गुरुपौर्णिमेनिमित्त परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचा संदेश (२०१९)

प.पू. डॉ. जयंत आठवले H.H. Dr. Jayant Athavale

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले

भावी आपत्काळाची सिद्धता करणे, हे काळानुसार गुरुआज्ञापालन आहे !

सध्या देश आणि धर्म यांच्या दृष्टीकोनातून आपत्काळ चालू आहे. नैसर्गिक आपत्ती सतत येणे, देशद्रोही आणि धर्मद्रोही यांचे प्राबल्य वाढणे, राजकीय अस्थैर्य निर्माण करणार्‍या घटना घडणे, समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या हिताच्या शुभ कार्यामध्ये विघ्ने येणे इत्यादी आपत्काळाची भौतिक लक्षणे आहेत. अशा काळात सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन संघर्षशील होते. गुरुपौर्णिमेनंतर येणार्‍या काही मासांत आपत्काळाची तीव्रता वाढेल. या आपत्काळानंतर पुढील वर्षाच्या आरंभी भारताला आपत्काळाला सामोरे जावे लागेल. अनेक द्रष्ट्या संतांनी सांगितले आहे की, देशात जाती-धर्माच्या नावाखाली गृहयुद्ध भडकवण्याचे षड्यंत्र देशविरोधी शक्ती आखतील. वर्ष १९४७ च्या जातीय दंगलींप्रमाणे भीषण परिस्थिती देशात उद्भवेल. वर्ष २०२१ मध्ये देशाच्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती उत्पन्न होईल. एकूणच वर्ष २०२० ते २०२३ हा कालावधी भारतासाठी आपत्काळ असणार आहे. या भीषण काळात जीवन जगणे सुसह्य व्हावे, यासाठी तीव्रतम साधना करून आध्यात्मिक उन्नती करणे आणि आपत्काळाच्या दृष्टीने जीवनोपयोगी सिद्धता आजपासून करणे आवश्यक आहे. या भावी महाभीषण काळाच्या संदर्भात समाजात जाऊन जागृती करणे, हीदेखील सध्याच्या काळातील समष्टी साधना आहे.

गुरु हे तत्त्व आहे. विविध संतांच्या माध्यमातून ते कार्यरत असते. आज अनेक संत आणि अवतारी पुरुष हे भावी संकटकाळाच्या संदर्भात सांगत आहेत. यावरून त्याची तीव्रता लक्षात येईल. गुरुपातळीच्या संतांमध्ये काळाच्या पलीकडे जाण्याची क्षमता असते; म्हणूनच ते काळाची पावले ओळखून समाजाला येणार्‍या भीषण काळाविषयी जागृत करत असतात. हेच कार्य शिष्य पातळीच्या भक्तांनी केल्यास गुरूंच्या मनातील जाणून कार्य केल्यासारखे होते.

येणार्‍या महाभीषण आपत्काळाची सिद्धता करणे, यासंदर्भात इतरांचे प्रबोधन करणे आणि या आपत्काळात समाजबांधवांचे रक्षण करणे, हे गुरूंना अभिप्रेत असे काळानुसार आज्ञापालन ठरणार आहे. या वर्षीच्या गुरुपौर्णिमेपासून हे गुरुकार्य करण्याचा संकल्प करा !

–  (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, प्रेरणास्थान, सनातन संस्था. (२०१९)