द्रोह करणार्‍यांना भक्तीऐवजी ‘अहंकार’ सिद्ध करायचा आहे ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

श्री शनिशिंगणापूर देवस्थान आणि सोळशी (सातारा) येथील शनि मंदिर यांच्या चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश केल्याचे प्रकरण 

sunil_chincholkar
पू. सुनील चिंचोलकर

पुणे, २६ डिसेंबर (वार्ता.) – जे लोक बंड करून दर्शनाला जातात, त्यांची भक्ती अल्प आणि अहंकार अधिक आहे. त्यात त्यांना भक्तीऐवजी अहंकार सिद्ध करायचा आहे. त्यांना श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी काही देणे-घेणे नाही. खरा शनिभक्त असे कधीच करणार नाही. ते भक्त नसून बंडखोर आहेत. भगवद्गीतेतील १६ व्या अध्यायात ‘अद्रोह’ हे दैवी संपत्तीचे लक्षण म्हटले आहे. हे सर्व लोक द्रोह किंवा विद्रोह करतात, ती असुरी संपत्ती आहे, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी केले.

काही दिवसांपूर्वी श्री शनिशिंगणापूर देवस्थान आणि सोळशी (सातारा) येथील श्री शनि मंदिर येथील चौथर्‍यावर काही महिलांनी प्रवेश केला. त्या प्रकरणी पू. सुनील चिंचोलकर यांनी त्यांचेे मत दैनिक सनातन प्रभातच्या वार्ताहराकडे व्यक्त केले. ते पुढे म्हणाले, “ज्या ठिकाणच्या देवळांमध्ये स्त्रियांना जाण्याची अनुमती आहे, अशी अनेक स्थाने आहेत. श्री क्षेत्र गोंदवले, सज्जनगड, पंढरपूर आदी अनेक अशा अनुमती असल्या ठिकाणी स्त्रियांनी जावे. जिथे मुळात नियम आणि शिस्त देवस्थानाने ठेवले आहेत, ते नियम मुद्दाम मोडण्याचे कारण काय ? याला भक्ती म्हणायचे का ? भक्ती म्हणजे शरणागती असते. संत चोखामेळा १३ व्या शतकात होते. त्या वेळी त्यांना पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. ते मागासवर्गीय असल्याने त्या वेळी श्री विठ्ठल मंदिर त्यांच्यासाठी उघडे नव्हते. त्यासाठी संत चोखामेळा यांनी आंदोलन केले नाही; मात्र विठ्ठलभक्तीत त्यांचे नाव अमर राहिले. संत चोखामेळा एका अभंगात उंबरठ्याशी कैसे शिवू । आम्ही जातीहीन ॥ असे म्हटले आहे; म्हणून लोकांनी त्यांना डावलले नाही, तर त्यांचा अग्निसंस्कार संत नामदेव यांनी पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरासमोर केला. आजही संत चोखामेळा यांची समाधी श्री विठ्ठल मंदिरासमोर आहे. त्यांचे लता मंगेशकर, पं. भीमसेन जोशी यांच्यासारख्या गायकांनी त्यांचे अभंग म्हटलेले आहेत.”

संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’