शरीर निरोगी रहाण्यासाठी अवेळी खाणे टाळा

Article also available in :

१. रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण इत्यादी खात असाल, तर सावधान !

‘झोपण्या-उठण्याच्या वेळा निश्चित नाहीत, व्यायाम नाही, नेहमी रात्रीच्या वेळी चिप्स, फरसाण, भाकरवडी, शेव, चिवडा यांसारखा फराळ चालू आहे’, असे असूनही जर तुम्ही निरोगी असाल, तर ती तुमची पूर्वपुण्याईच म्हणावी लागेल; परंतु लक्षात घ्या ! ही पूर्वपुण्याई संपली की, आता चालू असलेल्या चुकीच्या सवयींचे परिणाम रोगाच्या रूपाने दिसू लागतील. मग ‘त्या वेळी चांगल्या सवयी लावल्या असत्या, तर बरे झाले असते’, असे म्हणायची पाळी येईल. आपण साधक आहोत. शरीर निरोगी राहिल्यास साधना चांगली होते. त्यामुळे आपल्याला साधनेसाठी निरोगी शरीर हवे. शरीर निरोगी रहाण्यासाठी केवळ दोनच गोष्टी करा ! २ वेळा पुरेसा आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा !’

 

२. कोणताही आवडीचा पदार्थ अवेळी न खाता जेवणाच्या वेळीच खा !

‘आयुर्वेदाला चटपटीत आणि चवदार पदार्थांचे वावडे आहे का ? मुळीच नाही. उलट रुची घेऊन जेवल्याने समाधान मिळते. त्यामुळे पदार्थांच्या चवींमध्ये विविधता हवीच; परंतु एखादा पदार्थ कितीही आवडणारा असला, तरी तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खाण्याला पुष्कळ महत्त्व आहे. तसे केले नाही, तर त्याचा आज ना उद्या त्रास होणारच. ‘कोणताही आवडीचा पदार्थ पचत असेल, तर खाण्यास काहीच आडकाठी नाही; मात्र तो पदार्थ जेवणाच्या वेळेतच खावा. अवेळी खाऊ नये.’ हा नियम पाळल्यास शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होईल आणि साधनाही चांगली होईल.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.९.२०२२)

Leave a Comment