मांसाहार का वर्ज्य करावा ?

मांसभक्षणकर्म हे तमोगुणी असल्याने हिंदु धर्माने ते निषिद्ध मानले आहे. ‘मनुस्मृति’ने केलेला मांसाहाराचा निषेध आणि यज्ञप्रसंगी सांगितलेले मांसाशन यांविषयीची माहिती या लेखात आपण पाहूया.

 

१. हिंदूंना मांसाहार अमान्य

अ. ‘हिंदू हे युगानुयुगे, शतकानुशतके कडवे शाकाहारी आहेत. उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांत अन् दक्षिण भारतात मांसाहारी हिंदू क्वचितच आढळतील.

आ. एक हिंदु स्त्री म्हणते, ‘पाश्चात्त्य संस्कार झालेले माझे पती भलेही मांसाहार करतील; पण मी त्यांची हिंदु पत्नी मात्र मांसाला कधीच स्पर्श करणार नाही. मी मांस घरात शिजवणार नाही.’

इ. समुद्रतटी रहाणारे हिंदू मासे खातात; पण मांसाहार करत नाहीत. ते कडवे आहेत. नगरांत (शहरांत) रहाणारे पाश्चात्त्य संस्कारांचा प्रभाव असलेले हिंदू मात्र मांसाहार करतात.’

ई. ‘मांसभक्षणकर्म हे तमोगुणी असल्याने हिंदु धर्माने ते निषिद्ध मानले आहे. मांस खाणे, या तमोगुणी आहारकर्माचे पालन करणे, हे रज-तमदर्शक विदेशी संस्कृतीचे दर्शक आहे.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ज्येष्ठ शुद्ध दशमी, कलियुग वर्ष ५११० १३.६.२००८, दुपारी १२.२४)

 

२. ‘मनुस्मृति’ने केलेला मांसाहाराचा निषेध

अ. योऽहिंसकानि भूतानि हिनस्त्यात्मसुखेच्छया ।
स जीवंश्च मृतश्चैव न क्वचित् सुखमेधते ।। – मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक ४५

अर्थ : जो अहिंसक जिवांना, दीन प्राण्यांना स्वसुखाकरता मारतो, त्याला जिवंत असतांना आणि मेल्यावरही कधी सुख लाभत नाही.

आ. यो बंधनवधक्लेशान्प्राणिनां न चिकीर्षति ।
स सर्वस्य हितप्रेप्सुः सुखमत्यंतमश्नुते ।। – मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक ४६

अर्थ : जो बंधन आणि वधाचे क्लेश प्राण्यांना देऊ इच्छित नाही, असा तो सर्व प्राण्यांचा हितैषी अनंत सुखे प्राप्त करून घेतो.

इ. समुत्पिंत्त च मांसस्य वधबंधौ च देहिनाम् ।
प्रसमीक्ष्य निवर्तेत सर्वमांसस्य भक्षणात् ।। – मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक ४९

अर्थ : मांसाची समुत्पत्ती, प्राण्यांचे बंधन आणि वध पाहून सर्व प्रकारे मांस भक्षण सोडून द्यावे.

ई. न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।

प्रवृत्तिरेषा भूतानां निवृत्तिस्तु महाफला ।। – मनुस्मृति, अध्याय ५, श्लोक ५६

अर्थ : मनुष्याच्या ठिकाणी मद्य, मांस आणि मैथुन यांच्या सेवनाविषयी इच्छा असणे (तितके) दोषास्पद नाही. ती त्याची प्रवृत्तीच आहे; पण या तिन्हीपासून निवृत्त होणे हे अत्यंत लाभदायक आहे.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

 

३. स्वत:च्या सोयीसाठी ‘मांसाहार अपरिहार्य आहे !’
असा मनुवचनाचा अर्थ काढणारे एक अधिवक्ता !

एक अधिवक्ता (वकील) : हिंदूंना मांसभक्षण अपरिहार्य आहे, त्याविना क्षात्रतेज निर्माण होणार नाही.

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी : न मांसभक्षणे दोषो (म्हणजे मांसभक्षणात दोष नाही) या मनुवचनाचा अर्थ इतका सोपा नाही.

अधिवक्ता : म्हणजे ?

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी : परिसंख्याविधीशी (मीमांसा शास्त्राप्रमाणे अर्थ लावण्याची एक पद्धत) निगडित, असा तो विचार आहे. येथे मांसभक्षणाचा विधी, वैधता नाही अथवा उपादेयता (स्वीकारोक्ती, मान्य करण्याजोगा) नाही, तर मांसभक्षणापासून निवृत्ती दिग्दर्शित केली आहे. शास्त्रवचनाचा अर्थ लावतांना शास्त्रीय चौकटीची मोडतोड करता यायची नाही.

अधिवक्ता : पण मांसभक्षणाने शूरत्व उपजून क्षात्रतेज तेजाळून निघत.

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी : शौर्य अन् क्षात्रतेज यांचा मांसभक्षणाशी काही संबंध नाही. शुंग राजघराणे ब्राह्मण आहे. पुष्यमित्र अन् त्याचा पुत्र अग्नीमित्र हे कडवे शाकाहारी ब्राह्मण असूनही तेजस्वी होते. या शाकाहारी पुष्यमित्राने ग्रीकांना तक्षशिलेच्या पार हाकलले. त्यानंतर ग्रीकांनी हिंदुस्थानकडे वाकड्या दृष्टीने पाहिले नाही. पेशवे ब्राह्मण होते. मद्यमांस निवृत्त होते. थोरले माधवराव, रघुनाथराव पेशवे, हरिपंत फडके, पेठे हे पेशव्यांचे कडवे शूर सेनापती ब्राह्मण होते. त्यांनी अटकेपार झेंडे नेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्थापलेल्या हिंदु राज्याचे त्यांनी साम्राज्यात परिवर्तन केले.

 

४. यज्ञप्रसंगी सांगितलेले मांसाशन

धर्मक्रिया म्हणून यज्ञप्रसंगी मांसाशन करता येते, पण ते अत्यल्प म्हणजे पशूची वपा (म्हणजे बेंबीजवळचे किंचित मांस) याचे हवन करतात आणि त्या वेळी ब्राह्मण त्या वपेचा गंध घेतात. प्रत्यक्ष सेवन करीत नाहीत. धर्म्य म्हणून कणापेक्षा अधिक सेवन केले जात नाही. याचा अर्थ दैनंदिन जीवनात मद्य आणि मांस पूर्णतः वर्ज्य करणे हे आहे.

 

५. मांसाहार वर्ज्य करणारे काही पाश्चात्त्य

अ. एका पाश्चात्त्य महिलेने विवाह झालेल्या दिवसापासून मांसाहार वर्ज्य केला. तिने तसे व्रतच केले. ती म्हणते, मलाही आता मुलं होतील. मग मी एखाद्या पशूचा बछडा कसा खाऊ ?

आ. जॉर्ज बर्नार्ड शॉ मृत्यूशय्येवर असतांना त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी त्यांना मांस खायला सांगितले. त्यांनी शॉ यांना औषध म्हणून मांस दिले. मांस घेतले नाही, तर तुमचा मृत्यू होईल असे डॉक्टरांनी सांगितले. त्यावर शॉ उत्तरले, मांस खाण्यापेक्षा मी मृत्यू पत्करीन. हे मांसाचे औषध न घेता जगलो, तर माझे डॉक्टरसुद्धा शाकाहारी होतील ! त्यानंतर मांस न घेताच शॉ जगले.

इ. शास्त्रज्ञ आईनस्टाईन सांगतात, हृदय शुद्धतेच्या स्थिर प्रक्रियेत शाकाहारी अन्न मनावर खोल प्रभाव करते. जगाने शाकाहाराचा स्वीकार केला, तर संपूर्ण मानवजातीचे प्रारब्ध पालटू शकेल !

ई. सेंट मॅथ्यू आणि सेंट पॉल हे कॅथॉलिक कटाक्षाने मांसाहार वर्ज्य करतात आणि इतरांना वर्ज्य करायला सांगतात. ते मांसाहार हा धार्मिक अधःपात मानतात. टॉलस्टॉय आणि डुखोबुर (पायथॉगोरसचा शिष्य, हा सनातनी रशियन ख्रिश्‍चन आहे.) सांगतात, ख्रिश्चन पंथाचा मांसाहाराला कडवा विरोध आह. रोमन कवी सेनेका हा पायथॉगोरसचा शिष्य आहे. तो सांगतो, शाकाहारामुळे माझे मन अधिक निरामय, अधिक जागृत आणि अधिक कार्यक्षम झाले.

 

६. मांसाहाराला विरोध करणारे महापुरुष

अ. कपिल, व्यास, पाणिनी, पतंजली, शंकराचार्य, आर्यभट्ट आदी महापुरुष मांसाहाराला प्रखर विरोध करतात. भगवान महावीर, गौतम बुद्ध आणि गुरुनानक हे सगळे मांसाहाराचे कडवे विरोधक आहेत. अहिंसावादी बौद्ध मात्र मांसाहारी आहेत ! लडाख, सिक्किम आणि भूतान येथील यच्चयावत बौद्ध कडवे मांसाहारी आहेत आणि तिथले हिंदू मात्र कडवे शाकाहारी आहेत !

आ. रमण महर्षी अहिंसा परमो धर्मः । (अहिंसा हाच श्रेष्ठ धर्म), असे सांगतात !

इ. गांधीजींचे आहार, प्रयोग विख्यात आहेत. त्यांनी एक दिवस बोकडाचे मांस (मटण) खाल्ले. त्यानंतर काही आठवडे त्यांना आतल्या बोकडाचे बें ऽऽ,बें ऽऽ असे ओरडणे ऐकू येत होते.

 

७. देवाने माणसासाठी मांसाहार निर्मिलेला नाही !

ईश्‍वराने निर्मिलेल्या मांसाहारी प्राण्यांना त्याने विशिष्ट प्रकारची दंतावली आणि जबडे दिले आहेत. वाघ, सिंह, लांडगा, अस्वल आणि कुत्रा या मांसाहारी प्राण्यांचे जबडे लांब असतात. त्यात मोठाले सुळे असतात. मांसाहारी प्राण्यांपेक्षा शाकाहारी प्राण्यांचे जबडे आणि दंतावली अगदी वेगळ्या प्रकारच्या असतात. गेंडा, हत्ती, घोडा, गाय आणि म्हैस हे प्राणी शाकाहारी आहेत. त्यांचे जबडे वेगळे आहेत. मनुष्याचे दात आणि जबडे शाकाहारी प्राण्यांशी मिळतेजुळते असतात. आपली भूक किंवा रुची यांसाठी दुसर्‍या प्राण्याला मारून त्याचे मांस काढून, चिरून ते शिजवून खाणे, हे योग्य नाही. देवाने माणसासाठी हे अन्न निर्मिलेले नाही ! – धर्मभूषण सु. ग. शेवडे

मांसाहाराची प्रवृत्ती नाहीशी होण्यासाठी
शास्त्रकारांनी स्पर्शास्पर्शाचे नियम करणे

घोडा गडबड(मस्ती) करत असला, तर त्याच्याकडून पुष्कळ श्रम करून घ्यायचे. तेवढ्याने भागले नाही, तर त्याला नपुंसक (खच्ची) करायचे, हे जसे माणूस करतो, तसेच व्यक्तींनी अमुक गुण अंगी येण्यासाठी अमुक प्रकारचा आहार घ्यावा, हे नुसते ठरवून भागत नाही. असे ठरवल्यावरसुद्धा इंद्रिये आवरत नाहीत. हे पाहून शास्त्रकारांनी स्पर्शास्पर्शाचे नियम केले. मांस पाहिल्यावर ते खाण्याची प्रवृत्ती होते, हे पाहून मांस पाहू नये, इतकेच नव्हे, तर मांसविक्रीचा धंदा करणार्‍या लोकांना पाहू किंवा त्यांना शिवू नये, असे त्यांनी ठरवले. इतका निर्बंध ठेवल्याने मांसाकडे साहजिक असलेली प्रवृत्ती नाहीशी होऊन त्याचा तिटकारा वाटेल, असे त्यांचे अनुमान होते आणि तेे खरेही ठरले. इंग्रजांचे राज्य आल्यापासून हा स्पर्शास्पर्श घटत जाऊन मद्य आणि मांस यांकडे वळण्याची जनतेची प्रवृत्ती वाढली !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सात्त्विक आहाराचे महत्त्व’, ‘असात्विक आहाराचे दुष्परिणाम’

Leave a Comment