पुणे : राम गणेश गडकरी यांनी केवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीच नाही, तर स्त्री-पुरुष समानतेच्याही विरोधात लिहिले आहे. त्यांच्या लिखाणात सर्वत्र जातीवाचक उल्लेख आहेत. हे लिखाण राज्यघटनेच्या गाभ्याला धक्का लावणारे आहे. (असे आहे तर पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे, डॉ. आ.ह. साळुंखे यांनी केलेले ब्राह्मणद्वेषी लिखाण हेे राज्यघटनेला धक्का लावणारे नाही का ? ते कोणत्या राज्यघटनेत बसते ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) असे असतांना सरकारने ‘पुतळा प्रकरणातील ‘मास्टरमाईंड’ शोधून काढू’, असे म्हटले आहे. त्याआधी सरकारने डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ. कलबुर्गी यांना मारणार्यांचा ‘मास्टरमाईंड’ शोधावा, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केली. जातीमुक्ती आंदोलनाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी सत्यशोधक चळवळीच्या प्रा. प्रतिमा परदेशी उपस्थित होत्या.
अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी केलेली द्वेषमूलक वक्तव्ये
१. जातीय मोर्चे आणि पुतळा उखडणे, अशा सर्वच प्रकरणांमध्ये राज्य सरकार कणाहीन झाले आहे. त्यामुळेच नाट्यकर्मींचा सांस्कृतिक आतंकवाद वाढत आहे. सरकारने कायदा हातात घेणारे आणि त्याला प्रोत्साहन देणारे यांच्या विरोधात कठोर भूमिका घेऊन कारवाई केली पाहिजे. (जातीद्वेषातून ब्राह्मण समाजावर टीका करणार्या जात्यंध संघटनांवर कारवाई करण्याचीही आंबेडकर यांनी मागणी करणे अपेक्षित ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. गडकरी यांचा पुतळा फोडणार्यांचे समर्थन करणारे आमदार नीतेश राणे असो किंवा गडकरी यांच्या लिखाणाची तळी उचलणारे सिनेअभिनेते पुष्कर श्रोत्री आणि शरद पोंक्षे, हे सर्वच जण सांस्कृतिक आतंकवादी आहेत. (‘सनातनविरोधात नक्षलवाद वापरू’, अशी धमकावणीची भाषा नुकतीच प्रकाश आंबेडकर यांनी वापरली होती. अशी भाषा वापरणे, हे नक्षलवादाचे समर्थन नव्हे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. समाजाने सामंजस्य दाखवत जुन्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. (हेच सामंजस्य दाखवण्याविषयी आंबेडकर, संभाजी ब्रिगेड आणि विद्रोही यांना सांगतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) संभाजी उद्यानामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि राम गणेश गडकरी या दोहोंचे पुतळे उभारून विषय संपवावा.
(म्हणे) ‘राम गणेश गडकरी यांच्या इच्छेनुसार पुतळा बसवावा !’
राम गणेश गडकरी यांच्या इच्छेनुसार त्यांचा पुतळा फर्ग्युसन महाविद्यालयासमोर, तर सामाजिक सामंजस्याची भूमिका म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा संभाजी उद्यानात बसवावा, अशी मागणी आंबेडकर आणि प्रा. परदेशी यांनी केली. (हीच सामंजस्याची भूमिका ठेवून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा पुन्हा लाल महालात बसवावा, ही अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

