पानसरे हत्याप्रकरणी सनातनला नाहक गोवण्याचा प्रयत्न निषेधार्ह ! – श्रीराम सेना

शिरसी कर्नाटक येथे सनातनच्या समर्थनार्थ हिंदुत्ववाद्यांची पत्रकार परिषद

डावीकडून श्री. सतीश कुमटाकर, श्री. बसवराज बुधिहाळ, श्री. प्रमोद मुतालिक, श्री. शिवानंद दीक्षित, श्री. रमेश नायक, श्री. राघवेंद्र कांबळे
शिरसी (कर्नाटक) – कोल्हापूर येथील कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या विरोधात कोणताही सबळ पुरावा नसतांना अटक करण्यात आली. ही अटक म्हणजे सनातन संस्थेला लक्ष्य करून केलेली अन्याय्य कारवाई आहे. या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेला नाहक गोवून हिंदुत्ववादी संघटनांची मानहानी करण्याचा हे पुरोगाम्यांचे षड्यंत्र आहे. कर्नाटकमधील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आम्ही या षड्यंत्राचा आणि सनातनचे निष्पाप साधक श्री. समीर गायकवाड यांच्या अटकेचा जाहीर निषेध करतो. आम्ही सर्व हिंदुत्ववादी संघटना सनातन संस्थेच्या मागे भक्कमपणे उभे आहोत, याची या पत्रकार परिषदेद्वारे आम्ही ग्वाही देतो, असे उद्गार श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी येथे काढले. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश नायक आणि निवृत्त अधिकारी, तसेच हिंदुत्ववादी श्री. शिवानंद दीक्षित उपस्थित होते.
 
श्री. प्रमोद मुतालिक या वेळी म्हणाले, श्री. गायकवाड यांच्या अटकेच्या संदर्भातील पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील पोलिसांनी कोणतेही सबळ कारण दिले नाही. केवळ चौकशीसाठी श्री. गायकवाड यांना संयशित म्हणून अटक केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर अद्याप कुठलेही आरोपपत्र दाखल झालेले नसतांना पुरोगाम्यांनी राईचा पर्वत करून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची केलेली मागणी अन्यायकारक आहे. 
 
हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश नायक या वेळी म्हणाले, सनातन संस्था समाजाला अध्यात्माचा प्रसार करणारी आणि समाज सात्त्विक होण्यासाठी प्रयत्न करणारी एक धर्मनिष्ठ संस्था आहे. या संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करून अनेक जण तणावमुक्त आणि व्यसनमुक्त झाले आहेत. अनेक जण सन्मार्गाला लागले असून राष्ट्रकार्यात सहभागी झाले आहेत. अशा संस्थेचे खरे कार्य समजून न घेता त्यावर टीका करणे, हा हिंदुत्वाचे खच्चीकरण करण्याचा पुरोगाम्यांचा प्रयत्न आहे. आम्ही तो सफल होऊ देणार नाही. या वेळी उपस्थित निवृत्त अधिकारी आणि हिंदुत्ववादी श्री. शिवानंद दीक्षित यांनीही सनातन संस्थेला जाहीर पाठिंबा दिला आणि हिंदुत्ववादी संघटनांवरील मानहानीच्या विरोधात संघटितपणे उभे रहाण्याचा मानस व्यक्त केला.