उज्जैन सिंहस्थपर्वात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रदर्शनाला भेट देणार्‍या जिज्ञासूंचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

    सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सिंहस्थक्षेत्री लावलेल्या प्रदर्शनास अनेक साधूसंत, हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर आदींनी भेटी दिल्या. हे प्रदर्शन पाहिल्यावर त्यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय पुढे देत आहोत.

श्री. रोहिनी शर्मा प्रसाद, कटनी, मध्यप्रदेश

   हे प्रदर्शन पाहिल्यावर हिंदु संस्कृती किती महान आहे, हे लक्षात आले. आज जन्म हिंदूंची जी दयनीय अवस्था आहे, त्याचे मूळ कारण म्हणजे आपण आपल्याच संस्कृतीला विसरलो असून पाश्‍चात्त्य संस्कृतीला स्वीकारले आहे. याउलट अमेरिका, जर्मनी यांसारख्या पाश्‍चात्त्य राष्ट्रांतील नागरिक हिंदु संस्कृतीचा अभ्यास करून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहेत. निदान हे प्रदर्शन पाहून गेलेल्या हिंदूंनी आतातरी त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा त्यांच्यापेक्षा कर्मदरिद्री कुणी नसेल. आपल्यासारख्या निष्काम कर्म करणार्‍या निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळे आणि तुमच्या गुरूंमुळे पुढे हिंदु राष्ट्र येईल, याची निश्‍चिती वाटते. मी स्वत: पोलीस दलात कार्यरत असून ३ मासांनी सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर आपल्याप्रमाणे संस्थेत राष्ट्र आणि धर्मासाठी कार्य करू इच्छितो.

श्री. लोकेश पटेल, उज्जैन

   प्रदर्शन पहाण्यापूर्वी मी स्वत:च्या मनाने कधी श्रीरामाचा, कधी श्रीकृष्णाचा, तर कधी भगवान शिवाचा नामजप करत असे. प्रदर्शन पहातांना श्री. विनय पानवळकर यांनी मला कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या नामजपाचे महत्त्व सांगून प्रतिदिन नामजप करण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रदर्शन पाहून झाल्यावर ४ दिवस प्रतिदिन नामजप करणे चालू केले. त्यानंतर मला आतून कधी नव्हे इतके खूप शांत वाटू लागले. एक दिव्य प्रकाश माझ्याकडे येत आहे, असे जाणवले. आनंदी आनंद वाटत होते म्हणून पुन्हा या प्रदर्शनाला भेट देऊन माझी अनुभूती सांगितली. आपल्या कार्याला ईश्‍वराची शक्ती प्राप्त आहे त्याची प्रचीती आली. मलाही आपल्या कार्यात सहभागी व्हायचे आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात