मकरसंक्रांतीचे महत्त्व

मकरसंक्रांत हा जरी अयन-वाचक सण असला, तरी हिंदु धर्मात त्याला अनेक दृष्टीकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे. मकरसंक्रांतीचे महत्त्व काही सूत्रांद्वारे समजून घेऊया.

 

मकर संक्रांती चलच्चित्रपट (Makar Sankranti Videos : 8)

१. मकरसंक्रांतीचे व्यावहारिक महत्त्व

भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. या दिवशी इतरांना तीळगूळ देण्यापूर्वी देवाच्या समोर ठेवावा. त्यामुळे तीळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून रहाते. तीळगूळ देतांना आपल्यात चैतन्य आणि वेगळाच भाव जागृत होतो. व्यावहारिक स्तरावरील जिवाला घरात असलेल्या वातावरणातील चैतन्याचा लाभ होतो. त्याच्यातील प्रेमभाव वाढतो. त्याला नकारात्मक दृष्टीकोनातून सकारात्मक दृष्टीकोनात जाण्यास साहाय्य होते.

 

तीळगुळाचे महत्त्व

तिळामध्ये सत्त्वलहरींचे ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते.

तीळगूळ
तीळगूळ

२. मकरसंक्रांतीचे साधनेच्या दृष्टीने महत्त्व

मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे वातावरण जास्त चैतन्यमय असते. साधना करणार्‍या जिवाला या चैतन्याचा सर्वाधिक लाभ होतो. या चैतन्यामुळे त्या जिवातील तेजतत्त्व वृद्धींगत व्हायला साहाय्य होते. या दिवशी प्रत्येक जिवाने वातावरणातील रज-तम वाढू न देता अधिकाधिक सात्त्विकता निर्माण करून त्या चैतन्याचा लाभ करून घ्यावा. मकरसंक्रांतीचा दिवस साधनेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या काळात अधिकाधिक प्रमाणात साधना करून ईश्वर आणि गुरु यांच्याकडून चैतन्य मिळवण्याचा प्रयत्न करा. – श्री गणेश (श्री. भरत मिरजे यांच्या माध्यमातून, ८.१.२००६, रात्री ९.४५)

 

अ. साधनेला अनुकूल काळ

‘संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो; कारण या काळात ब्रह्मांडात आप, तसेच तेज या तत्त्वांशी संबंधित कार्य करणार्‍या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते.’ – सूक्ष्म जगतातील ‘एक विद्वान’ (२२.२.२००५, रात्री)

 

आ. एका ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग दाखवणे

‘संक्रांती ही मातीच्या घड्याचे पूजन आणि उपायन देण्याचा विधी यांद्वारे पाच तत्त्वांनी बनलेल्या जिवाच्या देहाद्वारे साधना करून त्रिगुणांचा त्याग करून द्वैतातून अद्वैतात, म्हणजे एका ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग दाखवते.’ – सौ. कणगलेकर (पौष शु. षष्ठी, कलियुग वर्ष ५११० (२.१.२००९))

 

३. प्रकाशमय कालावधी

‘या दिवशी यज्ञात हवन केलेली द्रव्ये ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर देव अवतरित होतात. याच प्रकाशमय मार्गाने पुण्यात्मा पुरुष शरीर सोडून स्वर्गादी लोकी प्रवेश करतात; म्हणून हा कालावधी प्रकाशमय मानला गेला आहे.

 

४. या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे महत्त्व

या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळ-तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत; म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे. ‘जीवनात सम्यक् क्रांती आणणे’, हे मकरसंक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे.

 

 

५. मकरसंक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व

धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर शंभरपटीने प्राप्त होते.

 

६. प्राकृतिक उत्सव

हा प्राकृतिक उत्सव आहे, प्रकृतीशी ताळमेळ साधणारा उत्सव आहे. दक्षिण भारतात हे पर्व ‘थई पोंगल’ नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला ‘तिरमौरी’ म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक ‘मकरसंक्रांत’ म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व ‘उत्तरायण’ नावाने ओळखले जाते.

 

७. शरशय्येवर उत्तरायणाची वाट पहात संकल्प बळाने ५८ दिवस पडून रहाणारे भीष्माचार्य

शरशय्येवर भीष्माचार्य
शरशय्येवर भीष्माचार्य

उत्तरायण पर्वाची वाट पहाणार्‍या भीष्म पितामहांनी उत्तरायण चालू झाल्यानंतरच देहत्याग करणे पसंत केले होते. जगातील कोणत्याही योद्ध्याने शरशय्येवर अठ्ठावन्न दिवस काय अठ्ठावन्न घंटेही संकल्प बळाने जगून दाखवले नाही. ते काम भारताच्या भीष्म पितामहांनी करून दाखवले.’ – ऋषी प्रसाद (जानेवारी २०११)

८. जीवनाकडे साक्षीभावाने पहाण्यास शिकवणारा सूर्याचा उत्सव

सूर्याच्या उत्सवाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. कर्कसंक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ, म्हणजे खाली जाते. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर, म्हणजे वर जाते. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. कोणत्याही ग्रहमालेतील कोणत्याही ग्रहाचे मध्यबिंदूकडे जाणे, म्हणजे ‘खाली जाणे’ आणि मध्यबिंदूपासून लांब जाणे, म्हणजे ‘वर जाणे.’ कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे जाणे, म्हणजे वरून खाली जाणे अन् मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे जाणे, म्हणजे खालून वर जाणे.

मकरसंक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव; म्हणून तो महत्त्वाचा मानला आहे. पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणार्‍या चढउतारांकडे, सुख-दुःखांकडे समत्व दृष्टीने, साक्षीभावाने पहायला हवे, असाच संदेश मिळतो.

 

९. सूर्यदेवाने तहानलेल्या अश्वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कतज्ञता व्यक्त करण्याचा सण

सूर्यदेवाने जास्तीतजास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळवण्यासाठी साधना (तपश्चर्या) चालू केली. त्या वेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून (विहिरीतून घड्याने पाणी काढतात तसे) घोड्यांना प्यायला दिले; म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीची मडकी पूजण्याची प्रथा चालू झाली. रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदीकुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात. याला काळच साक्षी आहे.’ – ब्रह्मतत्व, ९.१.२००४, सायं. ७.४५

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’

Leave a Comment