(म्हणे) विषारी सनातन संस्थेने डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांना संपवले !

निखिल वागळे यांचा ट्विटरवर सनातनद्वेषी जळफळाट ! 
मुंबई – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केल्यानंतर हिंदुद्वेष्टे निखिल वागळे यांचा सनातद्वेष पुन्हा उफाळून आला. ते सध्या कोणत्याही प्रसारमाध्यमात कार्यरत नसल्याने त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देतांना सनातनद्वेषाचे टोक गाठले. अद्याप पोलिसांनीही सनातनवर आरोप केलेले नसतांना वागळे यांनी म्हटले आहे, “सनातन संस्था ही महाराष्ट्र आणि गोवा येथील सर्वांत विषारी हिंदुत्ववादी संघटना आहे. त्यांनीच डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांना संपवले.” (कुठल्या तरी प्रकरणात सनातन संस्थेला गोवण्यासाठी सनातनच्या साधकांना अटक झाली की, वागळे यांची ही प्रतिक्रिया ठरलेलीच असते; मात्र नंतर सदर चौकशीतून काहीही निष्पन्न झालेले नाही, हा आजवरचा इतिहास आहे. असे असूनही सनातनद्वेषाचा कंड शमवण्यासाठी अशा प्रकारची गरळओक करणार्‍यांच्या विरोधात सनातन संस्था अधिवक्त्यांचा सल्ला घेत आहे ! – संपादक) 

अन्य प्रतिक्रियांमध्ये वागळे यांनी केलेली गरळओक ! 
१. सनातनचे कार्यकर्ते मुंबई आणि ठाणे येथील बॉम्बस्फोटांतही सहभागी होते. हा आतंकवादी गट पोलिसांच्या नाकाखाली कार्यरत आहे, हे भयावह आहे. (बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सनातनची निर्दोष मुक्तता झाली असतांना सनातनद्वेषाची काविळ झालेल्यांना दुसरे काय दिसणार ? – संपादक) 
 
२. माजी गृहमंत्री रा.रा. पाटील सनातन संस्थेची सखोल चौकशी करणार होते; पण ‘सनातनच्या आश्रमांवर धाड टाकू नये’, असा त्यांच्यावर आणि पोलिसांवर दबाव आला. (हा दबाव कुणी आणला, हेसुद्धा वागळे यांनी स्पष्ट केले पाहिजे. अकारण ऐकीव माहितीवरून अशा प्रकारचा अपप्रचार करून पत्रकारितेला अपकीर्त करू नये ! – संपादक) 
 
३. महाराष्ट्र आणि गोवा येथील अनेक राजकारणी सनातनशी संबंधित असून त्यामध्ये केवळ हिंदुत्ववादी पक्षच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचाही सहभाग आहे. (एवढी ‘ब्रेकिंग’ माहिती असतांना वागळे त्यांची नावे उघड का करत नाहीत ? – संपादक) 
 
४. सनातनवरील बंदीच्या प्रस्तावाला संयुक्त पुरोगामी आघाडी शासनाने प्रतिसाद दिला नाही. (सनातन निर्दोष असल्यानेच संपुआसारखे हिंदुद्वेषी शासन सनातनवर बंदी घालू शकले नाही, हे सत्य वागळे का लपवतात ? – संपादक)