संत प.पू. सद्गुरु नानामहाराज सोनईकर यांची सनातन आश्रमाला भेट !

श्रीक्षेत्र सोनई (जि. नगर) येथील संत प.पू. सद्गुरु नानामहाराज सोनईकर
यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

प.पू. सद्गुरु नाना महाराज (उजवीकडे) यांचा सन्मान करतांना सनातनचे श्री. प्रकाश मराठे

रामनाथी (गोवा) – श्री रेणुका दरबार श्रीक्षेत्र सोनई, नेवासा, नगर येथील संत प.पू. नानामहाराज सोनईकर यांनी ८ जानेवारीला रामनाथी, फोंडा, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली. सनातनचे साधक श्री. प्रशांत जुवेकर यांनी प.पू. नानामहाराज यांना आश्रमात चालणारे आध्यात्मिक संशोधन, तसेच राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी सनातनचे साधक श्री. प्रकाश मराठे यांनी प.पू. नानामहाराज यांचा श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी त्यांच्यासमवेत श्री. नितीन सबनीस, सौ. मेघना सबनीस, श्री. सर्वेश्‍वर नाईक आदी उपस्थित होते.

प.पू. नानामहाराज यांचे गुरु प.पू. हरिहरानंद महाराज उपाख्य सद्गुरु अण्णा महाराज सोनईकर यांचे आणि सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे घनिष्ट संबंध होते.

प.पू. सद्गुरु नानामहाराज यांचे शुभाशीर्वाद !

धर्मप्रेमी ही सनातन संस्था सतत वाढत राहो !

तमसो मा ज्योतिर्गमय या वचनाप्रमाणे सनातनच्या या आश्रमात आल्यानंतर मन आनंदमय होऊन अंतर्लहरी निर्माण झाल्या. या लहरी अनुभवल्या. यावरून आश्रमाचा तपशील समजला. ही धर्मप्रेमी संस्था सतत वाढत राहो, असा श्री आदिशक्ती आणि परात्पर गुरुपरंपरेचा आशीर्वाद !, असा आशीर्वादपर अभिप्राय प.पू. सद्गुरु नानामहाराज यांनी व्यक्त केला.

श्री. सर्वेश्‍वर नाईक :

सुंदर, अप्रतिम आणि अद्भूत असा अनुभव आश्रम पहातांना आला. कारण आश्रमातील स्वच्छता, साधकांचे कार्य, आश्रमातील कार्य हे सर्व पाहून मनाला आनंद झाला. हिंदु धर्मासाठी चाललेले कार्य पाहून प्रचंड आत्मविश्‍वास निर्माण झाला. आपली वैदिक आर्य सनातन हिंदु संस्कृती सर्व विरोधी शक्तींचा नायनाट करून टिकून राहीलच. सूक्ष्म जगताविषयीच्या प्रदर्शनात कधीही न अनुभवलेल्या गोष्टी पहायला मिळाल्या, ज्या जर किंवा तर यामध्ये येत असतात. येथील सूक्ष्मप्रदर्शन पाहून जर तर वर विश्‍वास बसत नाही. ईश्‍वर आहे हेच सत्य आहे.

श्री. नितीन सबनीस आणि सौ. मेघना सबनीस :

आंतरिक मानसिक समाधान झाले आणि धर्माविषयी आदर वृद्धींगत झाला.

क्षणचित्र

सन्मानाच्या वेळी प.पू. महाराजांना घातलेला हार त्यांनी पुन्हा सनातन संस्थेचे श्री. प्रकाश मराठे यांच्या गळ्यात घातला.

परिचय

संतांच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान म्हणजे नगर जिल्ह्यातील सोनई तालुक्यातील वेल्हेकर वाडी येथील रेणुका दरबार ! प.पू. योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज म्हणजे हरिहरानंद महाराज यांनी रेणुका दरबार येथे रेणुकामातेचे भव्य काच मंदिर उभारले असून गाभार्‍यात योगपीठासनावर रेणुकामातेची मूर्ती स्थापन करून शक्तीपीठ म्हणून गौरविले आहे. सध्या रेणुका दरबारमध्ये प.पू. नाना महाराज आणि प.पू. यज्ञेश्‍वर महाराज (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली नित्योपासना, नवरात्रोत्सव चालू आहेत.

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’