हिंदुत्वाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी धर्मप्रेमींना आवाहन !

हिंदु धर्मप्रसार आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी पूर्णकालीन धर्मसेवा करण्यासाठी सिद्ध व्हा !

हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असे की, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा तेव्हा धर्माची पुनर्स्थापना होते. हिंदु धर्माला आद्य शंकराचार्य, समर्थ रामदासस्वामी, स्वामी विवेकानंद इत्यादींसारख्या तेजस्वी धर्मप्रसारकांची परंपरा लाभली आहे. या धर्मप्रसारकांनी काळाची आवश्यकता लक्षात घेऊन हिंदु धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी धर्मप्रसार आणि धर्मरक्षण केले. सध्या केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीवरच धर्माला आलेली एक प्रकारची ग्लानी आपण अनुभवत आहोत. अशा धर्मग्लानीच्या काळात धर्मसंस्थापनेसाठी कार्य करणे, ही काळानुसार साधना असते.  सध्या भारतात धर्माधिष्ठित राज्यव्यवस्था निर्माण करणे, म्हणजेच हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, ही साधना ठरणार आहे. भारतात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटना अविरत कार्यरत असल्या, तरी भारतवर्ष अन् हिंदु धर्म यांच्या समोरील वर्तमान परिस्थितीतील आव्हानांचा विचार करता धर्मासाठी समर्पित कार्य करणार्‍या धर्मविरांची मोठी आवश्यकता आहे.

 

१. त्याग ही साधना आहे, हे लक्षात घ्या !

हिंदु धर्म धर्मासाठी त्याग करण्याची शिकवण देतो. धर्माने गृहस्थाश्रमी व्यक्तीलाही आयुष्याच्या अंती वानप्रस्थाश्रम (वनात जाऊन साधना करणे) आणि त्या पुढे संन्यासाश्रम (सर्वस्वाचा त्याग करणे) स्वीकारण्याची, म्हणजे त्याग करण्याची शिकवण दिली आहे; कारण त्याग केल्याविना मनुष्यजन्माचे सार्थक (आध्यात्मिक उन्नती) होत नाही.  हिंदु धर्मानुसार त्याग ही साधना असल्याने टप्प्याटप्प्याने त्याग करण्याची क्षमता वाढवणे अपेक्षित असते. शेवटी धर्माचे आचरण आणि रक्षण यांसाठी, तसेच आध्यात्मिक उन्नतीसाठी तन, मन आणि धन या सार्‍यांचा, म्हणजे सर्वस्वाचा त्याग करावयाचा असतो. या दृष्टीकोनातून पूर्णवेळ धर्माची सेवा करणे, हा सर्वस्वाचा त्याग करण्याचा पहिला टप्पा आहे.

 

२. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी पूर्णवेळ योगदान द्या !

नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून आज अनेक धर्मप्रेमी धर्मप्रसाराची सेवा करतच आहेत. आता मात्र धर्मकार्यासाठी स्वतःचे पूर्णवेळ योगदान देण्याची वेळ आली आहे. कालमहिम्यानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे; पण काळानुसार साधना म्हणून या संधीकालात पूर्णवेळ धर्मसेवा केल्यास आपली शीघ्र आध्यात्मिक उन्नती होणार आहे. जे धर्मप्रेमी पूर्णकालीन सेवा करू शकत नाहीत, त्यांनी धर्मसेवेसाठी अधिकाधिक वेळ देण्याचा तरी प्रयत्न करावा.  धर्मो रक्षति रक्षितः । (मनुस्मृति, अध्याय ८, श्‍लोक १५) म्हणजे धर्माचे रक्षण करणार्‍याचे धर्म, म्हणजेच ईश्‍वर रक्षण करतो, या वचनानुसार धर्माचे कार्य करणार्‍यांचे रक्षण भगवान श्रीकृष्ण निश्‍चितच करणार आहे, अशी श्रद्धा बाळगा. कौटुंबिक समस्या, तसेच आर्थिक अडचणी यांविषयी कसलीही चिंता न करता पूर्णवेळ साधना करण्याचे पाऊल शीघ्रतेने उचला आणि महद्भाग्याने मिळालेल्या मनुष्यजन्माचे सार्थक करून घ्या !

– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.९.२०१७)