गुरुपूजनाची पूर्वसिद्धता (पूर्वतयारी)

‘गुरुपौर्णिमे’ला करण्यात येणार्‍या गुरुपूजनाची पूर्वसिद्धता येथे देण्यात आली आहे.

१. गुरुपूजनाची सिद्धता करण्याच्या संदर्भातील सूचना

गुरुपूजनाची सिद्धता

अ. गुरुपूजनासाठी मखर केळीच्या गाभ्याचे (केळी उपलब्ध नसल्यास कर्दळीचे) बनवावे. लाकडी देव्हार्‍यावर किंवा चौरंगावर सजावट करावी. थर्माकोलच्या सजावटीतून चांगली स्पंदने येत नसल्याने सजावटीसाठी शक्यतो थर्माकोल वापरू नये.

आ. पूजेच्या आधी आणि नंतर चौरंगाच्या आजूबाजूची जागा व्यवस्थित अन् स्वच्छ असावी, उदा. तोरण, फुले अव्यवस्थितपणे पडलेली नसावीत.

इ. पूजनासाठी श्री गुरूंचे छायाचित्र मखरातच ठेवावे (इतरत्र कोठेही ठेवू नये) अथवा महर्षि व्यासांच्या प्रतिमेचे पूजन करावे.

ई. श्री गुरूंचे छायाचित्र फुलांनी पूर्णपणे झाकलेले नसावे. सर्वांना श्री गुरूंचे दर्शन व्यवस्थित होईल, अशा प्रकारे हार आणि फुले वाहावीत.

२. पूजेस बसणार्‍यांसाठी सूचना

अ. पूजेला बसतांना पती-पत्नीने स्नान करून सोवळे किंवा धूतवस्त्र नेसून आणि पतीने उपरणे अंगावर घेऊन बसावे. पत्नीने पतीच्या उजव्या हाताला बसावे. पूजन करतांना ओले हात पुसण्यासाठी एक वस्त्र घ्यावे.

आ. आपल्यासमोर पाण्याने भरलेला तांब्या (कलश), पेला, पळी आणि ताम्हण घ्यावे. तसेच एका ताटामध्ये हळद, पिंजर, अक्षता, गंध, फुले, इत्यादी पूजासाहित्य असावे.

इ. पत्नीने आपला उजवा हात प्रत्येक उपचाराच्या वेळी पतीच्या उजव्या हाताला लावावा.

ई. पूजा चालू असतांना पूजेकडे लक्ष असावे. आवश्यकतेनुसार बोलावे.

उ. ‘आपल्यासमोर प्रत्यक्ष सद्गुरु बसलेले आहेत आणि आपण त्यांची पूजा करत आहोत’, असा भाव असावा.

ऊ. श्री गुरूंची आरती म्हणण्यापूर्वी त्या आरतीचा भावार्थ समजून घ्यावा. त्यामुळे भावजागृती होण्यास साहाय्य होते.

३. पूजेसाठी लागणारे साहित्य

श्री गुरूंची प्रतिमा, हळद, कुंकू, गंध, शेंदूर, अक्षता, उदबत्ती, वाती, कापूर, रांगोळी, चौरंग, कलश, पंचपात्री, पळी, ताम्हण (तीन), समई (दोन), समईखाली ठेवण्यासाठी ताटली (दोन), निरांजन, पंचारती, घंटा, आगपेटी, कापसाचे वस्त्र, नारळ (पाच), तांदुळ (एक किलो), सुपार्‍या (५), विड्याची पाने (वीस), पाच प्रकारची फळे (प्रत्येकी २), सुट्टे पैसे (१ किंवा २ रुपयाची पाच नाणी), गूळ, खोबरे (एक वाटी), उदबत्तीचे भांडे (उदबत्तीचे घर आणि खाली ठेवण्यासाठी ताटली), मखर सजवण्याचे साहित्य, फुले, हार, दोन पाट, तुळशी, दूर्वा, बेल, केळीचे खांब (मखरासाठी), चौरंग सजवण्यासाठी फुलांची गुंडी, तेल (समईत घालण्यासाठी), तूप (निरांजनात घालण्यासाठी)

४. पूजेची मांडणी

चौरंग किंवा देव्हारा पूर्व किंवा पश्चिम दिशेला ठेवावा. त्याच्या सभोवती केळीच्या गाभ्याचे मखर करावे. मखरामध्ये आपल्या दिशेला तोंड करून श्री गुरूंची प्रतिमा ठेवावी. छायाचित्राच्या पुढे चौरंगावर विड्याची २ पाने, सुपारी आणि १ रुपयाचे नाणे आणि सोबत नारळ ठेवावा. नारळ ठेवतांना नारळाची शेंडी श्री गुरूंच्या प्रतिमेच्या दिशेने असावी. चौरंगाच्या खाली ५ प्रकारची फळे एका ताटात घालून ठेवावी. देव्हारा / चौरंग यांच्या दोन्ही अंगाला (बाजूला) समया ठेवाव्यात.

५. गणपतिपूजन मांडणी

एका ताटात किंवा ताम्हणात तांदुळ ठेवून त्यावर नारळ ठेवावा (नारळाची शेंडी आपल्या दिशेला असावी). सोबत विडा ठेवावा. नैवेद्यासाठी केळे / गूळ-खोबरे ठेवावे. चौरंग आणि गणपतिपूजनाच्या मांडणीसमोर दोन पाट ठेवावेत. चौरंगाच्या आणि पाटांच्या सभोवती सुशोभित अशी रांगोळी काढावी.

पूजेतील मंत्रांचा अर्थ समजल्यास गुरुपूजन अधिक भावपूर्ण होण्यास साहाय्य होते. या दृष्टीने, संपूर्ण गुरुपूजनाचा विधी आणि त्यातील मंत्रांचा मराठी भाषेत अर्थ / भावार्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा !

Leave a Comment