अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांच्याकडून हिंदुद्वेष्ट्यांच्या काळ्या कृत्यांवर प्रकाश !

पानसरे हत्याप्रकरणी सनातनला दोषी ठरवण्यासाठी आयोजित केलेले आयबीएन् लोकमत वाहिनीवरील चर्चासत्र !
 
डावीकडून सूत्रसंचालक श्री राजेंद्र हुंजे, श्याम मानव, अधिवक्ता श्री संजीव पुनाळेकर, आणि नवाब मलिक
सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या अटकेच्या प्रकरणी आयबीएन् लोकमत वाहिनीने १६ सप्टेंबर या दिवशी आयोजित केलेल्या चर्चासत्रात अंनिसचे प्रा. श्याम मानव, अंनिसचे हमीद दाभोलकर (दूरभाषवरून), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक या सर्व राष्ट्र आणि धर्म द्रोह्यांना हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी वेगवेगळ्या प्रसंगांतील उदाहरणे देत निरुत्तर केले आणि सडेतोड उत्तरे देत त्यांचे बिंग फोडले ! श्याम मानव आणि हमीद दाभोलकर हे सनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी पोलीस आणि शासन यांच्यावर प्रचंड प्रमाणात दबाव आणत आहेत, हे या चर्चेतून पुढे आले. या चर्चासत्रातील सूत्रे आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
गेली दोन वर्षे पोलीस जो शोध लावू शकले नाहीत, तो पूर्वीपासून आणि खुनाच्या दुसर्‍याच दिवशी लावणारे भविष्यवेत्ते श्याम मानव ! 
या चर्चेत आरंभी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव म्हणाले, सनातनवाले मानवी बॉम्ब बनवू शकतात. यांनी ब्रेन वॉशिंगचे कारखाने चालू केले आहेत. उद्या हे माणसांचे मुडदेही पाडू शकतील. यांनी बॉम्बस्फोट करण्याच्या पूर्वीपासून मी आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना सांगितले होते की, हे सनातनवाले काहीही करू शकतात. दाभोलकरांचा खून होण्याआधीपासून या पद्धतीचे कृत्य ही माणसे करू शकतात, असे मी सतत आतंकवादविरोधी पथकाला सांगत होतो. पानसरेंची हत्या झाल्यावरही आयबीएन्च्या कार्यक्रमात उघडपणे सांगितले होते की, हे काम सनातनचेच आहे. दाभोलकरांच्या हत्येनंतर मी दुसर्‍याच दिवशी आबा पाटील यांना सांगितले होते की, हे काम सनातनचे आहे. या तिन्ही कटांचा सूत्रधार एकच आहे. त्या सूत्रधारापर्यंत पोहोचले पाहिजे. (पोलीस यंत्रणा आणि राज्यकर्ते यांना स्वतःचे मनाचे निष्कर्ष वारंवार सांगणे म्हणजे पोलीस यंत्रणेवर अविश्‍वास दाखवणेच आहे ! श्याम मानव यांनाच आरोपी कोण आहे, ते कळले आहे, तर पोलीस यंत्रणा गेली दोन वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणात चौकशी का करत आहेत ? – संपादक)
 
श्याम मानव यांचा पोलीस आणि भाजप शासनावर सनातनवर कारवाई करण्यासाठी प्रचंड दबाव !
(म्हणे) सिमीच्या कार्यकर्त्यांप्रमाणे सनातनची पाळेमुळे खणून काढा !
या चर्चेत श्याम मानव म्हणाले, यांची माणसे सापडणे फार कठीण आहे; कारण ही ब्रेन वॉश केलेली माणसे असतात आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावरच आपल्याला तिथेपर्यंत पोहोचावे लागेल. पोलिसांना पुराव्याअभावी त्यांना पकडता येत नाही. सिमीच्या कार्यकर्त्यांप्रमाणे यांच्या कार्यकर्त्यांना अटक करता येत नाही. ही संघटित गुन्हेगारी आहे. हा गुन्हेगार एकटा नाही. तुम्ही सिमीच्या कार्यकर्त्यांना जसे पकडता, तसे सनातनविषयी का करत नाही ? संपूर्ण सनातन संस्था, त्यांच्याशी संबंधित सर्व संस्था, त्यांचे साधक या सर्वांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. त्यातील प्रत्येक साधकापर्यंत पोहोचावे लागेल. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस कठोर भूमिका घेतील. मागच्या शासनाला ही भूमिका घेणे जमले नव्हते. हा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यावा लागेल, नाहीतर मुख्यमंत्री आणि भाजप यांना कलंक लागेल. शासनाला राजकीय इच्छाशक्ती दाखवावीच लागेल. आतापर्यंत संघावालेही विरोधी विचार मांडत होते. विचारांचा संघर्ष विचारांच्या पातळीवर करण्याची परंपरा यांनी मोडीत काढली. माणसे मारायला आरंभ केला, बॉम्बस्फोट करायला आरंभ केला. हे महाराष्ट्रभर कोणाला विचार मांडू देत नाहीत. (सनातनने महाराष्ट्रभर कुणाला विचार मांडू दिले नसते, तर मानव अशी धादांत खोटारडी वक्तव्ये वाहिनीवरून बोलू शकले असते का ? म्हणजे यांनी केवळ यांचे धर्मद्रोही विचार सर्वत्र मांडावेत आणि सनातनने सर्वांना उपयुक्त असे धर्माचे विचार मांडू नयेत, असे मानव यांना वाटते. मग खरे आतंकवादी मानवच नव्हेत का ? – संपादक)
 
पोलिसांनी त्यांच्यावरील दबावामुळे संशयितांना अटक केल्याची हमीद दाभोलकरांचीच स्वीकृती !
अंनिसचे हमीद दाभोलकर या वेळी म्हणाले, हा विचारांच्या विरोधामधून झालेला खून असून सनातनी प्रवृत्ती याच्या पाठीशी असू शकतात. दाभोलकरांच्या खुनानंतर तत्परतेने कारवाई झाली असती, तर हे नंतरचे खून टाळता येऊ शकले असते. दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी एकत्रित या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र शासनाला फटकारले. त्यानंतर लगेच आठ दिवसांत ही अटक झाली; म्हणजे जेवढा दबाव, तेवढा तपास जलद झाला. अंनिसने २० ऑगस्टला राज्यभर निदर्शने केली. सातत्याने अंनिसने या प्रकरणात दबाव लावून धरला. त्या माध्यमातून ही पावले पडली आहेत कि काय, अशी शंका येते. असे असेल, तर ते लोकशाहीच्या दृष्टीने आणि नैसर्गिक न्याय मिळण्यासाठी घातक आहे. 
 
हमीद दाभोलकरांनी वारंवार मांडलेली सूत्रे
१. ही संस्था धर्माच्या नावाखाली प्रत्यक्षात अधर्माचे काम करत आहे. कुठलाही धर्म माणसाला हिंसेची शिकवण देत नाही. ७० वर्षार्ंच्या वैचारिक प्रसार करणार्‍यांचे खून करण्याची शिकवण देत नाही. त्यामुळे समाजाने हे समजून घेतले पाहिजे की, धर्माच्या बुरखाड्याआड हिंसेचा प्रसार करणारे, आतंकवादी कृत्याआड चालणारे काम आहे. त्यासंदर्भात कारवाई होणे आवश्यक आहे. आता केवळ संशयितांना अटक झाली आहे. 
 
२. मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार हे पकडणे आणि या आतंकवादी प्रवृत्तींचा पाया उखडून टाकणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी या राज्यशासनाने या संस्था, संघटना यांच्यावर बंदी आणण्यासाठी केंद्राकडे एक प्रस्ताव पाठवला आहे. दोन वर्षांत केंद्राने त्यावर बैठक घेतली नाही. केंद्रशासनाने तातडीने त्यावर बैठक घेऊन कारवाई करावी. (केंद्रशासनाने सनातनवर बंदी घालू नये, असे राज्यशासनाला कळवले आहे, याची हमीद यांना कल्पना नाही ! – संपादक) 
 
३. नक्षलवादी कार्यकर्ते असणार्‍या अंनिसचे हमीद दाभोलकर म्हणतात, सनातन प्रभातवर देशद्रोहाचा गुन्हा का दाखल होत नाही ?
कलबुर्गींच्या खुनानंतर या संघटनेच्या दैनिकात राज्यशासनाला फाशी द्या असे लेख लिहितात. याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. एवढी यांची मजल कशी जाते ? भाजप यांच्यावर कारवाई करणार का ? हिंसेच्या आपल्या उद्दिष्टांसाठी त्याचा पाठपुरावा करणारे लोक हे लोकशाहीच्या दृष्टीने धोकादायक असतात. (सनातन कोणाचीही हिंसा करण्यासाठी कुणाचाही पाठपुरावा करत नाही ! – संपादक)
 
४. दाभोलकर सर्वत्र बसने फिरत. त्यांच्यावर ४५ वर्षांत एकही अफरातफरीचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांच्यावर होणारे पैशाचे आरोप वेदनादायी आहेत. ग्रंथांतून आलेले पैसे सामाजिक कार्यासाठी खर्च होतात. (अंनिसला परदेशातून पैसा येत असल्याचे पुरावे आहेत. अंनिसचे सगळे स्वच्छ आहे, तर त्यांनी अनेक वर्षे पैशांचा सर्व लेखाजोखा आणि नोंदी शासनाला का दिल्या नाहीत ? – संपादक)
 
या सर्वांना उत्तरे देतांना अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर यांनी क्षात्रतेजाने मांडलेली सूत्रे
१. समीर गायकवाड यांच्या आईला दुपारी १२ वाजता कळवले, जेव्हा त्याला पोलीस कोठडी देऊन झाली होती. तेथील वकिलांनी या प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. त्याला वकील मिळाला नाही. वकील नसतांना त्याला ७ दिवसांची कोठडी मिळली. त्यामुळे ७ दिवसांत त्याचे हाल होतील, ही कुटुंबियांची शंका आहे. उच्च न्यायालयाने एक आदेश दिला आणि अटक झाली.
 
२. दाभोलकर प्रकरणात खंडेलवाल आणि नागोरी यांना पकडले होते, त्याचे पुढे काय झाले ?
 
३. समीर गायकवाड याची छायाचित्रे दाखवली जातात, ती आली कोठून ? ४०० जणांची तपासणी झाली. त्यांचे अनन्वित हाल झाले. लोकांचे फोटो त्यांनी काढून घेतले. या मुलाचीही पहिल्यांदा चौकशी झाली आहे. त्या वेळी काढून घेतलेली ही छायाचित्रे आहेत. त्याच्या पत्नीच्या दोघा भावांना पोलिसांनी अटक केली. जाधवबंधूंना प्रचंड मारहाण चालू आहे.
 
४. विवेकवादी म्हणवणार्‍या शाम मानवांच्या माणसाने सांगितले होते, बॉम्बस्फोटातील आरोपीचे चित्र पोलिसांनी काढलेल्या चित्राशी जुळते. आता पोलिसांनी काढलेली चित्रे आरोपींशी जुळतात का ? मग तुम्ही उच्च न्यायालय आणि सनातनचे चौकशी केलेले ते ४०० साधक यांची क्षमा मागणार का ? सनातन संस्था आतंकवादी आहे, असे तुम्ही म्हणता. गोव्याच्या बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटल्यानंतरही तुमचे हे आरोप चालू आहेत. 
 
५. मुश्रीफ नावाच्या माणसाने लिहिलेल्या पुस्तकात म्हटले की, आतंकवादी मराठीत बोलला; म्हणून ते पुण्याचे ब्राह्मण होते. नंतर कळले ते जालना, परभणी, बीडचे मराठी बोलणारे मुसलमान होते. त्यानंतर आबा पाटलांनी त्याविषयीचा तपास बंद केला. त्या मराठी बोलणार्‍यांची चौकशी का केली नाही ?
 
६. दाभोलकर प्रकरणात तुम्ही आम्हाला गोडसेवादी म्हणालात. गोडसे कुणाच्या बाबाबुवांच्या नादी लागला होता का ? पद्धतशीरपणाने रेटून खोटे बोलायचे, अशी तुमची भूमिका आहे.
 
७. भूमाफियांनी ८०० एकर भूमी हडप केली आहे. या संदर्भात कोल्हापूरला पानसरेंच्या हत्येपूर्वी आंदोलन झाले. त्याला ८० वकील उपस्थित होते. या आंदोलनाला सनातनसह भारतभरातील हिंदुत्ववादी संघटना आल्या. देवेंद्र फडणविसांनी याची चौकशी करायला सांगितली आणि त्यानंतर पानसरेंची हत्या झाली. पानसरे यांच्या हत्येला व्यक्तीगत कारण आहे.
 
पैसे खाण्याच्या सूत्रावर मानव यांनी केलेली सारवासारव !
पुनाळेकरांनी २५ लाख रुपये खाल्ल्याचा आरोप केला. आतापर्यंत अनेक तक्रारी केल्या. आरोप करणे त्यांचे कामच आहे. धर्मदाय आयुक्तांनी केलेल्या चौकशीत पैसे खाल्लेले आढळले नाहीत. ते आम्ही बक्षिसांसाठी बाजूला ठेवले आहेत. त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. शासनाच्या प्रश्‍नांची उत्तरे देतो. सनातनवाल्यांचे हे काम सलग चालू आहे. हे जर अशा खुनी माणसांची जाहीर वकिली करत असतील, तर समर्थन करत असतील, तर त्यांच्यावरही खटले दाखल केले पाहिजेत, अशी असंबद्ध उत्तरे देऊन मानव यांनी वेळ मारून नेली.
 
वरील आक्षेपांना उत्तर देतांना अधिवक्ता श्री. पुनाळेकर म्हणाले –
१. सनातनमधील लेख आणि दाभोलकरांची भाषणे बाजूला ठेवा अन् त्याची चर्चा होऊ द्या. त्यामुळे कोणी कशी भाषा वापरली आहे, हे सिद्ध होईल. दाभोलकरांनीही आमच्या विरोधात आक्षेपार्ह विधाने केली आहेत.
२. दाभोलकर आणि पानसरे यांनी पुरुषोत्तम खेडेकरांना पाठिंबा दिला. पुरुषोत्तम खेडेकर यांची पुस्तके घ्या आणि सनातन प्रभात घ्या. दोन्ही समोरासमोर ठेवा आणि चर्चेचे नियम ठरवू. आपण पाच पाच मिनटे बोलू आणि कुणाची भाषा विषारी आहे, ते पाहू. खेडेकरांच्या पुस्तकांवर कोणी बंदीची आणि बहिष्काराची मागणी का करत नाही ?
 
तपास पूर्ण झालेला नसतांना आताच निष्कर्ष काढणे योग्य नाही ! – राम कदम, प्रवक्ता, भाजप
गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. त्यासाठी शासनाने आयपीएस् दर्जाचा अधिकारी या कामी दिला होता. आतापर्यंत ४०० लोकांची चौकशी झाली आहे. अजून बर्‍याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत. कोणावर आरोप न करता पोलिसांना त्यांचे काम मोकळेपणाने करू दिले पाहिजे. कायद्याच्या समोर सगळे समान आहेत. त्यामध्ये जाती-धर्माचा भाग नाही. अजून काहीही समोर आले नाही. आधीच चर्चेला वेगळा रंग द्यायला नको. सनातन, धर्म अशी लेबले लावून चर्चा नको. अजून बर्‍याच गोष्टी बाहेर यायच्या आहेत. त्यापूर्वी कुणाला प्रशस्तीपत्रक देऊ नका. सुतावरून स्वर्ग गाठायला नको. आताच निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
 
गुन्हेगारांना राजाश्रय देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणतात, सनातनला राजाश्रय आहे !
नवाब मलिक म्हणाले, या तिघांच्या हत्येमागे या संघटनेचा हात असल्याचे आम्ही सांगत होतो. पोलिसांनी कसून चौकशी केली, तर हे सिद्ध होईल. व्यवस्थित तपास झाला, तर याचा सूत्रधार कळेल; परंतु या संघटनेला राजाश्रय आहे. या संघटनेला जन्म देणार्‍यांचे शासन या राज्यात आहे. त्यामुळे हे सिद्ध करणे अवघड आहे. ही मनुवादी संघटना आहे. हिंदुत्ववादी नाही.
 
वरील आरोपाला प्रत्युत्तर देतांना अधिवक्ता श्री. पुनाळेकर म्हणाले, 
१. राजश्रय आम्हाला कुठे आहे ? तो तर तुम्हालाच आहे. दाभोलकर प्रकरणानंतर तीन पोलीस ठाण्यांचे मला स्वतःला समन्स आले होते. मी त्यांना काही पुरावे दिले. त्यानंतर पोलीस म्हणाले की, आता तुम्ही नका येऊ. 
२. आम्हाला पोलिसांनी समन्स दिले, तर आम्ही जातो. आम्ही जाणार नाही, असे आम्ही म्हणत नाही.
३. आम्ही काय जलसिंचन घोटाळ्यात आहोत का ? लोक मरत आहेत. थोडी लाज बाळगा.
४. तुमच्या रझा अकादमीने बायकांचे कपडे काढले. बेशरमसारखे बघत बसलात तुम्ही. काही केले नाहीत. राजाश्रय कुणाला आहे, ते लोकांना दिसले. रझा अकादमीच्या विरोधात मी वकील होतो.
५. गरिबांना लुबाडून घरे घेतलीत. त्या प्रकरणी मी वकील होतो.
६. चर्मकारांना तुमच्या शासनाने रस्त्यावर आणले, त्यांच्या बाजूने मी गेलो. 
७. तुमच्या शासनाने साध्वीला छळले, मारले. 
८. आमच्या साधकांना गुंड म्हणता. गुंडगिरीचे आरोप कुणावर आहेत, आमच्या कार्यकर्त्यांवर कि तुमच्या कार्यकर्त्यांवर ? 
     त्यामुळे राष्ट्रवादीने कुणाला राजाश्रय आहे आणि कोण गुंड आहे, हे सांगू नये. 
 
अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी दाभोलकर आणि श्याम मानव यांच्या समाजकार्याचा बुरखा फाडला !
या वेळी अधिवक्ता श्री. पुनाळेकर म्हणाले, दाभोलकरांनी आमच्यावर बंदीचे आदेश आणण्यासाठी प्रयत्न केले. आमचे प्रत्येक अकाऊंट, प्रत्येक व्हाऊचर पाहिले, प्रत्येक भ्रमणध्वनी संपर्क पाहिला. आम्ही अंनिसच्या चौकशीची मागणी केली, तेव्हा पोलिसांना अंनिसवाल्यांनी सांगितले त्यांच्याकडे 
 
१२ वर्षांची अकाऊंटच ठेवलेली नाहीत. त्यांच्याकडे काहीच नाही. काही नाही, म्हणजे त्याची चौकशी नाही. असा हा प्रकार आहे. श्याम मानव तुम्हाला लिहिलेली सर्व पत्रे तुम्ही घेत नाही; म्हणून परत येत आहेत. तुमची नेमणूक करून शासन २ कोटी रुपये देत आहे. तुम्हाला लाज नाही वाटत का ? तुम्ही बिगर शासकीय संस्था चालवता. तुम्ही समाजाला उत्तरदायी नाही का ? समाजाला उत्तरे देण्याचे तुमचे दायित्व नाही का ? मी तुमची पत्र सादर करीन. तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या एवढे जवळचे म्हणवता. त्यांचे नाव तुम्ही वापरता. दाभोलकर आणि पानसरे यांच्याविषयी मी जेवढी पत्र लिहिली आहेत, धैर्य असेल, तर देवेंद्र फडणविसांकडून त्याची उत्तरे आणून द्या.
 
अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर
चर्चेचे वैशिष्ट्य ठरली अधिवक्ता  श्री. संजीव पुनाळेकर यांची क्षात्रवृत्ती !
समोर चर्चेला बसलेल्या सर्व धर्मद्रोह्यांचे आरोप शांतपणे ऐकून घेत अधिवक्ता श्री. पुनाळेकर यांनी एकेकाची छुपी कटकारस्थाने बाहेर काढली आणि लाखो दर्शकांसमोर ती उघडकीस करून धर्मद्रोही आणि राज्यकर्ते यांचा खोटारडेपणा उघड केला. त्यांनी विचारलेल्या प्रतिप्रश्‍नांना समोरच्या वक्त्यांकडे काहीच उत्तरे नसल्याने ते ठराविक सूत्रेच वारंवार मांडत होते. अधिवक्ता पुनाळेकर यांनी त्यांच्या क्षात्रतेजाने डागलेली तोफ ऐकतांना निवेदकही अनेक वेळा स्तब्ध झाला आणि नेहमीप्रमाणे सनातनची बाजू मांडणार्‍या वक्त्यांना मध्येच आरडाओरडा करून थांबवायचे विसरून गेला !
(म्हणे), सनातन मुलांना आतंकवादी बनवते !
लहान मुलांना आतंकवादाचे प्रशिक्षण देणार्‍या आतंकवादी संघटनांविषयी काहीही न बोलणारे नवाब मलिक !
नवाब मलिक म्हणाले, या संघटनेचे लोक आतंकवादी कारावायांमध्ये आहेत. अनेक लोकांनी सांगितले आहे की, हे त्यांची मुले बिघडवतात. त्यांना आतंकवादी बनवतात. हा तरुण १५ व्या वर्षी या संघटनेत आला. त्याचे मन कशा प्रकारे आतंकवादाकडे वळवले असेल पहा. यांच्या विचारांपासून मुलांना लांब ठेवले पाहिजे. (लहान मुले सनातनमध्ये येऊन लहान वयात साधना करतात. आज समाजाची सर्व स्तरांत दुःस्थिती झाली असतांना ही भावी पिढी उलट या समाजापुढे आदर्श आहे. शिक्षक आणि समाजातील लोक सनातनच्या बालसाधकांचे कौतुकच करतात. – संपादक)