दस-यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश : हिंदूंनो, राजनैतिक नव्हे, तर धर्मसंस्थापनेसाठीच्या विजयासाठी सीमोल्लंघन करा !

दसर्‍यानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश

‘विजयादशमी म्हणजे शत्रूच्या राज्यात जाऊन विजयासाठी सीमोल्लंघन करण्याची सनातन परंपरा सांगणारा सण आहे. महिषासुराचा वध करणारी श्री दुर्गादेवी आणि एकट्याने कौरवांचा पराभव करणारा अज्ञातवासातील अर्जुन यांचे संस्मरण करण्याचा हा दिवस आहे. सध्या विजयादशमीच्या दिवशी कर्मकांड म्हणून सीमोल्लंघन केले जाते. निवडणुका तोंडावर आल्यानंतर काही हिंदू ‘विशिष्ट विचारसरणीचा राजकीय पक्ष जिंकल्याने हिंदूंना लाभ होईल’, अशी गणिते मांडून ‘मतदानासाठी सीमोल्लंघन करा’, असे आवाहन करतात. प्रत्यक्षात आजपर्यंत भारतात लोकशाहीमध्ये सर्व प्रकारांच्या विचारांची सरकारे येऊन देखील हिंदूंच्या हिताच्या घटना घडलेल्या नाहीत. हा हिंदूंचा एकप्रकारे राजनैतिक पराभवच आहे. याचे एकमेव कारण म्हणजे विद्यमान व्यवस्थेत हिंदूंच्या हिताचा विचार नाही. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष जिंकला, तरी हिंदू पराभूत होणार आहेत; म्हणूनच हिंदूंच्या हिताचा विचार करणारी व्यवस्था निर्माण करणे, हे आजच्या काळातील धर्मसंस्थापनेचे कार्य आहे. या दृष्टीकोनातून या वर्षीच्या विजयादशमीला प्रत्येक हिंदूने व्यवस्था परिवर्तनाचे, म्हणजेच धर्मसंस्थापनाचे कार्य करण्यासाठी निश्‍चयपूर्वक सीमोल्लंघन करणे आवश्यक ठरते. धर्मसंंस्थापना होऊन आदर्श राज्य प्राप्त होणे, हाच हिंदूंचा खरा विजय आहे. या विजयानंतर हिंदूंना विजयादशमीचा विजयोत्सव खर्‍या अर्थाने साजरा करता येईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले