कलियुगातील दोष नष्ट करण्यासाठी तपस्या करणार्‍या ऋषिगणांची विघ्ने हरण करणारा इडगुंजी (कर्नाटक) येथील श्री महागणपति !

Article also available in :

उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर तालुक्यात इडगुंजी या गावी श्री महागणपति मंदिर आहे. त्या मंदिराचा इतिहास येथे जाणून घेऊया.

१. कलियुगातील दोष नष्ट करण्यासाठी ऋषिगणांनी कुंजवनात तपश्‍चर्या करणे

द्विभुजा श्री गणेशमूर्ती

द्वापरयुगाच्या शेवटी ऋषिगण कलियुगाच्या आगमनाविषयी चिंतित होते. वालखिल्य ऋषि यांनी अन्य ऋषींसमवेत भगवान श्रीकृष्णाला कलियुगातील दोषांचा नाश करण्याविषयी प्रार्थना केली, तसेच महान तपश्‍चर्या आरंभली. त्या वेळी त्यांच्या तपश्‍चर्येत विविध अडथळे येऊ लागले. ऋषींनी त्यांच्या तपस्येत येणारे अडथळे नारदमुनींसमोर कथन केले. महर्षि नारदांनी ऋषींना विघ्नेश्‍वराची उपासना करण्यास सांगितले. वालखिल्य ऋषि यांनी नारदांना विघ्नेश्‍वराची उपासना करण्यासाठी योग्य जागा दाखवण्याची विनंती केली. त्या वेळी शरावतीच्या डावीकडे काही मैलांच्या अंतरावर महर्षि नारदांनी जागा निश्‍चित केली. त्या जागेचे नाव ‘कुंजवन’ असे ठेवले गेले. महर्षि नारदांनी त्या स्थानाचे महत्त्व सांगितले की, पृथ्वी नष्ट करण्यासाठी तपस्या करणार्‍या असुरांचा नाश करण्यासाठी येथे पवित्र त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णु आणि महेश हेही प्रकटले होते. त्रिमूर्तींनी तेथे आध्यात्मिक ऊर्जा असलेले ‘चक्रतीर्थ’ आणि ‘ब्रह्मतीर्थ’ म्हणून ओळखले जाणारे कुंडही सिद्ध केले होते.

 

२. ऋषींच्या तपस्येतील अडथळे दूर होण्यासाठी श्री गणेशाने कुंजवनात वास्तव्य करणे

नारदांनी तेथे ऋषींच्या साहाय्याने ‘देवीतीर्थ’ नावाचा आणखी एक तलाव बनवला. महर्षि नारदांनी पार्वतीमातेला श्री गणेशाला त्या कुंजवनात पाठवण्याची विनंती केली. महर्षि नारद आणि ऋषिगणांनी केलेल्या प्रार्थनेनंतर श्री गणेश तेथे प्रकटले. ऋषींनी केलेल्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन श्री गणेशाने सर्व ऋषींच्या उपासनेतील अडथळे दूर होण्यासाठी तेथेच वास्तव्य केले. तेथे आणखी एक कुंड निर्माण केले गेले. ते आता ‘गणेशतीर्थ’ म्हणून प्रसिद्ध आहे. हेच स्थान आता इडगुंजी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे चौथ्या किंवा पाचव्या शतकात भाविकांनी श्री गणेश मंदिर उभारले.

 

३. उभी असलेली द्विभुजा श्री गणेशमूर्ती !

इडगुंजी मंदिरातील मुख्य मूर्तीही चौथ्या किंवा पाचव्या शतकातील आहे. ही द्विभुजा श्री गणेशमूर्ती पाषाणावर उभी आहे. श्री गणेशाच्या उजव्या हातात कमळ आहे आणि दुसर्‍या हातात मोदक आहे. सामान्यतः श्री गणेशाचे वाहन मूषक प्रत्येक मूर्ती आणि प्रतिमा यांत दिसतेच. या ठिकाणी मात्र मूषकाची प्रतिमा नाही. ही मूर्ती ३३ इंच उंच आणि २३ इंच रुंदीची आहे.

(संदर्भ : संकेतस्थळ)

Leave a Comment