भक्तीमय वातावरणात पार पडला श्रीविष्णूच्या रूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा चैतन्यदायी ‘रथोत्सव’ !

सप्तर्षींच्या आज्ञेने रथात विराजमान श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (डावीकडे) आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडे)

रामनाथी (गोवा) – परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव ही साधकांसाठी आनंदाची अन् भक्तीभावाची पर्वणीच असते ! वैशाख कृष्ण सप्तमी, म्हणजे २२ मे २०२२ या मंगलदिनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ८० वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांचा रथोत्सव साजरा करावा’, अशी सनातनच्या साधकांना आज्ञा केली. महर्षींच्या आज्ञेने होणार्‍या या जन्मोत्सवामध्ये साधकांना गुरुदेवांचे अवतारी तत्त्व भरभरून अनुभवण्यास मिळाले.

रथात श्रीविष्णुरूपात विराजमान झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्यासमोर त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी जेव्हा रथाद्वारे मार्गक्रमण केले, तेव्हा ‘रामराज्यासम असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व आध्यात्मिक अडथळे दूर होत आहेत’, या जाणीवेने साधकांचा भाव दाटून आला. भक्तीमय वातावरणात संपन्न झालेला हा गुरुदेवांचा ८० वा जन्मोत्सव, म्हणजे साक्षात् वैकुंठ भूलोकी अवतरल्याची अनुभूती साधकांना आली. गुरुमाऊलींची प्रत्यक्ष उपस्थिती, अत्यंत भक्तीमय वातावरण आणि त्यांच्या चरणी सेवा अर्पण करण्याची मिळालेली संधी यांमुळे साधकांच्या मनमंदिरातील भाव त्यांच्या मुखमंडलावर ओसंडून वहात होता.

 

असा झाला आनंददायी रथोत्सव !

दिंडीत सहभागी साधक

दुपारी श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति सौ. बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली गाडगीळ यांचे रथोत्सवाच्या आरंभस्थळी मंगलमय आगमन झाले. आरंभी तीनही गुरूंनी पालखीत विराजमान असलेल्या ‘श्रीराम शाळीग्रामा’चे दर्शन घेतले. त्यानंतर साधकांनी फुलांनी भावपूर्ण सजवलेल्या रथावर परात्पर गुरु डॉ. आठवले वेदमंत्रांच्या घोषात विराजमान झाले. त्यानंतर श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांच्या आसनाच्या समोर त्यांच्या उजवीकडे श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि डावीकडे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ विराजमान झाल्या.

शंखनाद करून रथोत्सवाला आरंभ झाला. रथोत्सवामध्ये प्रारंभी धर्मध्वज, त्यानंतर मंगलकलश घेतलेल्या सुवासिनींचे पथक आणि सनातनचे संत यांची उपस्थिती होती. त्यांच्या पाठीमागे टाळपथक आणि भगवे ध्वज हातात घेतलेले साधक यांचे पथक होते.

त्यानंतर नृत्य करणार्‍या साधिकांचा गट, ‘श्रीराम शाळीग्राम’ असलेली पालखी, नृत्यसेवा अर्पण करणार्‍या साधिकांचा दुसरा गट, श्रीविष्णूच्या रूपातील गुरुदेवांचा मंगलरथ, भगव्या पताका हातात धरलेले साधक-साधिका, नृत्यसेवा सादर करणार्‍या साधिकांचा तिसरा गट आणि भगव्या पताका हातात धरलेले साधक-साधिका असा या भावमयी रथोत्सवाचा क्रम होता. या प्रसंगी श्रीमन्नारायणाचे नामसंकीर्तन करून श्रीविष्णुची स्तुती करण्यात आली. गुरुमाऊलींचे गुणसंकीर्तन करणार्‍या विविध जयघोषांसह श्रीविष्णुप्रती भावजागृती करणार्‍या विविध भक्तीगीतांच्या धूनही या वेळी ध्वनीक्षेपकाद्वारे लावण्यात आल्या.

रथोत्सवात महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील नृत्य विभागातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. अपाला औंधकर (वय १५ वर्षे) आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. शर्वरी कानस्कर (वय १५ वर्षे) यांच्यासह अन्य साधिकांनी ३ ठिकाणी भक्तीगीतांवर नृत्यसेवा सादर केली. रामनाथी ते नागेशी या १ किलोमीटरच्या परिसरात शेकडो भाविक आणि ग्रामस्थ यांनी श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे भावपूर्ण दर्शन घेतले.

रथोत्सवाला सनातनचे सद्गुरु आणि संत यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सनातनचे ६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक श्री. विनायक शानभाग आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विभागाच्या समन्वयक ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. तेजल पात्रीकर यांनी रथोत्सवाचे भावपूर्ण सूत्रसंचालन केले. सनातनचा रामनाथी आश्रम, रामनाथी तळे, पारपतीवाडा यामार्गे नागेशी येथे जाऊन पुन्हा सनातनच्या आश्रमात रथोत्सवाची भावपूर्ण सांगता करण्यात आली.

 

श्रीविष्णूचे वस्त्रालंकार परिधान करण्याविषयी परात्पर गुरु डॉक्टरांचा विचार !

‘म्हातारपण म्हणजे दुसरे बालपण’, असे म्हणतात. याची अनुभूती मी ८० व्या वाढदिवसाला घेतली. लहान मुलांना ‘राम’ आणि ‘कृष्ण’ यांच्या प्रमाणे जसे सजवतात, तसे ८० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सप्तर्षींच्या आज्ञेने साधकांनी मला श्रीविष्णूच्या वेशात सजवले होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

 

संतांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अवतार संबोधण्याचे कारण !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कधीही स्वतःला अवतार म्हटलेले नाही. सनातन संस्थाही असे कधी म्हणत नाही. ‘नाडीभविष्य’ या प्राचीन अन् प्रगल्भ ज्योतिषशास्त्रानुसार सप्तर्षींनी प्रत्येक व्यक्तीचे भविष्य लिहून ठेवले आहे. तमिळनाडूतील जीवनाडीपट्टीचे वाचन करणारे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सप्तर्षींनी जीवनाडीपट्ट्यांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अवतार असल्याचे लिहून ठेवले आहे. सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेने आणि नाडीपट्टीमध्ये सांगितल्यानुसार जन्मोत्सवाच्या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीविष्णूच्या रूपात वस्त्रालंकार धारण केले आहेत.

 

गुरुदेवांचा जयजयकार करणार्‍या काही भावपूर्ण घोषणा !

  • सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले जी की जय ।
  • परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले जी की जय ।
  • सनातन धर्मराज्य संस्थापक, सप्तर्षि गौरवगाथा नायक, कलियुग नारायण श्री श्री जयंत बाळाजी आठवले जी की जय ।

Leave a Comment