सनातनला संत आणि हिंदुत्ववादी यांचे भक्कम पाठबळ

हिंदु धर्म आणि हिंदू संघटित होण्यासाठी धर्मप्रसार करणार्‍या सनातन संस्थेची अपकिर्ती करू नका !
  • श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज यांचे मराठी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला सडेतोड उत्तर
त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक), १७ सप्टेंबर (वार्ता.) – दोन दिवसांपूर्वी झी २४ तास या मराठी वृत्तवाहिनीच्या एका पत्रकाराने श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज यांची मुलाखत घेतली. या वेळी त्या पत्रकाराने समाजात कोणत्या संस्था अध्यात्मप्रसाराचे चांगले कार्य करतात अथवा करत नाहीत ? असा प्रश्‍न विचारला. याला उत्तर देतांना श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज म्हणाले, समाजात अध्यात्म आणि धर्म यांच्या प्रसाराचे चांगले कार्य करणार्‍या संस्था आहेत. त्याविषयी मात्र प्रसिद्धीमाध्यमे चांगली वृत्ते प्रसारित करत नाहीत. याउलट त्या संस्थांना वृत्तवाहिन्या झोडपून काढतात. समाजात त्यांची अपकिर्ती करतात. धर्मप्रसाराचे कार्य न करणार्‍या संस्थांचा वृत्तवाहिन्यांवर उदोउदो केला जातो. असे म्हटल्यावर तो पत्रकार म्हणाला, महाराज असे का म्हणता, तुम्ही कोणत्या संस्थेविषयी असे बोलत आहात ? तेव्हा श्री सद्गुरु खडेश्‍वर महाराज म्हणाले, मी सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांविषयी बोलत आहे.
 
सनातन संस्था ही हिंदूंच्या रक्षणासाठी समाजात उत्तम पद्धतीने अध्यामप्रसाराचे कार्य करत आहे. सनातन संस्था आणि सनातन प्रभात यांचा काडीमात्र अभ्यास न करता त्यांच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करून संस्थेची अपकीर्ती केली जात आहे. तो पत्रकार म्हणाला, सनातन संस्था ही आतंकवादी आहे, असे म्हटले जाते. महाराज म्हणाले, ते पूर्णतः चुकीचे आहे. हिंदु धर्म रक्षणाचे आणि हिंदूंना संघटित करण्याचे कार्य सनातन संस्था खर्‍या अर्थाने करत आहे. या संस्थेची समाजात अपकीर्ती करू नका. यानंतर तो पत्रकार शांत राहिला. 
 
त्र्यंबकेश्‍वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने येथे श्री पंच अग्नि आखाड्याचे आणि येवला (जिल्हा नाशिक) तालुक्यातील दत्तवाडी गावातील खडेश्‍वर सेवा आश्रमाचे श्री सद्गुरु उमाकांत उपाख्य खडेश्‍वर महाराज हे गेल्या ३८ वर्षांपासून दिवसरात्र उभे राहून साधना करतात. येथेही त्यांच्या पर्णकुटीत ते उभे राहून साधना करत आहेत. अनेक भक्तांबरोबर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांना भेटून त्यांची माहिती घेऊन जात आहेत.
 
सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करत असल्याने आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीशी ! – आनंद रजपूत, शिवसेना
मिरज, १७ सप्टेंबर (वार्ता.) – सनातन संस्था हिंदु धर्माचे काम करते. त्यामुळे ते जे काही करतील ते योग्यच असेल. सनातनवर आमचा पूर्णपणे विश्‍वास आहे. आतापर्यंत सनातनवर अनेक वेळा आरोप झाले, त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे आम्ही सनातन संस्थेच्या पूर्णपणे पाठीशी आहोत. येणार्‍या काळात हिंदुद्वेष्ट्यांच्या दबावाला बळी पडून जर सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला, तर मिरज शिवसेना वेळप्रसंगी सनातनच्या बाजूने रस्त्यावर उतरेल, असे मत शिवसेनेचे उत्सव समितीप्रमुख यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या समवेत सर्वश्री गजानन मोरे, प्रशांत मुत्तगडे, गिरीष जाधव आणि अन्य शिवसैनिक उपस्थित होते.
 
श्री. आनंद रजपूत म्हणाले…
१. आज प्रत्येक राजकीय पक्षात कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गुन्हे केलेले संशयित आहेत. त्यामुळे बंदीच आणावयाची झाल्यास देशातील सर्वच राजकीय पक्षांवर बंदी आणावी लागेल. त्यामुळे मुळात बंदीची मागणी करणे हेच मूर्खपणाचे आहे. 
 
२. राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या सर्वाधिक आणि सर्व प्रकारांत गुन्हे दाखल आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर खुनाचा आरोप होता. हाच प्रकार काँग्रेसच्या बाबतीत आहे. त्यांच्यातील अनेक माजी मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेत. माजी मंत्री जगदीश टायटलर यांच्यावर तर शिखांच्या सामूहिक हत्याकांडाच आरोप आहे. त्यामुळे बंदी आणावयाची झाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर पहिल्यांदा बंदी आणावी लागेल. 
 
३. ज्या संघटना खरोखरच देशद्रोही कृत्य करतात त्या सिमी, एम्.आय.एम्. यांच्यावर बंदीची मागणी का केली जात नाही ?
 
४. आजपर्यंत प्रत्येक वेळी सनातन संस्थेला वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला. त्यांना विनाकरण त्रास देण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला आहे. त्याही पुढे जाऊन सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न झाल्यास मिरज शिवसेना वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करेल.
 
हिंदु म्हणून सनातनच्या पाठीशी उभे रहा ! – महाराणा प्रताप बटालिय
पनवेल – कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे; मात्र आमची पोलिसांना विनंती आहे की, त्यांनी सनातनसारख्या धर्मनिष्ठ संघटनेला त्रास देऊ नये. यापूर्वी साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर यांना अटक केल्यानंतर त्यांना आजवर कारागृहात खितपत ठेवले आहे. आजचे शासन हिंदूंच्या मतांवर निवडून आले आहे. शासनाने कुणाच्याही दबावाखाली कार्यवाही करू नये. सनातन संस्था ही हिंदु धर्माला वाचवण्यासाठी कार्य करणारी एकमेव प्रामाणिक संघटना आहे. समस्त हिंदूंनी सनातन संस्थेच्या पाठीशी रहावे, असे आवाहन ‘महाराणा प्रताप बटालियन’चे अध्यक्ष श्री. अजयसिंग सेंगर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, 
१. पोलीस असदुद्दीन ओवैसी आणि याकुब यांच्यासारख्या आतंकवाद्याच्या मागे उभे रहातात. विषारी भाषणे करणार्‍या ओवैसींना ते रोखू शकत नाहीत. 
 
२. आमचा प्रश्‍न आहे की, पोलीस केवळ हिंदूंच्या मागे का लागतात ? 
 
३. या देशात पंडित नथुराम गोडसे यांना ६ महिन्यांत फाशी दिली आणि याकुबला मात्र २० वर्षे पोसले जाते. 
 
४. पोलिसांना आणि शासनाला इतकीच खुमखुमी असेल, तर त्यांनी दाऊदसारख्या गुंडांच्या मुसक्या आवळण्याचे काम करावे. 
 
५. निर्दोष हिंदूंना त्रास देऊ नये.
 
सनातन संस्थेला विरोध करणे अयोग्य ! – स्वामी विवेकानंद ब्रह्मचारी, हरिद्वार
सनातन धर्म शाश्‍वत आणि चिरंतन आहे. त्या नावाने असणारी सनातन संस्था धर्मप्रसाराचे कार्य करत आहे. तिला चिरडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये; कारण तो निष्फळच ठरणार आहे. सनातन संस्थेला आमचे आशीर्वाद आहेत आणि सनातनवर कोणतेही अरिष्ट येऊ शकत नाही, अशी आमची धारणा आहे. त्यामुळे आम्ही सर्व हिंदुत्ववाद्यांना आवाहन करतो की, त्यांनी सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धर्मकर्तव्य बजावावे !