अधिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१८.९.२०२० या दिवसापासून अधिक आश्‍विन मासाला आरंभ झाला आहे. अधिक मासापासून सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

 

१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२,
दक्षिणायन, शरद ऋतू, अधिक आश्‍विन मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे

 

२. शास्त्रार्थ

२ अ. अधिक मास

अधिक मासाविषयी विस्तृत माहिती ‘https://www.sanatan.org/mr/a/6627.html’ या लिंकवर उपलब्ध आहे. अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’ म्हणतात. या मासात अधिकाधिक नामजप, दान आणि पुण्यकर्मे करावी. याचे फळ पुढील अधिक मासापर्यंत प्राप्त होते.

२ आ. क्षय दिन

१९.९.२०२० या दिवशी ‘क्षय दिन’ आहे. ज्या तिथीच्या वेळी सूर्योदयाची वेळ नसते, ती ‘क्षय तिथी’ असते. क्षय तिथी शुभकार्यासाठी वर्ज्य असते.

२ इ. विनायक चतुर्थी

प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात.

२ ई. दुर्गाष्टमी

प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. असुर शक्तींचा नाश होऊन भयमुक्त होण्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी दुर्गासप्तशती स्तोत्र, कवच, अर्गला स्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात.

२ उ. यमघंट योग

रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. या योगावर कधीही प्रवास करू नये.

२ ऊ. कमला एकादशी

हिंदु पंचांगाप्रमाणे मराठी मासात शुक्ल आणि कृष्ण पक्षात प्रत्येकी एक एकादशी तिथी येते. याप्रमाणे चैत्र ते फाल्गुन या मराठी मासांत एकूण २४ एकादशी तिथी येतात. या प्रत्येक एकादशीला स्वतंत्र नाव दिलेले आहे. याप्रमाणे अधिक मासातील दोन्ही एकादशींना ‘कमला एकादशी’ हे नाव आहे. यांनाच ‘पद्मिनी एकादशी’ असेही म्हणतात. अधिक मासातील एकादशीला भगवान श्री विष्णुपूजनाचे महत्त्व अधिक आहे.

२ ए. गजगौरीव्रत (हादगा-भोंडला)

आश्‍विन मासात सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. त्या दिवसापासून गजगौरीव्रताला आरंभ होतो. या व्रतामध्ये देवी गजगौरीचे पूजन केले जाते. या दिवशी देवी स्तोत्र, देवीकवच, अर्गला स्तोत्र, कनक स्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात. ‘यामुळे समृद्धी प्राप्त होते’, असे म्हटले जाते. हादगा-भोंडला हा पश्‍चिम महाराष्ट्रात आणि कोकणात विशेष प्रचलित आहे. यामध्ये स्त्रिया गाणी म्हणत सामूहिक नृत्य करतात.

२ ऐ. घबाड मुहूर्त

हा शुभ मुहूर्त आहे. घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास आरंभ केला, तर ते कार्य सफल होऊन मोठ्या प्रमाणात लाभ होतो. अकस्मात् एखादा मोठा लाभ झाल्यास ‘हाती घबाड लागले’, असा वाक्प्रचार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजल्यावर जी संख्या येते, त्या संख्येला तिप्पट करून येणार्‍या अंकात शुक्ल प्रतिपदेपासूनची तिथी मिळवावी. येणार्‍या बेरजेला ७ या संख्येने भागल्यावर बाकी ३ आली, तर ‘त्या दिवशी घबाड मुहूर्त आहे’, असे समजतात.

उदा. सूर्य नक्षत्र : हस्त

चंद्र नक्षत्र : धनिष्ठा

तिथी : शुक्ल पक्ष द्वादशी

‘हस्त’ या सूर्य नक्षत्रापासून ‘धनिष्ठा’ हे चंद्र नक्षत्र ११ वे आहे.

११ × ३ = ३३ यामध्ये शुक्ल द्वादशी तिथी म्हणजे १२ वी तिथी मिळवल्यावर बेरीज ३३ + १२ = ४५ येते.

४५ या संख्येला ७ ने भागल्यावर बाकी ३ येते.

२८.९.२०२० या रात्री ८.५९ पर्यंत शुक्ल द्वादशी तिथी संपेपर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ ओ. भौमप्रदोष

प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. मंगळवारी येणार्‍या प्रदोष तिथीला ‘भौमप्रदोष’ म्हणतात. आर्थिक अडचणी नष्ट होण्यासाठी ‘भौमप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी, तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी हे व्रत करतात. प्रदोष हे व्रत केल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन आनंद प्राप्त होतो.

२ औ. अमृत योग

अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यास यश प्राप्त होते. २.१०.२०२० या दिवशी हा योग अहोरात्र म्हणजे पूर्ण दिवस-रात्र आहे.’

अधिक मासात करायच्या उपासनेसह या सप्ताहातील काही तिथींचे महत्त्व जाणून उपासना करणे लाभदायक आहे. सत्सेवेला प्राधान्य देऊन सतत ईश्‍वरी अनुसंधानात राहिल्यास मनुष्य जन्माचे सार्थक होते.’

२ अं. भद्रा (विष्टी करण)

ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. पंचांगाच्या तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगांपैकी पाचवे अंग (भाग) म्हणजे करण. सोप्या भाषेत सांगायचे, तर तिथीच्या अर्ध्या भागाला ‘करण’ असे म्हणतात. भद्रा ही भगवान सूर्यदेवाची कन्या आणि श्री शनिदेवाची बहीण आहे. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. १२.१०.२०२० या दिवशी पहाटे ५.२३ पासून सायंकाळी ४.३९ पर्यंत आणि १५.१०.२०२० या दिवशी सकाळी ८.३४ पासून सायंकाळी ६.४५ पर्यंत विष्टी करण आहे.

२ अ:. दग्ध योग

रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १२.१०.२०२० या दिवशी सोमवार असून सायंकाळी ४.३९ पासून एकादशी तिथीला आरंभ होत असल्याने ‘दग्ध योग’ आहे.

२ क. सौम्यवार प्रदोष

प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. बुधवारी येणार्‍या प्रदोष तिथीला ‘बुधप्रदोष’ किंवा ‘सौम्यवार प्रदोष’ म्हणतात. शिक्षण, ज्ञानप्राप्ती आणि मनोकामना पूर्तीसाठी ‘सौम्यवार प्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी, तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी हे व्रत करतात. प्रदोष व्रत केल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन आनंद प्राप्त होतो. हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात.

२ ख. दर्श अमावास्या

अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्‍या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) हे ‘दर्श’ संज्ञक मानतात. शुक्रवार १६.१०.२०२० या दिवशी पहाटे ४.५३ पासून उत्तररात्री १.०१ वाजेपर्यंत अमावास्या तिथी आहे. १६.१०.२०२० या दिवशी अधिक मास समाप्ती आहे.

२ ग. घटस्थापना, नवरात्रारंभ

आश्‍विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रारंभ होतो. या वर्षी १७.१०.२०२० या दिवशी नवरात्रारंभ आहे. नवरात्रारंभाला घटस्थापना किंवा कलशस्थापना यांना  विशेष महत्त्व असते. शरदऋतूमध्ये आश्‍विन मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत होणार्‍या देवीमातेच्या उत्सवाला ‘शारदीय नवरात्र’ असे म्हणतात. अखंड नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची ९ दिवस मनोभावे पूजा करतात. प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत ९ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी, ३. चंद्रघंटा, ४. कूष्मांड, ५. स्कंदमाता, ६. कात्यायनी, ७. कालरात्री, ८. महागौरी आणि ९. सिद्धीदात्री अशी देवीची ९ रूपे आहेत. धर्मग्रंथ आणि पुराण यांनुसार श्री दुर्गादेवीची उपासना करण्यासाठी शारदीय नवरात्र हा उत्तम काळ आहे.  नवरात्रकाळात ‘कुंकूमार्चन करणे, देवीमाहात्म्य वाचणे, देवीला फुलांच्या माळा घालणे, सप्तशती ग्रंथाचे वाचन करणे’, यांना विशेष महत्त्व आहे.

२ घ. मातामह श्राद्ध

आश्‍विन शुक्ल प्रतिपदा तिथीला ‘मातामह श्राद्ध’ करतात. मातामह श्राद्ध (दौहित्र) म्हणजे आईच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ नातवाने केलेले श्राद्ध होय.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाईड डाऊजर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषणशास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा.(१५.९.२०२०)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

टीप : या लेखात दिलेल्या सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्‍वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्‍वर घेतो.’

 

Leave a Comment