संमोहन आणि संमोहन-उपचार यांविषयीचे अपसमज !

डॉ. (सौ.) आशा ठक्कर
प्रा. शाम मानव सध्या सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर करत असलेल्या बेछूट आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी विशद केलेले संमोहन व संमोहन-उपचार यांबद्दलचे अपसमज येथे देत आहोत.
संकलक : डॉ. (सौ.) आशा ठक्कर, मडगाव, गोवा
 
डॉ. (सौ.) आशा ठक्कर यांचा परिचय
डॉ. (सौ.) आशा ठक्कर या मानसोपचार या विषयात एम्.डी आहेत. त्यांनी १ वर्षे विविध मानसिक उपचार पद्धतींचा अभ्यास केला आहे. त्यानंतर त्यांनी संमोहन उपचार शिकून घेतले. डॉ. (सौ.) ठक्कर यांनी मुंबई आणि गोवा येथील शासकीय रुग्णालयांत वरिष्ठ डॉक्टर म्हणून सेवा केली. वर्ष १९९१ पासून त्या मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ म्हणून रुग्णांवर उपचार करत आहेत.
 
संमोहन हा शब्दच असा आहे की, त्याचा नुसता उच्चार केला, तरी बहुतेक लोकांच्या मनात एकप्रकारचे भय आणि खूप कुतुहल निर्माण होते. संमोहनाविषयी लोकांच्या मनात जेवढे गैरसमज, भय अथवा कुतुहल असते, तेवढे विज्ञानाच्या इतर कुठल्याही शाखांविषयी नसते.
 
१. संमोहक आणि संमोहन-उपचारतज्ञ यांच्याविषयीचे अपसमज
१ अ. दुरुपयोग : एकदा आपण संमोहनावस्थेत गेल्यावर संमोहक आपल्याकडून खून, दरोडे यांसारखी दुष्कृत्ये करवून घेतील, इतकेच नव्हे, तर या आपल्या संमोहित अवस्थेचा फायदा घेऊन आपल्याला पळवून नेतील किंवा आपल्यावर बलात्कार करतील अथवा महत्त्वाच्या दस्तावेजांवर सह्याही घेतील, अशी पुष्कळांची समजूत असते.
 
संमोहक आपला गैरफायदा घेईल, अशा तर्‍हेची भीती वाटणे यात काही तथ्य नाही; कारण व्यक्तीचे जे काही मूळ नैतिक अधिष्ठान असते, त्याच्या विरुद्ध जाऊन संमोहक त्या व्यक्तीकडून काहीही करवून घेऊ शकत नाही. एखाद्या खुन्याला जर संमोहनावस्थेत नेऊन एखाद्याचा खून करण्यास सांगितले, तर तो तसे करू शकेल; कारण ही सूचना त्याच्या नैतिकतेविरुद्ध नसते. याउलट हीच सूचना एखाद्या नीतीमान माणसाला दिली गेली, तर ती तो अमलात आणणार नाही.
 
१ आ. हानीकारक सूचनांपासून व्यक्ती स्वतःचा बचाव कशी करते ?
संमोहकाकडून व्यक्तीच्या नीतीमत्तेमध्ये न बसणारी आणि मनाविरुद्ध अशी सूचना दिली गेली असता, ती स्वतःचा बचाव खालील पद्धतींपैकी एका पद्धतीने करील.
 
१ आ १. संमोहित व्यक्ती स्वतःचे डोके वगैरे दुखत आहे, अशी सबब देऊन ती व्यक्ती संमोहनावस्थेतून बाहेर येते.
 
१ आ २. संमोहकाकडून दिली गेलेली अप्रिय सूचना आपल्याला जणूकाही ऐकूच आली नाही, असे भासवून व्यक्ती संमोहनावस्थेत तशीच रहाते किंवा काही वेळा झोपीसुद्धा जाऊ शकते.
 
१ इ. खलनायकी स्वरूप : याविषयीच्या भीतीमागचे मुख्य कारण म्हणजे चित्रपट, नाटके, कथा-कादंबर्‍या, वगैरेंत संमोहकाला नेहमी खलनायकाच्या स्वरूपात रंगविलेले असते. अशा तर्‍हेच्या भयानक वर्णनांवरून, संमोहक हा नेहमी भेदक डोळ्यांचा, दिसायला भयानक असा असला पाहिजे, अशी कित्येकांची कल्पना झालेली असते.
 
१ ई. व्यक्तीच्या गुपितांची माहिती करून घेणे : खरी वस्तूस्थिती अशी आहे की, व्यक्तीचा नुसता चेहरा, हस्ताक्षर, कपडे वगैरे पाहून गुपिते जाणून घेण्याची दिव्य शक्ती संमोहकाकडे अजिबात नसते. अशी काही अद्भुत शक्ती नसल्यामुळेच रुग्णाकडून आजारासंबंधी माहिती मिळवण्यासाठी रुग्णाशी बोलण्यात संमोहन-उपचारतज्ञाला कित्येक तास खर्ची घालावे लागतात. कित्येक वेळा संमोहन-विश्‍लेषणासाठी कित्येक आठवडे खर्च करावे लागतात; तेव्हा कुठे रुग्णाच्या अंतर्मनात दडलेली एखादी गोष्ट उघड होऊ शकते. खरी गोष्ट अशी आहे की, मनोरुग्णाला बरे करण्यासाठी आणि त्याच्यावर योग्य ते उपचार योजण्यासाठी रुग्णाकडून संमोहन-उपचारतज्ञाला अधिकाधिक माहिती, अगदी त्याची गुपितेसुद्धा माहिती असणे जास्त आवश्यक असते. अर्थात आपली गुपिते संमोहक जाणून घेईल, ही भीतीच मुळी चुकीच्या संकल्पनेवर आधारलेली आहे.
 
२. व्यक्तीबद्दलचे अपसमज
२ अ. बुद्धीने कमी : आपण स्वतः बुद्धीने कमी आहोत, अशी लोकांची आपल्याबद्दल समजूत होईल, या भयगंडाने पुष्कळ जण संमोहित व्हायचे टाळतात, असे दिसून येते. खरे पहाता बुद्धीने कमी असलेल्या लोकांना संमोहनावस्थेत जाणे त्यामानाने कठीण जाते आणि याउलट बुद्धीमान मात्र संमोहनावस्था लवकर गाठू शकतात, असा अनुभव आहे.
 
२ आ. इच्छाशक्ती कमकुवत होणे : काही जणांच्या मते (काही मानसोपचारतज्ञांच्या मतेसुद्धा) माणूस अनेकदा संमोहनावस्थेमध्ये गेला किंवा त्याच्यावर बरेच वेळा संमोहन-उपचार केले की, तो मनाने कमकुवत होतो आणि त्यामुळे पुढील सार्‍या आयुष्यात त्याला संमोहकाच्या किंवा संमोहन-उपचारतज्ञाच्या आधारे जगावे लागते. संमोहन-उपचारपद्धतीनुसार रुग्णाला योग्य स्वयंसूचना स्वतःला कशा द्याव्या, याची मूलभूत तत्त्वे शिकवली जातात. या उपचारपद्धतीचा अवलंब केला की, रुग्णाला संमोहन-उपचारतज्ञाकडे वरचेवर धाव घ्यावी लागत नाही. या उलट इतर मनोविकारतज्ञ, तसेच मानसोपचारतज्ञ मनोरुग्णाला स्वतःचे आजार स्वतःच उपचार करून कसे बरे करायचे, हे शिकवत नाहीत, असे सर्वसामान्यपणे दिसून येते. याचा अनिष्ट परिणाम म्हणजे मनोरुग्ण नेहमी मानसोपचारतज्ञांवर अवलंबून रहातो; पण अशी शक्यता स्वसंमोहन-उपचारपद्धतीमध्ये नसते.
 
३. संमोहनावस्थेविषयीचे काही अपसमज
३ अ. बेशुद्धावस्था : संमोहनावस्थेत जाणे म्हणजे बेशुद्ध होणे, अशा तर्‍हेची गैरसमजूत काही लोकांत असते. व्यक्ती संमोहनावस्थेत गेली, तर ती बेशुद्ध वगैरे कधीच होत नाही. तिला तिच्या आजूबाजूच्या वातावरणाचे पूर्ण भान असते. एकदा संमोहनावस्था गाठल्यावर आजूबाजूचे काही आवाज आले आणि त्या आवाजाचा स्वतःशी काही संबंध नसला, तर त्याकडे व्यक्ती पूर्ण दुर्लक्ष करू शकते; परंतु त्या आवाजाशी काही संबंध असेल, तर त्याची योग्य प्रकारे दखल घेऊ शकते. गाणे गातांना, अभ्यास करतांना, ध्यानधारणा करतांना साधारणपणे अशा तर्‍हेचीच मनाची स्थिती असते.
 
४. संमोहन-उपचाराविषयीचे काही अपसमज
४ अ. आध्यात्मिक उन्नत आणि संमोहन-उपचार : अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना संमोहनाबद्दल विचारणा केली जाते; यावरून आपल्याकडील लोकांची मनोवृत्ती स्पष्ट होते. अध्यात्मात ज्यांनी प्रगती केली आहे, त्यांना इतर सर्व शास्त्रांचेही ज्ञान असते, अशी लोकांची एक समजूत असते. हे फक्त अत्युच्च पातळीच्या उन्नतांच्या बाबतीत शक्य असते; म्हणून अध्यात्माशी संमोहनाचा काहीएक संबंध नसला, तरी त्याबद्दल लोक अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना प्रश्‍न विचारतात व त्यांना चुकीची उत्तरे मिळतात. एखाद्या अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीने ज्ञानमार्ग स्वीकारला असेल, तर त्याला भक्तीमार्गाबद्दल काही कोणी विचारू नये, तसे हे आहे. पूल, रेल्वेमार्ग कसा बांधावा किंवा एखादे गणित कसे सोडवावे, अशा तर्‍हेचे प्रश्‍न जसे कोणी अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना विचारू नये, तसेच संमोहनशास्त्राबद्दलही कोणी त्यांना विचारू नये, हेच उत्तम. अर्थात अध्यात्मवादी असून जर त्याने संमोहनशास्त्राचा अभ्यास केला असेल, त्यावर प्रभुत्व मिळविले असेल, तर मात्र गोष्ट निराळी.