इंग्रजीच्या तुलनेत मराठी खरी ज्ञानभाषा ! – प्रा. अनिल गोरे (मराठीकाका)

इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे, असे सांगत मराठी मात्र ज्ञानभाषा आहे कि नाही याविषयी मौन बाळगून नवनिर्वाचित साहित्य संमेलन अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शिक्षणाचे भाषामाध्यमाविषयीचे स्वत:चे घोर (की अघोरी ?) अज्ञान ३१ डिसेंबरला आकुर्डीमध्ये प्रकट केले आहे. या संदर्भात प्रा. अनिल गोरे मराठीकाका यांनी पुढील सूत्रे मांडली आहेत.

१. १८६० मध्ये इंग्रजी माध्यमातून शालेय आणि उच्चशिक्षण घेण्याची प्रथा इंग्लंडला चालू झाली. इंग्रजीतून शिकण्याचे प्रमाण जसजसे वाढत गेले, तसतसे इंग्लंडमधील विद्यार्थी जगातील अन्य भाषामाध्यमांतील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत गेले.

२. १९८५ पर्यंत भारतातील शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर झळकत होता. जसजसे इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे खूळ वाढत गेले, त्या प्रमाणात महाराष्ट्राने वरून खालच्या दिशेने झेप घेतली आणि सध्या महाराष्ट्र भारतातील राज्यांच्या क्रमवारीत वरून सतराव्या क्रमांकावर पोहोचला आहे. अनेक लोक आणि श्रीपाल सबनीस समजतात तशी इंग्रजी ही सर्वोत्तम ज्ञानभाषा नाही, हे जगभरात अनुभवाला आले आहे.

३. कोणत्याही विषयातील आशय व्यक्त करू शकणारी कोणतीही भाषा ज्ञानभाषाच असते; परंतु श्रीपाल सबनीस यांनी तुलनेसाठी निवडलेल्या मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांचा विचार करता मराठी ही भाषा ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम आहे, हे मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या अध्यक्षांना कुणीतरी समजावून द्यावे, असे मला वाटते.

– प्रा. अनिल गोरे (मराठीकाका)

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’