सनातनने केलेल्या हिंदूसंघटनामुळे हिंदुविरोधी शक्तींचे षड्यंत्र ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘टीव्ही ९’ च्या चर्चासत्रात अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी सनातनद्वेष्ट्यांचा घेतला समाचार !
 
अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर
मुंबई – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर २ घंट्यांतच त्या हत्येमागे गोडेसेवादी प्रवृत्ती आहे, असे काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गोडसे हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे होते. असे असूनही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागे संघपरिवाराची संघटना असल्याचे सांगितले गेले. हा बादरायण संबंध कसा जोडला जातो ? डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या वेळी सनातनच्या आश्रमांत चौकशी करण्यात आली. त्यातून आजवर काहीही निष्पन्न झाले नाही. डॉ. दाभोलकर किंवा कॉम्रेड पानसरे असे कोणते मौलिक विचार मांडत होते ? सनातन संस्थेने अखिल भारतीय हिंदू अधिवेशनांच्या माध्यमातून भारतभरातील हिंदुत्ववादी संघटनांचे संघटन केले. कोल्हापूरलाही नुकतीच अधिवक्त्यांची बैठक झाली. या सगळ्यामुळे हिंदुविरोधी शक्ती घाबरल्या आणि त्यांनीच सनातनच्या विरोधात षड्यंत्र रचले असून त्यामुळे सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक करण्यात आली. त्यातून पुढे दिवसभर सनातनच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली आहे, असे सुस्पष्ट मत हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी व्यक्त केले.
 
अधिवक्ता श्री. पुनाळेकर हे १६ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीवरील खास बात कार्यक्रमातील सनातनीच ? या उपहासात्मक मथळा असलेल्या चर्चासत्रात बोलत होते. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री. राम कदम, माजी पोलीस अधिकारी श्री. यादवराव पवार, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी आणि काँग्रेसचे प्रवक्ता राजू वाघमारे हे सहभागी झाले होते. सूत्रनिवेदन निखिला म्हात्रे यांनी केले.
 
अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी केलेली झुंजार विधाने ! 
१. श्री. समीर गायकवाड यांच्यावर पोलिसांनी अद्याप खुनाचा आरोप लावलेला नाही. त्यामुळे तशी चुकीची माहिती सांगू नका. त्यासाठी पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांची पत्रकार परिषद तुम्ही अभ्यासू शकता.
२. श्री. गायकवाड यांना रात्री पकडून पहाटे ४.३० वाजता अटक दाखवली जाते. त्यानंतर सकाळी न्यायालयात आणले जाते. इतक्या अल्प कालावधीत अटकेसाठी आवश्यक ती कागदपत्रे बनवणे शक्य नाही. म्हणजेच पोलिसांनी श्री. गायकवाड यांच्या विरोधात षड्यंत्र रचून आधीच त्यांच्याविषयीची कागदपत्रे बनवून त्यांना अटक नंतर दाखवले आहे. त्यामुळे ही अटक म्हणजे सगळा बनाव आहे. 
३. श्याम मानव हे सनातन संस्थेमध्ये ब्रेनवॉशिंग (बुद्धीभेद) करणारे प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगतात; मात्र प्रत्यक्षात तेच पोलिसांना प्रशिक्षण देत आहेत. त्यामुुळे कोण कुणाचे ब्रेनवॉशिंग करत आहे, याची कल्पना येते. 
४. आमचा प्रश्‍न आहे की, यापूर्वीही डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून काय निष्पन्न झाले ? त्यांना का सोडण्यात आले ? हे समाजासमोर आले पाहिजे. 
५. उद्या पोलीस श्री. गायकवाड यांनाही सोडून देतील, तेव्हा सनातनच्या आजवर झालेल्या अपकीर्तीला उत्तरदायी कोण असेल ?
 
गुन्हा सिद्ध झाल्याविना सनातनसारख्या संस्थेला अपकीर्त करणे चुकीचे ! – आमदार राम कदम, भाजप 
भाजपचे आमदार श्री. राम कदम म्हणाले की, कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यशासनाने पोलीस अन्वेषणासाठी २० पथके बनवली. वरिष्ठ अधिकारी दिले. त्यानंतर हे यश मिळाले आहे. पोलिसांना त्यांचे काम करू द्या. त्यातून काय ते निष्पन्न होईल; मात्र गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच सनातनसारख्या संस्थेला अपकीर्त करणे चुकीचे आहे. सनातनच्या चांगल्या कामाकडेही दुर्लक्ष होता कामा नये. (सनातन संस्थेच्या संदर्भात योग्य भूमिका मांडणारे भाजपचे आमदार श्री. राम कदम यांचे अभिनंदन ! – संपादक)