अर्थ आणि काम या पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण असल्याविना समाजोन्नती केवळ अशक्यच !

धर्माचे नियंत्रण नसल्यास मानवाचे गिधाड होणे

अर्थ आणि काम पुरुषार्थांवर धर्माचे नियंत्रण अटळ आहे. तेच धर्माचे ध्येय आहे. ते डोळ्यांसमोरून हटले की, माणसाचे गिधाड होते. मग सत्य-असत्य, शुभ-अशुभ, सत्प्रवृत्ती-दुष्प्रवृत्ती, विधी-निषेध यांतील अंतर त्यांच्या लेखी संपून जाते.

विधि-निषेधशून्य नागडा स्वार्थ असलेला गिधाडाचा जीवनधर्म समाजाच्या सुधारणा आणि
क्रांत्यांच्या मुळाशी असणे अन् त्यामुळे धर्मजीवन पाला-पाचोळ्याप्रमाणे भिरभिरणे


प्रत्येक दुर्गुण हा सद्गुणांचा मुखवटा घालूनच येतो. आता धर्म हाच अधर्म होतो. गिधाड हे मृत वा जिवंत माणसाच्या मांसावर टपलेले असते. त्याप्रमाणेच ही मानवी गिधाडे समाजजीवन उद्ध्वस्त करून टाकतात. विधि-निषेधशून्य नागडा स्वार्थ हाच गिधाडाचा जीवनधर्म !

हा स्वार्थ व्यक्तीगत आणि सामूहिक पातळीवरही व्यक्त होतो. समाजाच्या सगळ्या समाजसुधारणा आणि समाजक्रांत्यांच्या मुळाशी हा मत्सरमूलक स्वार्थच आहे. हा मत्सरयुक्त स्वार्थ एकमेव नियंता होतो. मग संबंधितांचा अहंकार आणि तो कुरवळणारी पाशवी वृत्ती धुडगूस घालतात. या भीषण वादळ-वार्‍यात विधि-निषेधादी अर्थ अन् काम यांचे नियंत्रण करणारे धर्मजीवनच पाला-पाचोळ्यासारखे भिरभिरत जाते.

युवकांनो, अशा मानवी गिधाडांचे पंख कापून समाजाचा विध्वंस थांबवण्यास सज्ज व्हा !

समाजातील गिधाडांचे पंख कापण्याचे साहस करणारे युवक जोवर पुढे सरसावत नाहीत, तोवर अधोगतीला आवर घातला जाणार नाही. मत्सरमूलक स्वार्थाच्या छुप्या वा उघड प्रवृत्तीविरुद्ध दंड थोपटून उभे राहिल्याविना समाजाचा विध्वंंस थांबायचा नाही.
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भ : मासिक घनगर्जित, सप्टेंबर २००५)

Leave a Comment