सनातन संस्थेची न्याय्य बाजू मांडल्याची काही प्रातिनिधिक वृत्ते !

सनातनला आरोपीच्या पिंजर्‍यात उभ्या करणार्‍या वृत्तांचा उन्मेष गुजराथी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून घेतलेला समाचार !
 
समीर गायकवाड : आरोप आणि उठाठेव
समीर गायकवाडला अटक झाल्याची बातमी सगळ्यांनी रंगवून दिली; पण सनातनची बाजू कोण मांडणार? मी तसे करून पाहिले. आणि आज दिवसभर माझा फोन वाजत राहिला. मी सनातनचा साधक झालोय कि काय, अशी शंकाही कित्येकांना आली. पण असे काहीही झालेले नाही आणि यापुढेही होणार नाही याची खात्री असू द्या.
 
पण तरीही पत्रकार म्हणून दोन्ही बाजू मांडणे मी माझे कर्तव्यच समजतो. त्यातली एक बाजू सगळ्यांनीच इतकी उचलून धरलीय, की त्यात आता नवीन सांगण्यासारखे काहीच नाही. म्हणूनच मी दुसर्‍या अ(ल्प)प्रकाशित बातमीला पुढे आणायचे ठरवले.
 
गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत संबंधित व्यक्तीला निर्दोषच समजले जाते; पण आजकाल मिडिया ट्रायलच्या नावाखाली व्यक्तीचा हा अधिकारच हिरावून घेतला जातोय. एकाच बाजूने बातमी रंगवून, आणि त्याचाच भडीमार केला जातोय.
 
आता आजचेच उदाहरण घ्या. त्या समीर गायकवाडच्या घरात २३ मोबाईल, एक धारधार चाकू, सनातनचे प्रचार साहित्य सापडले. पण याचा कॉ. पानसरेंच्या हत्येशी काही संबंध सिद्ध झालाय का? 
 
मोबाईल म्हणजे बंदुका सापडल्या अशा थाटात आज सगळीकडे बातम्या देताहेत. अरे, मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करणार्‍याकडे मोबाईल नाही तर काय मिसाईल सापडणार ?
 
एखाद्याची फुकट बदनामी करायची म्हणजे तरी किती? म्हणे घरात एक धारदार चाकू सापडला? कुणाच्या घरात नसतो चाकू? आणि चाकूला धार असतेच. त्या चाकूने हत्या केलीय का त्याने? 
 
सनातनच्या पूर्णवेळ साधकाकडे, सनातनच्या प्रचाराचे साहित्य नाहीतर काय बायबल आणि कुराण सापडणार ?
 
मग या रंगतदार बातम्या नक्की कशासाठी ? आरोपी नक्की कोण हा मुद्दा नाहीच. जो असेल त्याला शिक्षा ही व्हावीच. पण ही उथळ उठाठेव नक्की कोणाच्या फायद्याची, याचाही विचार नको का करायला ?
– उन्मेष गुजराथी (https://goo.gl/83S4bz)
 
मुंबईतील एका वृत्तपत्राने उपस्थित केलेला रास्त प्रश्‍न !
मुंबईतील एका वृत्तपत्राने समीर गायकवाडला अटक केल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या खुलाशाला थेट आव्हान देणारा प्रश्‍नच लोकांसमोर आणला. या वृत्तपत्राने २ कोटी कॉल्समधून सनातनचाच नंबर कसा मिळाला ? असा प्रश्‍न पोलिसांना विचारला. समीर गायकवाड यांच्या मोबाईलमध्ये नेमके काय आक्षेपार्ह सापडले, ते उघड न करताच त्याचा हत्येच्या प्रकरणाशी संबंध जोडणे, योग्य होणार नाही, असे विचार या वृत्तपत्राने समीर यांच्या अटकेच्या दुसर्‍याच दिवशी मुखपृष्ठावर मांडले. पोलिसी तपासातील हा फोलपणा उघड करण्याचा विवेक अन्य तथाकथित पुरोगामी प्रसारमाध्यमांनी दाखवला नाही.