सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा गुढीपाडव्यानिमित्त संदेश

‘गुढीपाडवा म्हणजे युगादि तिथी ! साडेतीन मुहुर्तांपैकी एक शुभमुहूर्त असलेल्या या दिवशी नवीन कार्यांचा शुभारंभ केला जातो. सध्या भारतात निधर्मी राज्यव्यवस्थेमुळे सर्वत्र धर्मग्लानी आल्याचे आपण अनुभवत आहोत. सनातन धर्मासह धर्मसंस्कृती, वैदिक कालगणना, संस्कृत, गाय, गंगा, मंदिरे आदी हिंदु धर्माचे मानबिंदू संकटात आहेत. अशा परिस्थितीत संस्कृतीप्रेमींकडून ‘३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नव्हे, तर गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करा’, असे केले जाणारे सांस्कृतिक जागरण महत्त्वाचे असले, तरी तो चिरस्थायी उपाय नाही. अनेक धर्मप्रेमी मंडळी वर्ष २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन हिंदु समाजात कोण्या एका राजकीय पक्षाच्या बाजूने राजनैतिक जागरण करण्याच्या विचारात आहेत. प्रत्यक्षात धर्मग्लानी आलेली असतांना या निवडणूकप्रधान राज्यात दुर्योधनाच्या तुलनेत दुःशासन, दुःशासनाच्या तुलनेत शकुनी, शकुनीच्या तुलनेत अश्‍वत्थामा निवडले जातात, हा आजपर्यंतचा अनुभव आहे. जर खर्‍या अर्थाने भारतात आलेली धर्मग्लानी दूर करायची असेल, तर ‘भारतात सनातन धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे’, हाच चिरस्थायी उपाय आहे.

हिंदु धर्माला ग्लानी आलेली असली, तरी आपल्या धर्मग्रंथांमध्ये धर्माच्या पुनर्स्थापनेचा सिद्धांत दिलेला आहे. पुनश्‍च धर्मसंस्थापनेसाठी कार्य करणे, ही काळाची आवश्यकता आणि काळानुसार शुभकार्यच आहे. हिंदूंनो, या वर्षीच्या गुढीपाडव्याला धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे तन-मन-धनाने कार्य करण्याचा शुभसंकल्प करा आणि येत्या ५ वर्षांत, म्हणजेच वर्ष २०२३ पर्यंत भारतात हिंदूंचे धर्मराज्य स्थापित करून भावी पिढ्यांसाठी इतिहास घडवा !’

– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था