भगवान शिवाला काशीक्षेत्री वास्तव्य करता यावे, यासाठी कार्य करून काशीक्षेत्रीच विराजमान झालेला श्री धुंडीराज विनायक !

Article also available in :

अनुक्रमणिका

भगवान शिवाने श्री विष्णूकडून कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी मागून घेतलेली विश्वातील सर्वांत प्राचीन, म्हणजे वैदिक काळापूर्वीपासूनची नगरी काशी ! ५ नद्यांचा वास असलेली, आदि शंकराचार्यांनी पुनर्स्थापना केलेली ही १ सहस्र ६४१ हून अधिक मंदिरांची नगरी आहे. येथील चैतन्यशक्तीमुळे ‘परमेश्वराप्रती उत्कट भाव असणार्‍याला मोक्षापर्यंत नेणारी मोक्षनगरी’ म्हणून तिचे माहात्म्य आहे.

 

१. श्री धुंडीराज विनायक मंदिर

‘काशी (उत्तरप्रदेश) येथे सहस्रो मंदिरे आहेत. त्यात गणेशाची ५६ मंदिरे आहेत. या ५६ गणेशांमध्ये श्री धुंडीराज विनायक विशेष आहे. असे म्हटले जाते की, काशीची परिक्रमा केल्यावर श्री धुंडीराज विनायकाचे दर्शन घ्यावे. काशी विश्‍वनाथाच्या प्रवेशद्वाराशीच हा श्री गणेश विराजमान आहे. स्कंद पुराणातील काशीखंडात काशी क्षेत्राचे महात्म्य वर्णन केले आहे. भगवान शिवाच्या या काशी क्षेत्रात श्री गणेशाचे आगमन कशा प्रकारे झाले, याची कथा येथे देत आहोत.

श्री धुंडीराज विनायकाची मूर्ती

 

२. धार्मिक वृत्तीने राज्य करून काशीचा राजा दिवोदास
याने भगवान ब्रह्माकडे ‘देवतांनी काशीक्षेत्री येऊ नये’, असा
वर मागणे आणि ब्रह्माने राजाला उत्कृष्ट प्रशासन करण्याची अट घालणे

त्या काळी भगवान शिवाचे वास्तव्य मंदाराचलमध्ये होते. काशी क्षेत्री दिवोदास नावाचा अत्यंत धार्मिक राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यातील प्रत्येक नागरिक अत्यंत आनंदात जीवन व्यतित करत होता. तेथे सर्वांगीण संपन्नता होती. राजा दिवोदासने भगवान ब्रह्माकडे वर मागितला होता की, ‘जोपर्यंत तो (राजा दिवोदास) राज्य करत आहे, तोपर्यंत देवतांनी काशीक्षेत्री येऊ नये आणि काशी क्षेत्रात जे चांगले वातावरण निर्माण झाले आहे, ते विस्कळीत करू नये.’ भगवान ब्रह्माने त्याचे म्हणणे मान्य केले; परंतु राजाला एक अट घातली की, ‘राजाने स्वतःला एक उत्कृष्ट आणि सक्षम प्रशासक म्हणून सिद्ध केले पाहिजे. काशीक्षेत्री रहाणार्‍या किंवा काशीला भेट देणार्‍या सर्वांना त्याने धार्मिक पद्धतीने आणि चांगली वागणूक दिली पाहिजे.’ राजाने ते मान्य केले आणि त्यानुसार उत्कृष्ट शासन दिले.

 

३. भगवान शिवाने काशीक्षेत्री जाता येण्यासाठी
दिवोदास राजाच्या काराभारातील चूक शोधण्यासाठी केलेल्या योजना !

काशीक्षेत्र हे भगवान शिवाचे स्थान आहे. दिवोदास राजाला ब्रह्माने दिलेल्या या आशीर्वादामुळे भगवान शिवाला बराच काळ काशीपासून दूर रहावे लागले. भगवान शिवाने काशीक्षेत्री जाण्यासाठी राजा दिवोदासकडून काहीतरी चूक होणे आवश्यक होते. त्यानुसार त्याने योगिनी, सूर्यदेवता, सेवक आदींना काशीक्षेत्री पाठवले.

३ अ. ६४ योगिनींना काशीक्षेत्री जणू स्वर्गच अवतरल्याचे जाणवून त्यांनी काशीतच वास्तव्य करणे

भगवान शिवाने काशी क्षेत्रातील व्यवस्था विस्कळीत करण्यासाठी ६४ योगिनींना तेथे पाठवले; परंतु काशीचे सौंदर्य आणि प्रसन्न वातावरणाने योगिनींना ‘त्या जणू स्वर्गातच आहेत’, असे वाटू लागले. ६४ योगिनींनी काशीची व्यवस्था विस्कळीत करणे दूरच उलट त्यांनी तेथेच वास्तव्य केले.

३ आ. काशीक्षेत्राकडे आकर्षित होऊन सूर्यदेवता १२ रूपांत काशीक्षेत्री विराजमान होणे

भगवान शिवाने काशीची राज्यव्यवस्था विस्कळीत करण्याच्या उद्देशाने सूर्यदेवतेला तेथे पाठवले. सूर्यदेवतेने काशीक्षेत्री ज्योतिषी, विद्वान, व्यापारी, ब्राह्मण आदी वेशांत तेथे राहून काशीक्षेत्रातील दोष शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याला काशीतील कोणाही व्यक्तीतील किंवा राजा दिवोदासांच्या कारभारातील दोष सापडला नाही. सूर्यदेवतेनेदेखील काशी क्षेत्रातील धार्मिक वातावरण आणि तेथील सौंदर्य यांच्याकडे आकर्षित होऊन काशीक्षेत्रीच वास्तव्य करण्याचे ठरवले. भगवान सूर्याने विचार केला, ‘जर भगवान शिवाची इच्छा पूर्ण न करता मंदाराचालवर परतलो, शिवाच्या क्रोधाला सामोरे जावे लागेल. त्यांच्या इच्छेविना येथेच काशीक्षेत्री वास्तव्य केले, तर पातक लागेल. काशीक्षेत्री राहून धार्मिक कार्य केल्यास अशा पातकांचा सहजतेने क्षय होईल.’ त्यानंतर सूर्यदेव १२ रूपांत काशीक्षेत्री वेगवेगळ्या ठिकाणी विराजमान झाले.

३ इ. श्री गणेशाने काशीतील व्यवस्था विस्कळीत करण्यासाठी ज्योतिषाचे रूप घेऊन कार्य करणे

सूर्यदेवताही काशीक्षेत्री विराजमान झाल्यानंतर भगवान शिवाने त्याच्या सेवकांना काशीक्षेत्रातील दोष शोधण्यासाठी पाठवले. तेही काशीच्या सौंदर्याने मोहित झाले अन् काशीक्षेत्रीच राहिले. शेवटी भगवान शिवाने स्वतःचा मुलगा भगवान श्री गणेशाला राजा दिवोदासाच्या कारभारात अडथळे आणण्याच्या कार्यासाठी बोलावले. श्री गणेशाने एका ज्योतिषाचा वेश घेऊन काशी क्षेत्रात प्रवेश केला. त्याने तेथील लोकांना काही स्वप्नदृष्टांत दिले आणि सकाळी त्यांची भेट देऊन त्या स्वप्नांचा अर्थ समजावून सांगितला. अशा प्रकारे ज्योतिषाच्या रूपातील श्री गणेशाने काशीवासियांना प्रभावित केले.

हळूहळू त्या ज्योतिषाची कीर्ती राजवाड्यापर्यंत पोचली. जसजसे दिवस गेले, तसे त्या ज्योतिषाची कीर्ती ऐकून त्या राज्याची राणीही प्रभावित झाली. राणीने राजा दिवोदास यांना वृद्ध ज्योतिषाच्या महानतेविषयी सांगितले आणि राजाची अनुमती घेऊन त्या वृद्ध ज्योतिषाला राजदरबारात बोलावले. राजाने प्रथेप्रमाणे त्या ज्योतिषाचा आदर-सन्मान केला. राजाने ज्योतिषाला भविष्यकथन करण्याविषयी प्रार्थना केली, तेव्हा ज्योतिषाने खोल विचार करून राजा आणि त्याचे राज्य यांविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी असेही सांगितले की, त्याच दिवसापासून अठराव्या दिवशी एक ब्राह्मण येईल आणि त्याला (राजाला) काही गंभीर सल्ला देईल. त्याचे राजाने पालन करणे आवश्यक आहे. हे बोलल्यानंतर ज्योतिषी तेथून निघून गेला. यानंतर श्री गणेशाने ब्राह्मणाचे रूप धारण करून त्याच्या कुशाग्र बुद्धीने दिवोदास राजाला राज्याविषयीची आसक्ती अल्प करण्यास भाग पाडले.

 

४. काशीक्षेत्री आगमन झाल्यानंतर भगवान शिवाने श्री गणेशाची केलेली स्तुती !

काशी विश्‍वनाथाचे ज्योर्तिलिंग

श्री गणेशाच्या आज्ञेने राजा दिवोदास वानप्रस्थाश्रमात गेल्यानंतर भगवान विश्‍वकर्माने काशीक्षेत्राचे पुनर्निर्माण केले. त्यानंतर तेव्हा भगवान शिव समस्त देवगणांसह मंदाराचाल पर्वतावरून काशी क्षेत्री वास्तव्यास आले. काशी क्षेत्री ते ‘काशी विश्‍वनाथ’ झाले. काशीक्षेत्रात प्रवेश केल्यानंतर विश्‍वनाथांनी प्रथम श्री गणेशाची स्तुती केली. त्यांनी धुंडीराज स्तोत्राचे पठण करून सांगितले, ‘‘येथे श्री गणेश धुंडीराज नावाने प्रसिद्ध होतील. जे भक्त काशी विश्‍वनाथाचे दर्शन घेण्यापूर्वी धुंडीराज विनायकाचे दर्शन आणि पूजन करतील, त्याला माझा (भक्ताला विश्‍वनाथाचा) संपूर्ण आशीर्वाद लाभेल.’’ त्यानंतर श्री गणेश ५६ रूपांत काशीक्षेत्री विराजमान झाले.

श्री धुंडीराज विनायक हे भगवान विश्‍वनाथांच्या प्रवेशद्वाराशीच स्थापित झाले. काशी विश्‍वनाथ हे भक्तांना पावणारे आहेतच; पण त्यांचे काशीक्षेत्री आगमन होण्यासाठी कार्य केलेले श्री धुंडीराज गणेशही भक्तवत्सल आहेत. श्री धुंडीराज गणेशाचे दर्शन घेतल्याखेरीज काशीयात्रा पूर्ण होत नाही, असे या गणेशाचे महात्म्य आहे.’

(संदर्भ : varanasitemples.in)

४ अ. अनादि काशी विश्वेश्वर

स्कंद पुराणात काशीतील काशी विश्वेश्वर मंदिर या शिवमंदिराचे वर्णन आहे. वर्ष १२०६ नंतरच्या काळात विश्वनाथ मंदिर क्रूर आक्रमक कुतुबुद्दीन ऐबक याने पाडून तिथे मशीद उभारली. अकबराच्या काळात तोडरमल राजाने हे मंदिर पुन्हा बांधले. औरंगजेबाने मंदिर पाडून तिथे ज्ञानवापी मशीद बांधली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या मशिदीच्या शेजारी काशी विश्वेश्वराचे मंदिर बांधले, जे सध्या अस्तित्वात आहे. त्यानंतर राजा रणजितसिंह यांनी त्याच्या कळसावर सोन्याचा मुलामा चढवला होता. विश्वेश्वरावरील आक्रमणकर्त्या सोलार मसुदला राजा सुहेदेव यांनी पराभूत केले. वर्ष १७८१ मध्ये इंग्रज अधिकारी वॉरन हेस्टिंगला काशीवासियांनी पलायन करण्यास भाग पाडून विश्वेश्वराचरणी भक्तीची प्रचीती दिली.

Leave a Comment