‘मी मराठी’ वृत्तवाहिनीवर वैद्य धुरी यांनी केली निधर्मीवादाची चिरफाड !

समीर गायकवाड यांच्या अटकेचे प्रकरण घृणास्पद ! – वैद्य उदय धुरी

डावीकडून प्रकाश रेड्डी, वैद्य उदय धुरी आणि रवींद्र आंबेकर
मुंबई – सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना पोलिसांनी आदल्या दिवशी रात्री अटक करून पहाटे ४.३० वाजता अटक दाखवले. त्यांना अधिवक्ता मिळू नये, यासाठी कुणाला भेटू न देताच न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांचे दोन मेहुणे बेपत्ता आहेत. त्याविषयी पोलीस साधी तक्रारही नोंदवून घेत नाहीत. हा सगळा घटनाक्रम घृणास्पद आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक वैद्य श्री. उदय धुरी यांनी ठामपणे मांडले. मी मराठी वृत्तवाहिनीवर १६ सप्टेंबरला रात्री ९ वाजता पॉईंट ब्लँक या कार्यक्रमातील आतातरी सनातनवर बंदी येईल का ? या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी अंनिसच्या कार्यकर्त्या वंदना शिंदे, भाकपचे प्रकाश रेड्डी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल लोंढे सहभागी झाले होते. सूत्रनिवेदन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक रवींद्र आंबेकर यांनी केले.
 
वैद्य उदय धुरी यांनी नीरक्षीर पद्धतीने मांडलेली सूत्रे ! 
१. आज पोलिसांवर दबाव आहे. तो कुणाचा आहे, असे विचारत असाल, तर तो साम्यवाद्यांचाही असू शकतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे सनातन संस्थेच्या विरोधात स्पष्टपणे बनाव रचण्यात आला आहे. 
 
२. रोहिणी सालियन यांनी शासनावर आरोप केला की, हिंदुत्ववाद्यांविषयी सौम्य भूमिका घेण्यास सांगितले आहे. त्या आरोपाविषयी किंवा सालियन यांच्या संदर्भात आमचे काही मत नाही; मात्र आजचे अधिवक्ता किती खरे बोलतात, हा संशोधनाचा विषय आहे. 
 
३. सनातन संस्थेच्या आश्रमात काय चालते ? हा प्रश्‍न विचारणे चुकीचे आहे. सनातनच्या आश्रमात अनेक संत, जगद्गुरु शंकराचार्य, नेते, पत्रकार, लोकप्रतिनिधी आदी येऊन गेलेले आहेत. त्यांनी सगळा आश्रम पाहिला आहे. पोलिसांनीही चौकशी करून त्यांना काही आजवर चुकीचे सापडले नाही. त्यामुळे जर अतुल लोंढे यांना शंका असेल, तर त्यांनीही आश्रमात यावे, असे आम्ही त्यांनाही निमंत्रण देतो. त्यांनी स्वतः येऊन पहावे. 
 
४. (सूत्रनिवेदकांना) तुम्ही प्रतिआतंकवादाविषयी (काऊंटर टेररिझम्विषयी) आम्हाला प्रश्‍न विचारण्याआधी तो कसा असतो, ते समजून घ्या. केरळमध्ये साम्यवाद्यांनी सत्ताप्राप्तीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या २५० स्वयंसेवकांच्या हत्या केल्या. याला प्रतिआतंकवाद म्हणतात. आता त्याच साम्यवादी विचारांचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि पानसरे महाराष्ट्रात कसले जनप्रबोधन करत असतील, याचा विचार झाला पाहिजे.
 
सनातन संस्थेची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार्‍यांना सणसणीत चपराक देणारे वैद्य उदय धुरी ! 
वैद्य धुरी म्हणाले की, सनातन संस्थेची सखोल चौकशी झाली पाहिजे, असे जे कांगावा करत आहेत, त्यांनी लक्षात घेतले पाहिजे की, सनातनच्या अनेक साधकांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, गुन्हे अन्वेषण विभाग, स्थानिक पोलीस अशा प्रत्येक यंत्रणेने चौकशी केली आहे. आमच्या महिला साधकांची सायंकाळी ६ नंतर पोलीस ठाण्यात बोलावून अवैधपणे चौकशी करण्यात आली आहे. त्यांची छायाचित्रे भ्रमणभाषमध्ये अनुमतीविना काढून घेण्यात आली. आमच्या साधकांचे इ-मेलचे संकेतशब्द काढून घेऊन नंतर ते पालटले आणि ४-४ दिवस त्यांना त्यासाठी फेर्‍या मागायला लावल्या. किती प्रकारचे छळ सांगायचे. त्यामुळे सनातन संस्था अशा चौकशीला घाबरत नाही.
 
डॉ. दाभोलकर आज जिवंत असते, तर कदाचित कारागृहात असते ! 
वैद्य धुरी म्हणाले, आम्ही डॉ. दाभोलकर यांच्याशी वैचारिक लढा दिला. त्यांचे आमचे अन्य काही हाडवैर नव्हते. त्यांच्या न्यासाचे त्यांनी लेखापरीक्षणच केले नव्हते. त्यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे आम्ही न्यायालयात दिले होते. त्याविषयी वेगळी चर्चा घेतल्यास आम्ही ते सगळे पुरावे सादर करू. आज डॉ. दाभोलकर जिवंत असते, तर कदाचित ते भ्रष्टाचारामुळे कारागृहात असते.
 
कोणताही पुरावा नसतांना सनातनवर ३ हत्यांचे आरोप करणार्‍या सनातनद्वेष्ट्या वंदना शिंदे ! 
वंदना शिंदे म्हणाल्या की, डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे यांची हत्या पचवल्यानंतर यांनी तिसरी हत्या केली. यांची विचारसरणीच तशी आहे. डॉ. दाभोलकर यांच्या मृत्यूपूर्वी यांच्या संकेतस्थळांवर त्यांच्या छायाचित्रांवर फुल्या मारल्या होत्या. (कोणत्याही पुराव्याअभावी सनातनवर जाहीर कार्यक्रमात आरोप करणार्‍या वंदना शिंदे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक)