सनातन संस्थेच्या १२ व्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर (भाग २)

अनुक्रमणिका

२. पू. (कु.) अनुराधा वाडेकर संत बनल्याच्या साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना

३. पू. अनुताई संत झाल्यावर सुचलेली कविता

४. पू. अनुताईची गुणवैशिष्ट्ये

५. पू. अनुताईच्या मार्गदर्शनाने झालेले लाभ

६. पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

७. अनुभूती

 


 

 

२. पू. (कु.) अनुराधा वाडेकर संत बनल्याच्या साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना

२ अ. अत्यंत हसरा, प्रसन्न आणि चैतन्यमय तोंडवळा,
तेजस्वी अन् प्रफुल्लीत कांती असलेल्या पू. अनुराधाताई वाडेकर !

(पू.) कु. अनुराधा ताई हसतांना
(पू.) कु. अनुराधा ताई हसतांना

 

‘मी हिंदु जनजागृती समितीतर्फे आयोजित किल्ले रायरेश्वर चळवळीत पू. (कु.) अनुराधाताई वाडेकर यांना पुणे येथील कार्यक्रमात बघितले. त्या वेळी त्या अधिक प्रसन्न वाटल्या. त्यांचा अत्यंत हसरा तोंडवळा, तेजस्वी आणि प्रफुल्लीत कांती, त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य मला आपोआप आकर्षित करत होते. त्या संत घोषित होण्याअगोदर अचानक मला त्यांची आठवण येऊन त्यांचा चैतन्यमय तोंडवळा वारंवार समोर यायचा. मागील काही दिवसांत असे १० ते १५ वेळा झाले. गुरुमाऊलींच्या कृपेने मला एका संतांचे मुख बघायला मिळाले, हे माझे अहोभाग्य आहे.’ – श्री. नीलेश बोरा, लासलगांव

 

२ आ. पू. अनुताई लवकरच संत होतील आणि
त्यांचा सत्कारसोहळा याच आश्रमात होईल, असे वाटणे

‘मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी पू. कु. अनुताई यांना नमस्कार केला. त्या वेळी त्यांनी मला नमस्कार केला आणि म्हणाल्या, ‘‘तुम्ही वयाने पुष्कळ मोठ्या आहात, मला आशीर्वाद द्या.’’ त्या वेळी मी त्यांना सांगितले, ‘‘दिवाळीच्या आत तुम्ही संत व्हाल.’’ या प्रसंगानंतर सतत मला ‘पू. अनुताई लवकर संत होतील आणि त्यांचा सत्कारसोहळा याच आश्रमात होईल’, असे वाटायचे.’ – श्रीमती सुहासिनी पुरोहित, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

पू. अनुताई नमस्कार करतांना
पू. अनुताई नमस्कार करतांना

 

२ इ. पू. अनुताई मनाने पुष्कळ स्थिर होऊन आनंदी
असल्याचे, तसेच त्या वर्तमानकाळात रहात असल्याचे लक्षात येणे

‘पू. अनुताई संत म्हणून घोषित होण्याच्या आधी २ दिवस तिच्याशी दूरभाषवर बोलणे झाले. त्या वेळी ती मनाने पुष्कळ स्थिर होऊन आनंदी असल्याचे, तसेच ती वर्तमानकाळात रहात असल्याचे लक्षात आले. त्या वेळी वाटले, ‘ती आता संत झाली आहे.’ – सौ. श्रद्धा पवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

 

२ ई. संतांच्याच साडीला इस्त्री करत असल्याचा
विचार सातत्याने मनात येणे आणि प्रत्यक्षात तसेच असणे

‘कार्तिक शु. द्वितीया, कलियुग वर्ष ५११३ (२८.१०.२०११) या दिवशी देवद आश्रमात प.पू. पांडे महाराजांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम होता. सकाळीच मनात विचार आला, ‘पू. अनुताई संत होतील.’ कार्यक्रमाला आरंभ होण्यापूर्वी मला साडीला इस्त्री करण्याची सेवा मिळाली. ही सेवा करत असतांना ‘मी संतांच्या साडीला इस्त्री करत आहे’, असा विचार सातत्याने मनात येत होता.

 

या दोन्ही पूर्वसूचना ईश्वरकृपेने मिळाल्या आणि संतसेवेची संधी मिळाली. भगवान श्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि प्रार्थना करते की, आम्हा सर्व साधकांचीही लवकर आध्यात्मिक उन्नती होऊ दे.’

 

– सौ. मधुरा कर्वे, पुणे

 

२ उ. संतांच्या मार्गदर्शनाच्यावेळी
पू. कु. अनुताईंना संत म्हणून घोषित करणे

‘प.पू. पांडे महाराजांचे मार्गदर्शन आहे, असे कळल्यावर ‘याच कार्यक्रमात पू. कु. अनुताई संत झाल्याचे घोषित करतील’, असे वाटत होते.’ – श्री. धनंजय कर्वे, धनकवडी, पुणे.

 

प.पू. पांडे महाराज पू. अनुताईचा सत्कार करतांना
प.पू. पांडे महाराज पू. अनुताईचा सत्कार करतांना

 

२ ऊ. दोघांच्याही मनात
पू. अनुताईचा सत्कार असल्याचा विचार मनात येणे

‘सर्व साधक आवरून सभागृहात जात असतांना मी विचारले असता संपतने (मुलाने) सांगितले, ‘‘प.पू. पांडे महाराजांचे मार्गदर्शन आहे.’’ एका क्षणाचाही विलंब न होता आम्ही दोघेही एकदम म्हणालो की, पू. अनुताईचा सत्कार असेल. या २ मासांत २-३ वेळा ‘पू. अनुताई संत होतील’, असा विचार मनात आला होता.’ – सौ. रेखा जाखोटिया, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

 

३. पू. अनुताई संत झाल्यावर सुचलेली कविता

३ अ. हीच विनवणी श्रीगुरुदेवांच्या चरणी !

‘अनु’ असोनी व्यापक झालीस, होशील माळेचा शिरोमणी ।

तू झालीस हाराचा धागा आम्हा सर्व पुष्पांस गुंफण्या ।। १ ।।

 

प.पू. डॉक्टरांनी तुझा स्वीकार करूनी आम्हा साधकांना दिली स्फूर्ती ।

गुरुकृपेने सनातनची होवो विश्वात कीर्ती ।। २ ।।

 

या जन्माचे सार्थक झाले आज ऐकूनी पू. अनुताई झाली संत ।

त्रास सोसूनी क्षात्रवृत्तीने केली सेवा नाही क्षणभर उसंत ।। ३ ।।

 

ताई तू होशील श्रीकृष्णाचा मुकूट आणि आम्ही मुकुटातील मणी ।

हीच विनवणी श्रीगुरुदेवांच्या चरणी । हीच विनवणी श्रीगुरुदेवांच्या चरणी ।। ४ ।।

 

– कु. कांचन कुटे, पुणे

 

 

४. पू. अनुताईची गुणवैशिष्ट्ये

४ अ. पू. (कु.) अनुराधा हिचा अक्षरयोग

‘जुलै १९९८ मध्ये संगणकीय अक्षरांचे जाणकार असलेले एक साधक आले होते. त्यांनी पू. (कु.) अनुराधा वाडेकर हिने सिद्ध केलेली अक्षरे पाहिली आणि त्यांच्या डोळ्यातून घळघळा पाणी आले. त्यांनी सांगितले की, एवढी सात्त्विक अक्षरे त्यांनी कधीच पाहिली नाहीत. त्यांनी सांगितले की, सर्व अक्षरे काढून झाल्यावर ते ‘गुरुकृपायोग’ नावाची लिपीच सिद्ध करणार आहेत.

 

पू. (कु.) अनुराधा हिच्या पुस्तकाचे नाव ‘अक्षरयोग’ असे असेल. अक्षरयोग म्हणजे अक्षरांच्या माध्यमातून जिवाची शिवाशी गाठ पडणे. सध्या सात्त्विक अक्षर सिद्ध करण्याचे काम चालू आहे. क्षात्रधर्मावर लिहिलेले पुस्तक सात्त्विक अक्षरात छापले, तर त्यातून शक्ती कशी येणार ? यासाठी पुढे राजसिक अक्षरेही बनवावी लागतील. अशाच प्रकारे विविध भाषांतील सात्त्विक अक्षरेही बनवायची आहेत.’ – डॉ. आठवले (जुलै १९९८)

 

४ आ. सनातनच्या पहिल्या गुरुकुलात गवसलेला हिरा : पू. अनुताई !

दगडांच्या खाणीत असलेल्या हिर्‍यावरची धूळ झटकून त्याला पैलू पाडल्याविना त्याचे ‘हिरेपण’ दृष्टीगोचर होत नाही. शीव आश्रमात प.पू. डॉक्टरांच्या पहिल्या गुरुकुलात असाच एक हिरा होता ‘पू. अनुताई’ ! या हिर्‍याला पैलू पाडले प.पू. डॉक्टरांनी ! या हिर्‍याचे ‘हिरेपण’ दर्शवणार्‍या शीव आश्रमातील या काही निवडक आठवणी…

 

४ आ १. सेवा परिपूर्ण होत नसल्याची खंत वाटून धाय मोकलून रडणार्‍यावर गुरुकृपा का होणार नाही ?

पू. अनुताई शीव आश्रमात प्रारंभी चित्रे काढण्याची सेवा करत असत. प.पू. डॉक्टरांनी पुढे पुढे आश्रमाचे व्यवस्थापन, पाहुण्यांचे नियोजन इत्यादी दायित्व पू. अनुताईवर सोपवले. या सर्व क्षेत्रांत अनुभव नसल्यामुळे त्यांच्याकडून आरंभी सेवा करतांना चुका होत. चुका झाल्यावर प.पू. डॉक्टर त्यांना योग्य दृष्टीकोनही देत. ‘आपल्याकडून प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा होत नाही’, याची खंत वाटून धाय मोकलून रडणार्‍या पू. अनुताई, या मी पाहिलेल्या पहिल्या साधिका होत. चुकांविषयी अशी तीव्र खंत निर्माण झाल्यानेच तशा प्रकारच्या चुका पुन्हा त्यांच्याकडून होत नसत.

 

४ आ २. दुसर्‍यांवर निर्व्याज प्रेम करणे, हा जणू स्थायीभाव

पू. अनुताई यांचे घर त्या वेळी ठाणे येथे रेल्वे स्थानकाच्या जवळ होते. ठाणे येथील एका आस्थापनात मी काम करत असे. काही वेळा कामावरून सुटल्यावर ठाणे जिल्ह्यातील आमच्या गावी जावे लागत असे. अशा प्रसंगी ‘सामान आदी ठेवण्यासाठी आमच्या घरी अगदी रात्री १२ वाजता गेलास तरी चालेल’, असे पू. अनुताई यांनी सांगितले. ‘एखाद्या वेळी घरी कोणी नसले, तरी शेजार्‍यांकडून चावी घेऊन घरी विश्रांती घेतली तरी चालेल’, असेही सांगितले. दुसर्‍यांवर निर्व्याज प्रेम करणार्‍या पू. अनुताईचा ‘प्रेमभाव’ हा जणू स्थायीभावच आहे.

 

४ आ ३. भक्ती अन् तळमळ यांच्या बळावर ‘कलायोग’ आत्मसात करण्याचा चमत्कार

पू. अनुताई यांनी कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे. प.पू. डॉक्टरांनी विविध साधनामार्गांनी साधना कशी करावी, हे शिकवतांना ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला‘ (कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती कशी करावी), याचीही शिकवण दिली.

 

४ आ ३ अ. देवतांची सात्त्विक चित्रे आणि सात्त्विक अक्षरांची निर्मिती

स्थुलातील कलेपेक्षा सूक्ष्मातील कलेचे जगत हे असामान्य अन् अद्भुत आहे. देवतेचे चित्र काढतांना त्यात देवतेचे तत्त्व अधिकाधिक आकृष्ट होण्यासाठी देवतेच्या स्पंदनांचा सूक्ष्मातील अभ्यास असणे आवश्यक असते. दिव्य दृष्टी असलेल्याला किंवा आध्यात्मिक पातळी अधिक असलेल्यालाच हे शिवधनुष्य खरेतर पेलू शकते; परंतु पू. अनुताई आणि सनातनच्या साधिका सौ. जान्हवी शिंदे यांनी हे शिवधनुष्य लीलया पेलले, ते त्यांच्यातील भक्ती अन् तळमळ यांच्या बळावर त्यांनी संपादन केलेल्या प.पू. डॉक्टरांच्या कृपेमुळे !

 

‘अक्षरयोग’ म्हणजे ‘सात्त्विक अक्षरांची निर्मिती’. ‘कलेच्या माध्यमातून ईश्वरप्राप्ती’ या साधनामार्गातीलच ही एक पायरी. सनातनने आतापर्यंत बनवलेल्या सात्त्विक अक्षरांच्या जन्मदात्या पू. अनुताईच आहेत.

 

४ आ ४. सेवा नव्हे, तपश्चर्याच !

गुरूंना अपेक्षित असे जो करतो तो ‘शिष्य’. गुरूंना अपेक्षित अशी स्थुलातील गोष्ट करणेही जिथे कठीण असते, तिथे गुरूंना अपेक्षित अशी सूक्ष्मातील गोष्ट करणे किती कठीण असेल ? प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सात्त्विक चित्रे अन् अक्षरे यांच्या निर्मितीसाठी पू. अनुताई यांनी कित्येक रात्री जागून काढल्या ! महत्प्रयासाने चित्र काढून पूर्ण झाल्यानंतर त्यातून अपेक्षित स्पंदने येत नसल्याने काही वेळा प.पू. डॉक्टर चित्रात पुष्कळ पालट सुचवत असत. त्या वेळीही न कंटाळता, न थकता, प्रतिक्रिया मनात न आणता किंवा निराश न होता ते चित्र साकार करणे, ही सेवा नव्हे, तपश्चर्याच आहे ! या सेवेला पैशाचे मोल नाही; म्हणून ही सेवा अनमोल आहे !

 

– श्री. संदीप आळशी (आत्ताचे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (आश्विन शुद्ध २, कलियुग वर्ष ५११३ (२७ ऑक्टोबर २०११))

 

४ इ. साधकांवर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या
पू. अनुताई वाडेकर यांच्या चरणी कृतज्ञतेचे पुष्प !

‘सर्व साधकांच्या लाडक्या असलेल्या पू. (कु.) अनुराधाताई वाडेकर संत झाल्या, हे ऐकून प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता वाटत आहे. पू. अनुताईचे नाव काढले, तरी अनेक साधकांच्या मुखातून एकच वाक्य ऐकायला मिळते. ते म्हणजे ‘त्यांच्यामुळे मी साधनेत टिकले आणि त्यांनी मला निराशेतून बाहेर आणले.’ संपर्कात येणार्‍या प्रत्येक साधकावर प्रीतीचा वर्षाव करणार्‍या आणि आम्हा साधकांना साधनेत पुढे नेणार्‍या पू. अनुराधाताई वाडेकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते.

 

४ इ १. कोणीही मनातील कोणताही विचार पू. अनुताईंना सांगू शकणे

ऑगस्ट २००६ मध्ये मला प.पू. डॉक्टरांनी उपायांसाठी रामनाथी आश्रमात बोलवले. आश्रमात माझ्या ओळखीचे साधक नसल्यामुळे मला जास्त एकटेपणा वाटत होता. पू. (कु.) अनुताईना हे न सांगताच एका दिवसात कळले. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर त्या म्हणाल्या, ‘‘तू काळजी करू नकोस. माझ्यासमवेत रहा.’’ त्यांना स्वतःला तीव्र त्रास, तसेच अनेक सेवा असूनसुद्धा रामनाथीला असलेल्या एक मासाच्या कालावधीत त्यांनी मला वेळ दिला. मी प्रतिदिन सकाळी त्यांच्या समवेत फिरायला जात असे. त्यामुळे साधनेतील अनेक गोष्टींविषयी योग्य दृष्टीकोन मिळाले. ताईमध्ये एवढी प्रीती आहे की, कोणीही आपल्या मनातील कोणताही विचार त्यांना सांगू शकतो.

 

४ इ २. व्यस्त असूनही विविध प्रकारे साधकांची काळजी घेणे

अ. मी केरळला गेल्यावरही पू. अनुताईंना अधून-मधून संपर्क करून साधनेविषयी मार्गदर्शन घ्यायचे.

 

आ. पू. कु. अनुताई कधी रामनाथीला, तर कधी देवद आश्रमात कार्यशाळेत भेटायच्या. तेव्हाही त्या कितीही व्यस्त असल्या, तरीही जेवणाच्या वेळी किंवा येता-जाता बोलत असत.

 

इ. ऑगस्ट २०११ मध्ये रामनाथी आश्रमात विदेशी साधकांची कार्यशाळा असतांना दिवसभर व्यस्त असूनही रात्री १ वाजता त्यांनी माझ्या साधनेतील सर्व अडचणींवर उपाय सांगितले.

 

ई. मी दोन आठवड्यांपूर्वी देवद आश्रमात गेले असता पू. अनुताईच्या खोलीतच रहायची संधी मिळाली. पू. अनुताई व्यस्त असल्या, तरीही खोलीतल्या सर्व साधिकांची काळजी घेतात. स्वतःचे कपडे धुलाई यंत्रात धुवायला जातांना आमचेही कपडे घेऊन जायच्या. आम्हाला सकाळी उठायला उशीर झाल्यास अल्पाहार खोलीत आणून देत असत. सातत्याने इतरत्रच्या साधकांच्या येत असलेल्या भ्रमणभाषला नम्रपणे प्रतिसाद देऊन त्यांच्या अडचणी सोडवत असत.

 

आमच्या पू. अनुताई संत झाल्या, ही सर्व साधकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही प.पू. डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’

 

– कु. रश्मी परमेश्वरन्, केरळ

 

४ ई. सतत दोन दिवस-रात्र सेवा करूनही तोंडावर थकवा न दिसणे

‘सध्या पू. अनुताई पू. राजेंद्रदादांसमवेत सेवा करत आहेत. एक दिवस त्यांच्या दिवसभर बैठका चालू होत्या. त्याच रात्री पू. अनुताई पूर्ण रात्रभर संगणकीय सेवा करत राहिल्या आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी ताईनी एका क्षणाचीही विश्रांती न घेता दिवसभर सेवा केली; परंतु त्यांच्या तोंडावर मुळीच थकवा दिसत नव्हता.’ – सौ. मानसी सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

 

५. पू. अनुताईच्या मार्गदर्शनाने झालेले लाभ

५ अ. पू. अनुताईने दिलेल्या दृष्टीकोनामुळे
साधनेला गती मिळणे आणि सर्व स्वीकारायची वृत्ती निर्माण होणे

‘दोन वर्षांपूर्वी मी देवद आश्रमात रहाण्यासाठी आलो. मला मागणी पुरवठा विभागात सेवा मिळाली. तेथे मला विशेष सेवा नव्हती. मला संगणक येत नसल्यामुळे इतर विभागांतही सेवा करू शकत नव्हतो. तेव्हा मला वाटायचे, ‘वयस्कर आणि ज्यांना संगणक येत नाही, अशा साधकांनी आश्रमात राहू नये.’ त्यानंतर मला उत्पादन विभागात सेवा मिळाली; पण तेथेही माझे मन रमेना. त्या वेळी सौ. श्रद्धा पवार देवद आश्रमात आल्या असतांना मी त्यांना ‘माझ्या सेवेत पालट करा’, अशी विनंती केली. नंतर एके दिवशी मी पू. अनुताईजवळ यासंबंधी बोललो. तेव्हा त्यांनी मला ‘काका, तुमचा अहं बाजूला ठेवा आणि ईश्वराने जे दिले आहे, ते स्वीकारा’, असा दृष्टीकोन दिला. या दृष्टीकोनाने माझ्या साधनेला महत्त्वाचे वळण लागले आणि त्याचा परिणाम म्हणजे मी उत्पादन विभागात पूर्णपणे रुळलो. या विभागात भरपूर सेवा आहे. माझ्यामध्ये सर्व स्वीकारायची वृत्ती निर्माण झाली आहे. उत्पादन विभागात सेवा करतांना भरपूर चैतन्य मिळते, हा दृष्टीकोन आल्यामुळे भगवान श्रीकृष्ण, प.पू. डॉक्टर आणि पू. अनुताई यांच्या चरणी मी कृतज्ञ आहे.’ – श्री. देवदत्त कुलकर्णी, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

सत्संगातून साधकांना साधनेची दिशा देतांना १. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर

६. पू. (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे

‘पू. (कु.) अनुराधा वाडेकर रायगड जिल्ह्यासाठी प्रसारसेविका म्हणून लाभल्या. देवद आश्रमात कार्यशाळेच्या आयोजनाच्या बैठकीत पू. अनुताईकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.

 

६ अ. प्रेमभाव

प्रेमभावाचे सगुण रूप म्हणजे ‘पू. अनुताई’, असे सांगता येईल. बैठकीला येणारे साधक लांबचा प्रवास करून आलेले असतात. त्या वेळी त्यांच्या प्रवास कसा झाला, काही अडचणी आल्या का, अल्पाहार झाला का, अशी विचारपूस पू. अनुताई करतात.

 

६ आ. परिपूर्ण नियोजन करणे आणि सर्वांना सामावून घेणे

बैठकीत एखाद्या सूत्रावर चर्चा झाल्यावर ‘अजून काही सूत्रे राहिली का’, असे विचारून परिपूर्ण नियोजन करून सर्वांना सामावून घेतले.

 

६ इ. विचारून घेण्याची वृत्ती

पू. राजेंद्रदादा आश्रमात उपस्थित असल्याने सकाळपासून झालेली सूत्रे महाप्रसादाच्या वेळी आणि नंतरची सूत्रे दुपारच्या अल्पाहाराच्या वेळी त्यांना विचारून घेत होत्या. त्यामुळे बैठकीत अनावश्यक चर्चा न होता योग्य तीच सूत्रे घेतली गेली.

 

६ ई. सकारात्मक दृष्टीकोन

समितीच्या कार्याची फलनिष्पत्ती २० टक्केच आहे, तर ‘आपण कोठे न्यून पडलो ? आपण कृतीच्या स्तरावर काय प्रयत्न करायला हवेत’, असा भाग ताईनी बैठकीत सांगितला. तसेच ‘बैठकीत सर्वांचा सहभाग असेल, तरच अडचणी सुटण्यास साहाय्य होईल’, असे सांगून सर्वांचा सहभाग वाढवला.

 

६ उ. सेवेचा पर्याय उपलब्ध करून देणे

भांडूपच्या एक साधिका धर्मशिक्षण घेण्याची सेवा चांगली करतात. त्यांच्या वर्गाला उपस्थिती चांगली असते. त्यांना काही अडचण असल्याने त्या करत असलेले प्रयत्न कार्यशाळेत सांगण्यासाठी येऊ शकत नव्हत्या. तेव्हा ‘घरी बसून वर्गाची संहिता लिहू शकतील’, असा विचार करून पू. अनुताईनी संहिता लिहिण्याचा पर्याय सुचवला.

 

६ ऊ. तळमळ

पू. राजेंद्रदादा आश्रमात उपस्थित होते. त्यांचा सत्संग आणि चैतन्य यांचा लाभ सर्व साधकांना व्हावा, ही
पू. अनुताईची तळमळ होती. तळमळ आणि धडपड यांमुळे आम्हा सर्वांना पू. दादांच्या सत्संगाचा लाभ झाला.

 

‘हे ईश्वरा, तुझ्याच कृपेमुळे आम्हाला पू. अनुताईसारख्या मार्गदर्शकाचा सत्संग लाभला. ताईकडे असलेले गुण आमच्यात येण्यासाठी त्या गुणांचा अभ्यास करून तळमळीने प्रयत्न होऊ देत’, ही तुझ्या चरणी प्रार्थना !’

 

– श्री. बळवंत पाठक, पनवेल, जिल्हा रायगड.

 

६ ए. चुकांचा अभ्यास कसा करावा ?

१. ‘चूक माझी आहे’, याची जाणीव किती आहे ?

२. मनात काय विचार येत आहेत ?

३. चुकीची खंत किती वाटते ?

४. ती चूक दुरुस्त करण्यासाठी काय उपाययोजना करणार ?

५. ती चूक दुरुस्त केली का, याचा आढावा घ्यावा.

६. ‘चुका झाल्या, तरी त्यांतून साधना कशी होईल’, असा विचार करावा.

७. चुकीचे गांभीर्य असेल, तर ती अल्प कालावधीत सुधारता येते. चुकीच्या परिणामांचा विचार केला, तर गांभीर्य निर्माण होते.

 

६ ऐ. संत चूक सांगत असतांना त्यामागील उद्देश लक्षात घेणे आवश्यक

संत चूक सांगतात, तेव्हा त्यामागे त्यांचा काय उद्देश आहे, हे लक्षात घेतले पाहिजे, उदा. पू. दादांनी ‘हात-पाय धुतांना माझ्यासाठी हातात रुमाल घेऊन थांबण्याची आवश्यकता नाही’, असे सांगितले. तेव्हा पू. अनुताई म्हणाल्या, ‘‘रुमाल घेऊन थांबणे, म्हणजे संतसेवा नाही, हे त्यांना दाखवायचे होते. तसेच असे करून वेळ घालवण्यापेक्षा संतांना जे अपेक्षित आहे, ते केल्यास जास्त लाभ होईल.’’

 

६ ओ. भाव

‘प्रसारात एखाद्या हिंदुत्ववाद्यांना भेटायला जातांना ‘श्रीकृष्णाला भेटायला जात आहे’, असा भाव ठेवावा.

 

६ औ. पू. दादांप्रती भाव

पू. दादा उपाय करतांना ध्यान लावून बसले होते. एका कार्यक्रमासाठी लवकर जायचे होते; म्हणून ताईनी त्यांच्या पायाच्या बोटांना हळूच स्पर्श करून त्यांना उठवले.’

 

– सौ. वेदिका पालन, डोंबिवली, जिल्हा ठाणे.

 

 

७. अनुभूती

७ अ. पू. अनुताईशी बोलल्यावर पाच मिनिटांतच हलके वाटू लागणे

‘कार्तिक शु. प्रतिपदा, कलियुग वर्ष ५११३ (२७.१०.२०११) या दिवशी मला शारीरिक आणि मानसिक स्तरावर त्रास होत होता. तेव्हा मी सर्व विचार एका कागदावर लिहिले आणि श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करत होते. त्यालाच विचारले की, हे सर्व कोणाला सांगू ? तेव्हा त्याने पू. अनुताईचे नाव सुचवले. त्यानंतर मी पू. अनुताईंना भेटले. त्यांच्याशी बोलल्यावर पाच मिनिटांतच मला हलके वाटायला लागले. त्यांनी उपायांविषयी एवढे साहाय्य केले की, मी या गोष्टीची कल्पनाच करू शकत नाही. तेव्हा जाणवले की, संतच एवढे निरपेक्ष प्रेम करू शकतात.’ – सौ. मानसी सहस्रबुद्धे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

 

या लेखाचा पहिला भाग वाचण्यावाठी येथे क्लिक करा.