श्राद्ध करण्यासाठी काही जणांकडे गेल्यानंतर काही सूत्रे लक्षात आली. त्याविषयी नेमके कसे असायला हवे, ते येथे देत आहे.

१. पितरांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी श्राद्ध करावे !
अपसमज : काही जणांकडे गेल्यावर ते असे सांगतात, ‘आम्ही गयेला श्राद्ध करून आलो आहोत. त्यामुळे परत करायची आवश्यकता नाही. त्यामुळे आता आम्ही श्राद्ध करू शकत नाही.’
उत्तर : प्रत्यक्षात गयेला श्राद्ध केल्याचे अक्षय फळ असते, हे योग्यच आहे; परंतु मानवाला जसे प्रतिदिन जेवावे लागते, त्याच पद्धतीने पितरांनासुद्धा अन्न-पाणी इत्यादी द्यावेच लागते. अन्यथा त्याविना ते उपाशी रहातात आणि स्वतःच्या कुटुंबियांवर क्रोधित होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळावेत, यासाठी श्राद्ध करावे. (हे श्राद्ध तीर्थश्राद्ध, म्हणजे गया, प्रयाग, काशी, कुरुक्षेत्र अशा पवित्र स्थळावर केले जाणारे आहे, तसेच आपण एखाद्या संगमावर गेल्यावर करायचे श्राद्ध म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर केलेले श्राद्ध हेसुद्धा विशेष पुण्यकारक असते. संगम श्राद्ध, म्हणजे २ किंवा ३ नद्यांच्या संगमावर करायचे श्राद्ध. असे विविध श्राद्ध ही पुण्यकारक आहेत, असे सांगितले आहे.)
२. श्राद्ध करण्याचा नेमका उद्देश
धर्मशास्त्राच्या दृष्टीने विचार करता श्राद्धाचा उद्देश ‘आपण केलेल्या श्राद्ध कर्माने संतुष्ट होऊन पितरांचे आपल्या कुळाला आशीर्वाद मिळावेत’, हा असतो. बर्याच जणांकडे श्राद्धाला गेल्यावर असे लक्षात येते की, ‘आपण हे श्राद्ध पितरांना सद्गती मिळावी’, यासाठी करत आहोत. असे जरी असले, तरी पितरांना सद्गती देणे, हे आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात नसून ते केवळ भगवंताच्या कृपाशीर्वादाने होते. त्यामुळे आपण श्राद्ध करण्याचे कर्तव्य करण्यातून स्वतःचे धर्माचरण होते.
३. आध्यात्मिक उन्नतांचेही श्राद्ध करणे महत्त्वाचे !
अपसमज : एके ठिकाणी श्राद्धासाठी गेल्यावर समजले, ‘आमचे आई-वडील तर आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत होते, तर आम्ही श्राद्ध कशासाठी करायचे ? ते तर आता आम्हाला काही त्रास देणार नाहीत.’
उत्तर : या लेखात म्हटल्याप्रमाणे कुणाला तरी मुक्ती मिळावी, हा श्राद्धाचा मूळ उद्देश नसून आपल्या पितरांचे (आई-वडील इत्यादी) यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत, हा उद्देश असतो. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतांचे आपण श्राद्ध केल्याने त्याचा लाभ आपल्या संपूर्ण परिवाराला मिळतो, तसेच श्राद्ध करण्याचा संस्कार पुढील पिढ्यांवर व्हावा, यासाठी आध्यात्मिक उन्नतांचेही श्राद्ध करणे महत्त्वाचे आहे.
भौतिक जीवनातील सर्व गोष्टी, सुख-सुविधा उदाहरणार्थ शिक्षण, नोकरी, लग्न, संतती, संपत्ती इत्यादी सर्व प्रकारच्या गोष्टी आपल्याला पितरांच्या आशीर्वादामुळेच मिळत असतात. यासह आध्यात्मिक जीवनातील प्रगती ही गुरूंच्या कृपेमुळे होत असते. त्यामुळे दैनंदिन जीवनात आपल्याला या सर्व भौतिक गोष्टींची जशी नितांत आवश्यकता भासत असते, तसे पितरांचे आशीर्वाद अखंड लाभावेत, यासाठी पितृपक्षात त्यांच्यासाठी श्राद्ध अवश्य करावे. ज्याप्रमाणे आपण गणेशोत्सव आला की, घरोघरी गणपतीची पूजा करतो; नवरात्र आले की, देवीची पूजा, उपवास, उत्सव इत्यादी करतो, त्याप्रमाणेच श्राद्धाविषयीही आहे.
– श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर, फोंडा, गोवा.
पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारा अपप्रचार आणि त्याचे खंडण