जितके महत्त्व आहे, तितकेच गुण-संवर्धनालाही आहे. थोडक्यात साधनेसाठीचे हे दोन प्रयत्न म्हणजे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यासाठी ‘गुरुकृपायोगा’नुसार साधनेच्या आठ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्याचा उल्लेख केवळ ‘स्वभावदोष-निर्मूलन’ असा न करता ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि गुण-संवर्धन’ असा करावा.

साधकांनीही स्वभावदोष-निर्मूलनासह गुण-संवर्धन प्रक्रियाही नियमित राबवावी; कारण गुण असल्याविना साधना करता येत नाही. गुणांमुळे मनोबल वाढते. गुणवृद्धी झाली की, ‘साधना करूनही प्रगती का होत नाही’, अशा प्रकारचे विचार किंवा या विचारांनी येणारी निराशाही येत नाही. सर्वसाधारणतः प्रत्येकालाच ताण येणे, काळजी करणे, निराशा, मनोराज्यात रमणे यांसारख्या स्वभावदोषांवर मात करावी लागते. त्यामुळे यांसारखे स्वभावदोष पुष्कळ असणाऱ्यांनी प्रामुख्याने स्वभावदोष-निर्मूलनावर भर द्यावा आणि यांसारखे स्वभावदोष अल्प असणाऱ्यांनी स्वभावदोष-निर्मूलनाची प्रक्रिया राबवून गुण-संवर्धन प्रक्रियेवर भर द्यावा.

 

इ. नामजप

पूजा, आरती, भजन, पोथीवाचन इत्यादी उपासनाप्रकारांमुळे देवतेची कृपा होते आणि देवतेच्या तत्त्वाचा लाभ मिळतो; पण या सर्व उपासना करण्याला मर्यादा असल्याने लाभही मर्यादित प्रमाणातच मिळतो. देवतेच्या तत्त्वाचा लाभ सातत्याने मिळण्यासाठी देवतेची उपासनाही सतत व्हावी लागते आणि अशी सतत होऊ शकेल अशी उपासना म्हणजे ‘देवतेचा नामजप’. नामजप म्हणजे ईश्वराच्या नामाचे सतत स्मरण करणे. कलियुगासाठी नामजप ही सोपी आणि सर्वोत्तम उपासना आहे. नामजप हा गुरुकृपायोगानुसार करावयाच्या साधनेचा पाया आहे. गुरुप्राप्ती झाली असल्यास आणि गुरूंनी गुरुमंत्र दिला असल्यास तोच जपावा, अन्यथा ईश्वराच्या अनेक नावांपैकी कुलदेवतेचा नामजप करावा. कुलदेवतेच्या नामजपासह दत्ताचा नामजपदेखील करणे आवश्यक आहे.

ई. भावजागृतीसाठी प्रयत्न करणे

‘नाथा तुझ्या पायी जैसा ज्याचा भाव । तैसा त्यासी ठाव चरणी तुझ्या ।।’, असे प.पू. भक्तराज महाराजांनी सांगितले आहे. यावरून साधकाच्या दृष्टीने भावाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे, हे लक्षात येते. आपल्या अंत:करणात भगवंताविषयी ओढ निर्माण होणे, याला ‘भगवंताविषयी भाव असणे’ असे म्हणतात. जितक्या लवकर आपल्यामध्ये भाव निर्माण होईल आणि तो जितका जास्त जागृत राहील, तितक्या लवकर आपण ईश्वराच्या जवळ जाऊ शकतो. भाव वाढवण्यासाठी मन आणि बुद्धी यांच्या स्तरावर सतत कृती करत राहिल्यास, भाव निश्चितपणे वाढतो.

उ. सत्संग

सत्संग म्हणजे सत्चा संग, सात्त्विक वातावरण. सत्संग हा साधकांचा किंवा संतांचा असतो.

महत्त्व : एकदा वसिष्ठऋषी आणि विश्वामित्रऋषी यांच्यात वाद झाला की, सत्संग श्रेष्ठ कि तपश्चर्या ? वसिष्ठऋषी म्हणाले, ‘‘सत्संग’’; तर विश्वामित्र-ऋषी म्हणाले, ‘‘तपश्चर्या’’. वादाचा निकाल लावण्यासाठी ते देवांकडे गेले. देव म्हणाले, ‘‘शेषच तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल.’’ तेव्हा दोघेही शेषनागाकडे गेले. त्यांनी प्रश्न विचारल्यावर शेष म्हणाला, ‘‘माझ्या डोक्यावरचा पृथ्वीचा भार थोडा तुम्ही हलका करा. मग मी विचार करून उत्तर देईन.’’ यावर विश्वामित्रांनी संकल्प केला, ‘माझ्या सहस्त्र वर्षांच्या तपश्चर्येचे फळ मी अर्पण करतो. पृथ्वीने शेषाच्या डोक्यावरून थोडे वर जावे.’ तरी पृथ्वी किंचितही हलली नाही. मग वसिष्ठऋषींनी संकल्प केला, ‘अर्ध घटकाभराच्या (बारा मिनिटांच्या) सत्संगाचे फळ मी अर्पण करतो. पृथ्वीने भार हलका करावा.’ पृथ्वी लगेच वर उचलली गेली. यातून सत्संगाचे महत्त्व कळते.

लाभ : सत्संगाला येणाऱ्या सर्व साधकांची एकत्रित सात्त्विकता जास्त झाल्याने तेथे येणाऱ्या प्रत्येकालाच त्याचा लाभ होतो, म्हणजे प्रत्येकातीलच रज-तम हळूहळू न्यून होऊ लागतात. नामजपामुळे मिळणारा आनंद सत्संगात गेल्यावर नामजप न करताही आपोआप मिळू लागतो, अशी अनुभूती ५० टक्के पातळीला येते.

ऊ. सत्सेवा

देवळांची स्वच्छता करणे, संतसेवा इत्यादी सत्सेवा आहेत. सत्सेवेच्या संदर्भात पुढील सूत्रे लक्षात घ्यावेत. सेवा ही सत्सेवा हवी. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपर्यंत वाढल्याविना सेवा मनापासून होत नाही. तोपर्यंत ती बुद्धीने साधना म्हणून केलेली असते. सत्सेवेत दुसऱ्याचे मन संतुष्ट करण्यास प्राधान्य दिल्यामुळे स्वतःच्या आवश्यकता हळूहळू अल्प होऊन साधक निवृत्तीपरायण होतो. असत् ची सेवा, उदा. रोग्यांची सेवा करतांना ती मिथ्या गोष्टीला सत्य मानून केली जाते. असत् सेवेने देवाणघेवाण संबंधही निर्माण होतात. तसेच त्यात ‘मी सेवा करतो’ हा अहंही असतो; त्यामुळे तिचा साधना म्हणून विशेष उपयोग होत नाही. याउलट सत्सेवेमुळे अहं-निर्मूलन होण्यास साहाय्य होते. गुरुसेवा ‘अहं’ला विसरण्यासाठी केली जाते. सत्सेवा करता करता साधकाची पातळी ५५ टक्क्यांपर्यंत वाढली की, एखादे उन्नत त्याचा शिष्य म्हणून स्वीकार करतात.

ए. अहं-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे

सर्वसाधारण व्यक्तीमध्येच नव्हे, तर साधकामध्येही कोणत्या ना कोणत्या प्रकारचा अहं हा असतोच. ईश्वर म्हणजे शून्य अहं. आपल्यात अहंचा थोडा जरी अंश असला, तर आपण ईश्वराशी कधीही एकरूप होऊ शकणार नाही. म्हणून साधना करत असतांना अहं-निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते.

ऐ. सत् साठी त्याग

आध्यात्मिक उन्नतीसाठी तन, मन आणि धन यांचा त्याग करायचा असतो. व्यक्ती प्रथम तनाने शारीरिक सेवा आणि मनाने नामजप करू शकते. पुढे ती साधना करत राहिल्यास धनाचाही थोडाफार त्याग करू शकते. सर्कशीतील उंच झुल्यावरील मुलीने तिच्या हातातील झुल्याची काठी सोडल्याविना दुसऱ्या झुल्याच्या काठीला उलटा टांगलेला माणूस तिला धरू शकत नाही. त्याप्रमाणे साधकाने सर्वस्वाचा त्याग केल्याविना ईश्वर त्याला आधार देत नाही.

त्याग करणे म्हणजे वस्तूंचा त्याग करणे नव्हे, तर ‘त्या वस्तूंविषयीची आसक्ती सुटणे’, हा त्याग होय. आरंभी गुरु शिष्याला त्याच्याकडे असलेल्या वस्तूंचा त्याग करायला लावतात. शेवटी त्याची आसक्ती सुटली की, त्याला भरपूर देतात. छत्रपती शिवाजी महाराजांना आसक्ती नव्हती; म्हणूनच समर्थ रामदासस्वामींनी शिवाजीने त्यांना अर्पण केलेले राज्य महाराजांना परत दिले.

दान (अर्पण) हे नेहमी संतांना किंवा सत्कार्यासाठी का द्यावे ?

दान हे नेहमी ‘पात्रे दानम्’ म्हणजे ‘सत्पात्रे दानम्’ या स्वरूपाचे असावे लागते. या जगात संतांपेक्षा अधिक सत्पात्र कोणीच नाही; म्हणून जे काही दान करायचे, ते त्यांनाच अर्पण करावे. हे उपासनाकांडातील नामधारकालाच जमू शकते. कर्मयोगाचा अधिकारी भिकाऱ्याला अन्न दे, शाळा-रुग्णालयांना दान दे’, असे भावनेपोटी करतो. त्याने केवळ पुण्य मिळते. मुमुक्षूला पाप-पुण्य दोन्ही नको असते; कारण पुण्यामुळे स्वर्ग मिळतो, मोक्ष नव्हे. तरीही साधनेच्या आरंभी धनाचा कर्मयोग्याप्रमाणे असा त्याग निश्चित करावा.

ओ. साक्षीभाव

८० टक्के पातळीला सर्वत्र आणि स्वतःच्या उन्नतीकडेही, ‘सर्व गुर्वेच्छेने घडत आहे’, या भावाने पहाता येते.

 

३. समष्टी साधना (संपूर्ण
समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करावयाचे प्रयत्न)

साधनेसाठीचा आपत्काल म्हणजे साधनेतील अडथळ्यांनी  युक्त असा साधनेसाठीचा प्रतिकूल काळ. सध्या वाढत असलेले रज-तमाचे प्रदूषण आणि धर्महानी, राष्ट्राची अराजकतेकडे होत असलेली वाटचाल इत्यादींमुळे सध्याचा काळ हा आपत्काल बनला आहे. आपत्काळात केवळ व्यष्टी साधनेने ईश्वरप्राप्ती करून घेणे कठीण असते. यासाठी व्यष्टी साधनेला समष्टी साधनेची जोड देणे अत्यावश्यक असते. समष्टी साधनेची अंगे पुढीलप्रमाणे आहेत.

अ. अध्यात्मप्रसार : सर्वोत्तम सत्सेवा

१. महत्त्व

एकदा एका गुरूंनी त्यांच्या दोन शिष्यांना थोडे गहू दिले आणि सांगितले, ‘‘मी परत येईपर्यंत हे गहू नीट सांभाळा.’’ एक वर्षाने परत आल्यावर गुरु पहिल्या शिष्याकडे गेले आणि त्याला विचारले, ‘‘गहू नीट ठेवले आहेस ना ?’’ त्यावर त्या शिष्याने ‘हो’ म्हणून गहू ठेवलेला डबा आणून दाखवला अन् म्हणाला, ‘‘आपण दिलेले गहू जसेच्या तसे आहेत.’’ त्यानंतर गुरु दुसऱ्या शिष्याकडे गेले आणि त्याला गव्हाविषयी विचारले. तेव्हा तो शिष्य गुरूंना जवळच्या शेतावर घेऊन गेला. शेतात गव्हाच्या कणसांनी डवरलेले पीक दिसत होते. ते पाहून गुरूंना आनंद झाला. असेच आपल्या गुरूंनी दिलेले नाम आणि ज्ञान आपण इतरांना देऊन वाढवले पाहिजे.

तुलनात्मक महत्त्व : पुढील कोष्टकात शिष्याच्या कोणत्या कृतीने किती प्रमाणात गुरुकृपा होऊ शकते, हे दिले आहे.

शिष्याची कृती गुरुकृपा (टक्के)
१. नुसते दर्शन घेणे
२. केवळ अध्यात्मविषयक प्रश्न विचारणे १०
३. आश्रमातील कामे करणे ४०
४. अध्यात्माचा अर्धवेळ परिणामकारक प्रसार करणे ७०
५. अध्यात्माचा पूर्णवेळ परिणामकारक प्रसार करणे १००

 

२. अध्यात्मप्रसार कसा करावा ? : ‘धर्म आणि साधना यांविषयी मलाच माहिती नाही, तर मी अध्यात्माचा प्रसार कसा काय करू शकेन ?’, असे काही जणांना वाटण्याची शक्यता असते; पण ते चुकीचे आहे. कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीने उचलला, तेव्हा गोपगोपींनी आपापल्या काठ्या लावून पर्वत उचलून धरायला आपल्या परीने साहाय्य केलेच होते. गुरु म्हणजे ईश्वर धर्मग्लानी दूर करणार आहेच; पण आपणही आपला खारीचा वाटा उचलायला हवा. ज्याला अध्यात्माचा अभ्यास करून इतरांना शिकवता येते, त्याने ते करावे आणि ज्याला आर्थिक साह्य करता येईल, त्याने ते करावे.

आ. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती

सध्या दहशतवादी आणि नक्षलवादी यांनी देशात थैमान माजवले आहे. दारिद्र्य, जात्यंधता, सामाजिक विषमता, भ्रष्टाचार, आरक्षण यांसारख्या अनेक समस्यांनी देशाला घेरले आहे. थोडक्यात राष्ट्र रसातळाला जात आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण आहे. धर्म नष्ट झाला, तर राष्ट्र आणि पर्यायाने आपण सर्व नष्ट होऊ. यासाठी राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या संदर्भात समाजाला जागृत करणे महत्त्वाचे ठरते.

इ. हिंदुसंघटन

हिंदु धर्माला विरोध करायची वेळ आल्यावर धर्मद्रोही एकत्र येतात. या तुलनेत हिंदु धर्माच्या आणि राष्ट्राच्या नावाखाली हिंदूंचे संघटन होण्याचे प्रमाण फार अल्प आहे. हिंदूंचे संघटन झाले, तर हिंदु धर्माचे आणि राष्ट्राचेही रक्षण होईल. यासाठी हिंदुसंघटनासाठी प्रयत्न करणे, हाही समष्टी साधनेचा महत्त्वाचा भाग आहे.

ई. इतरांविषयी प्रीती

साधना करता करता आध्यात्मिक पातळी ७० टक्के झाल्यावर इतरांविषयी प्रीती वाटायला लागते. प्रीती म्हणजे निरपेक्ष प्रेम. व्यवहारातील प्रेमात अपेक्षा असते. साधना केल्याने सात्त्विकता वाढल्यामुळे सान्निध्यातील चराचरसृष्टीला संतुष्ट करण्याची वृत्ती निर्माण होते. प्रत्येक वस्तूत परमेश्वराचे रूप दिसू लागते. ‘वसुधैव कुटुंबकम् ।’ म्हणजे विश्वाला एका प्रेमळ कुटुंबाचे स्वरूप येते. अशा रीतीने प्रेमात विशालता येऊन दुसऱ्यांविषयी प्रीती निर्माण होते. हे लवकर साध्य होण्यासाठी आधी प्रयत्नपूर्वक प्रेम करावे लागते. यासाठी सत्संगात रहाणे महत्त्वाचे असते. प्रथम सत्संगात येणाऱ्या साधकांविषयी प्रीती वाटते, नंतर इतर संप्रदायांतील साधकांविषयी, पुढे साधना न करणाऱ्यांविषयी आणि शेवटी सर्वच प्राणीमात्रांविषयी प्रीती निर्माण होते.

उ. काळानुसार आवश्यक असा श्रीकृष्णाचा नामजप करणे

सध्या काळानुसार श्रीकृष्णाचे तत्त्व सर्वांत अधिक प्रमाणात कार्यरत आहे; यासाठी ‘नामजप’ या एका घटकाचा विचार करता समष्टी साधना न्यूनतम (कमीतकमी) २ वर्षे केलेल्या साधकांनी काळानुसार आवश्यक म्हणून प्रतिदिनी २ घंटे ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप करावा.

 

४. अष्टांग साधनेचा क्रम पालटण्याची कारणे – सर्व कृती मनामुळे होणे

अ. मानवाकडून जी काही कृती घडते, ती त्याच्या मनामुळे घडते. शरिराकडून होणारी प्रत्येक कृती मनामुळे होते. मन चांगले असल्यास, म्हणजे मनात स्वभावदोष आणि अहं नसल्यास शरिराकडून योग्य कृती होते आणि स्वभावदोष आणि अहं असल्यास शरिराकडून अयोग्य कृती होते.

आ. कोणत्याही योगमार्गाने साधना केली, तरी जोपर्यंत स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन हे काही प्रमाणात साध्य होत नाहीत, तोपर्यंत साधनेत प्रगती करणे अतिशय कठीण होते, उदा. ध्यानयोगाने साधना करणार्‍याने ध्यान लावण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी या दोषांमुळे त्याला ते वर्षानुवर्षे शक्य होत नाही. स्वभावदोष निर्मूलन आणि अहं निर्मूलन काही प्रमाणात साध्य झाल्यावर साधनेत खर्‍या अर्थाने प्रगती होते.

इ. अष्टांग साधनेतील स्वभावदोष आणि अहं हे दोन दुर्गुण आहेत, तर इतर सहा गुण आहेत. दुर्गुण गेल्याशिवाय गुणांचा विस्तार होऊ शकत नाही.

ई. गुण वाढवून दोष घालवण्यास बरीच वर्षे लागतात. याउलट दोष काढल्यावर गुण लवकर वाढतात.

 

५. कलियुगात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन महत्त्वाचे

आधीच्या युगात यांचे प्रमाण अल्प असायचे. त्यामुळे स्वभावदोष आणि अहं निर्मूलन आवश्यक नव्हते. तेव्हा विविध योगमार्गांनी साधना करता यायची. कलियुगात स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे यांचे निर्मूलन आधी करावे लागते. नाहीतर साधना नीट होत नाही.

संदर्भ : सनातन – निर्मित ग्रंथ ‘गुरुकृपायोगानुसार साधना’