राधा-कृष्ण प्रेम यांतील वास्तव जाणा !

Article also available in :

उत्तर भारतातील अनेक हिंदीभाषी संत-कवींनी भगवान् श्रीकृष्ण आणि राधा यांच्याविषयी श्रृंगाररसपूर्ण काव्यरचना केल्या. त्यानंतर हिंदी आणि अन्य भाषेतील कवींनीही अशा प्रकारची अनेकानेक गीते रचली. त्यांचे लावण्य, त्यांचा श्रृंगार, त्यांचे आपसातील संवाद, त्यांच्या भावना, या सर्वांचे रसभरित वर्णन करणारी पुष्कळ काव्यरचना केली गेली आहे. हल्लीचे काही कथावाचक, मठाधीश, संत, पीठाधीश्‍वर इत्यादी श्रीकृष्ण आणि राधा यांच्या कथा रंगवून सांगतात. अशाप्रकारची काव्यरचना, लेख, चित्रपटातील दृश्ये, दूरदर्शनवरील मालिकांतील दृश्ये इतकी अधिक झाली आहेत की, काही लोकांच्या मनात श्रीकृष्णांची प्रतिमा एक प्रेमवीर अशी बनली आहे.

ह्या संतकवींनी, महात्म्यांनी आणि सामान्यजनांनी श्रीकृष्णचरित्रातून काय घ्यायचे, ही त्यांच्या आवडीनुसार त्यांची निवड आहे. श्रीकृष्णांचे व्यक्तित्व केवळ अष्टांगी (अष्टपैलू) नाही, तर त्याला अनंत अंगे आहेत. वैभव, बळ, यश, संपत्ती, ज्ञान, वैराग्य, हृदयंगम बासरीवादन, लावण्य, चातुर्य, भगिनीप्रेम, भ्रातृप्रेम, मित्रप्रेम, युद्धकौशल्य, सर्वसिद्धीसंपन्नता – त्यांच्यात काय नाही ? सर्व काही आहे, सर्वच पराकाष्ठेचे आहे; पण असे असूनही ते सर्वांपासून पूर्ण अलिप्त होते. भगवान् श्रीकृष्णांच्या मायातीत, निर्लिप्त स्वरूपाचे ज्ञान सर्वसाधारण लोकांना नसल्याने ते अशा लौकिक, स्त्री-पुरूष भेदावर आधारित श्रृंगाररसपूर्ण कथांमध्येच रंगून जातात. श्रीकृष्णांविषयी पुढील गोष्टीही लक्षात घेणे आवश्यक होईल.

 

१. श्रीकृष्णांचे विवाह प्रेमविवाह नव्हते

श्रीकृष्णांचा एकही विवाह प्रेमविवाह नव्हता. त्यांच्या विवाहांची त्रोटक माहिती पुढे दिली आहे.

१ अ. रूक्मिणी

विदर्भराजकुमारी रूक्मिणीची इच्छा श्रीकृष्णांशी विवाह करण्याची होती. तिच्या भावाने तिचे लग्न शिशुपालशी ठरवले होते. तिने श्रीकृष्णांना पत्र आणि निरोप पाठवून स्वत:ला घेऊन जाण्यास कळवले. श्रीकृष्णांनी तिला पाहिलेलेही नव्हते. श्रीकृष्ण येऊन तिला घेऊन गेले.

१ आ. जाम्बवन्ती

श्रीकृष्ण स्यमन्तक मण्याच्या शोधात असतांना जाम्बवान्शी झालेल्या युद्धात जाम्बवान् हरल्यावर आधीचे श्रीरामच आता श्रीकृष्ण आहेत, हे ओळखून त्याने मणी आणि आपली कन्या जाम्बवन्ती श्रीकृष्णांना दिली.

१ इ. सत्यभामा

सत्राजितने श्रीकृष्णांवर त्याचा स्यमन्तक मणी चोरल्याचा आरोप केला होता. पुढे सत्य कळल्यावर पश्‍चाताप होऊन आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह श्रीकृष्णांशी लावला.

१ ई. कालिन्दी

सूर्यदेवाची कन्या कालिन्दी हिने श्रीकृष्णांच्या प्राप्तीसाठी यमुनेच्या किनारी कठोर तपश्‍चर्या केली. श्रीकृष्णांनी तिचा स्वीकार केला.

१ उ. मित्रविंदा

अवन्ती (उज्जैन)चे राजा विन्द आणि अनुविन्द ह्यांनी आपली बहिण मित्रविंदा हिचे स्वयंवर मांडले होते; पण तिची इच्छा श्रीकृष्णांना पती बनवण्याची होती. श्रीकृष्ण तिला घेऊन गेले.

१ ऊ. सत्या (नाग्नजिती)

कोसलदेश (अयोध्या)चे राजा नग्नजित् ह्यांची कन्या सत्या हिच्या स्वयंवरात सात दुर्दान्त (दुर्दम्य) बैलांना वेसण घालण्याचा पण जिंकून श्रीकृष्णांनी विवाह केला.

१ ए. भद्रा

केकय देशाच्या संतर्दनने आपली बहिण भद्रा हिच्या विवाहाचा प्रस्ताव देऊन स्वत: लग्न लावून दिले.

१ ऐ. लक्ष्मणा

मद्रप्रदेशची राजकन्या लक्ष्मणा हिचे स्वयंवर होते. पण तिची इच्छा श्रीकृष्णांशी विवाह करण्याची होती, म्हणून श्रीकृष्ण तिला घेऊन गेले.

१ ओ. १६१०० राजकन्या

प्राग्ज्योतिषपुरचा राजा भौमासुर (नरकासुर) याने १६१०० राजकन्यांचे अपहरण केले होते. भौमासुराचा वध केल्यानंतर त्या कन्या अस्वीकार्य आणि अपमानित होऊ नयेत म्हणून त्यांच्याशी विवाह करून श्रीकृष्णांनी त्यांना समाजात प्रतिष्ठा दिली.

 

२. मथुरेला गेल्यावर पुन्हा कधीही बरसानाला न जाणे

वयाच्या बाराव्या वर्षी श्रीकृष्ण व्रजभूमी सोडून मथुरेला गेले. ते आयुष्यात पुन्हा कधीही राधेला किंवा गोपींना भेटण्यासाठी, मथुरेपासून अगदी जवळ असूनही, बरसाना किंवा व्रजभूमीला गेले नाहीत.

 

३. राधा विवाहित आणि वयाने मोठी असणे

श्रीकृष्णांपेक्षा राधा वयाने मोठी होती आणि तिचे लग्न झालेले होते.

 

४. नवधा भक्तीत ‘राधाभाव’ हा प्रकार नसणे

भक्तीमार्गात नवधा भक्ती प्रसिद्ध आहे. त्यातील प्रत्येक प्रकाराने अनन्य श्रद्धेने भक्ती केली, तर ती ईश्‍वरापर्यंत पोहोचवतेच; पण ह्या नवधा भक्तीत राधेची वर्णन केली जाते तशी भक्ती सम्मिलित नाही.

 

५. भागवतपुराणात राधेचा उल्लेखही नसणे

‘महाभारत, हरिवंशपुराण, विष्णुपुराण आणि पुराणांतील श्रेष्ठ आणि सात्त्विक अशा भागवतपुराणात राधेचा उल्लेख नाही.’ (संदर्भ : दि. १६.८.२०१७ चे दैनिक सनातन प्रभात पृष्ठ क्र. ७) (टीप)

 

६. गीतेत सांगितलेल्या अनेक
प्रकारच्या भक्तींमध्ये राधाभाव सम्मिलित नसणे

भगवद्गीतेत भगवान् श्रीकृष्णांनी अनेक प्रकारची भक्ती सांगितली आहे; पण राधेची कृष्णांविषयीची जशी प्रेमाभक्ती अथवा मधुराभक्ती सांगितली जाते, तशी भक्ती सांगितली नाही.

 

७. महाराष्ट्रात राधा-कृष्णाची नव्हे, तर विठ्ठल-रखुमाईची देवळे असणे

हिंदीभाषी प्रांतामध्ये राधा-कृष्णाची मंदिरे असतात; पण महाराष्ट्रात विठ्ठल-रुखुमाईचे महत्त्व आहे. विठ्ठल हे श्रीकृष्णांचेच नाव. ते विष्णूंचे सोळा कलांचे पूर्णावतार होते. रूक्मिणी ही लक्ष्मीचा अवतार. महाराष्ट्रात मराठी लोकांनी राधा-कृष्णाची देवळे बांधली नाहीत.

 

८. तात्त्विक विवेचन

राधा-कृष्णाच्या कथा काल्पनिक असोत वा अतिरंजित केले गेलेले वास्तव असो, राधाभाव वाईट नाही आणि निरुपयोगीही नाही. तो स्वभावदोष घालवण्यात साहाय्यक आहे; पण तो चित्तशुद्धीच्या अनेक साधनांपैकी एक साधन आहे, साध्य नाही. भाव कोणताही असो, ते ईश्‍वराचे स्वरूप नाही, अंतिम ध्येय नाही. साध्याजवळ पोहोचल्यावर साधन सुटणे आवश्यक असते (गीता अध्याय ६ श्‍लोक ३). ‘पातञ्जलयोगदर्शन’ मध्येही चित्ताच्या वृत्तीचा निरोध सांगितला आहे. (समाधिपाद १, सूत्र २)

(टीप – अठरा महापुराणांतील सहा सत्त्वप्रधान, सहा रजप्रधान आणि सहा तमप्रधान मानली जातात.)

– श्री. अनंत आठवले (२८.१०.२०१७)

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment