योग्यतेनुसार शिष्यांच्या श्रेणी

हिंदु धर्माचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! योग्यतेनुसार शिष्याचे प्रकार कोणते आणि त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, हे येथे देत आहोत.

 

शिष्य
शिष्य

 

१. निकामी शिष्य

‘या प्रकारचे शिष्य, म्हणजे ना इकडचे ना तिकडचे. यांना नदीपार जायचे असेल, तर ते ‘किनार्‍यावर किती नावा बांधल्या आहेत, त्यातील कोणती नाव सर्वांत सुंदर, विश्रांतीदायी आहे’, असे बघतील. ती शोधून तिच्यातून पलीकडे जातील. अशा प्रकारचे शिष्य एकसरशी स्वार्थी आणि अप्पलपोटे असतात. त्यांच्यामध्ये सेवा, समर्पण आणि साधना यांचा पूर्ण अभाव असतो.

 

२. गृहस्थ शिष्य (गुरूंप्रती नितांत श्रद्धा ठेवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार सांसारिक कर्तव्ये पूर्ण करणे)

गृहस्थ शिष्यास त्याचे जीवन, घर-संसार आणि त्याविषयीची कर्तव्ये असतात. सामाजिक चालीरितीनुसार त्याला गृहस्थ धर्म पाळावा लागतो. गृहस्थ शिष्यामध्ये गुरूंप्रती नितांत श्रद्धा आणि विश्वास असतो. मुलीचे लग्न असो वा मुलांचे शिक्षण यांविषयी तो गुरूंच्या आदेशाचे अक्षरशः पालन करतो. प्रत्येक लहान-मोठे निर्णय तो गुरूंच्या आदेशानुसारच घेतो. त्याचा विश्वास असतो की, गुरु जो काही निर्णय देतील, त्यातच त्याचे हित आणि कल्याण आहे. गृहस्थ शिष्य जप, अनुष्ठान आणि साधना मार्ग यांमध्ये अधिक रूची घेत नाही; कारण या सर्व गोष्टी त्याच्या डोक्याबाहेरच्या असतात. तो गुरूंना सर्वांत मोठा गृहस्थ मानून त्यांना ‘मार्गदर्शक’ म्हणून आपलेसे करतो.

 

३. कर्मसंन्यासी शिष्य (गृहस्थ धर्माच्या पालनासमवेत संन्यास धर्माचा काही प्रमाणात स्वीकार करणे)

कर्मसंन्यासी शिष्य गृहस्थ धर्माच्या पालनासमवेतच आध्यात्मिक उन्नतीसाठी संन्यास धर्माचा थोडा फार स्वीकार करतात. जीवनामध्ये अध्यात्माची ओळख व्हावी; म्हणून ते दीक्षाही घेतात. त्या वेळी गुरूंनी वेगळी वस्त्रे दिली, तर ते त्यांचाही स्वीकार करतात. गृहस्थाची सर्व कर्तव्ये पार पाडून ते अध्यात्म आणि गुरु सांगतील ती साधना करण्यास थोडा वेळ देतात.

 

४. साधक शिष्य (साधक शिष्याने गुरूंचे आज्ञापालन निष्काम भावाने करणे)

साधक शिष्य गुरूंच्या निर्देशास ब्रह्मवाक्य मानून त्यानुसार निर्देश मिळेपर्यंत सतत चालत रहातात. याविषयी शबरीचे उदाहरण घेता येईल. शबरीच्या गुरूंनी तिला सांगितले, ‘‘प्रभु श्रीराम तुझ्या दारी येतील.’’ त्या वेळी त्यांनी ते कधी, कसे, किती वर्षांनी येतील यांविषयी काही सांगितले नाही. शबरी प्रतिदिन ‘तिच्या घरासमोरची वाट झाडून स्वच्छ करणे, तिच्यावर फुलं पसरणे, प्रभु श्रीरामचंद्रासाठी फळं-फुलं जमवून ठेवणे’, असा नित्यक्रम बरीच वर्षे करत होती. ती वृद्धावस्थेला पोहोचली, तरी तिने तिच्या या साधनेत कधी खंड पडू दिला नाही. साधक शिष्याचा भाव शबरीप्रमाणे असतो. ते गुरूंच्या निर्देशांचे पालन श्रद्धा आणि विश्वास यांनी करतात. गृहस्थ आणि कर्मसंन्यासी शिष्य ‘मला हे पाहिजे, माझे असे व्हायला पाहिजे, माझे कल्याण व्हावे’, असे काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी कृती करतात; पण साधक शिष्यामध्ये असा काही प्राप्तीचा भाव नसतो. तो हे निश्चित जाणून असतो की, गुरूंना त्याची ओळख आहे आणि त्यांनी त्याला जे काही सांगितले आहे, ते त्याच्यासाठी योग्य आहे आणि तेच करत रहायला हवे.

 

५. संन्यासी शिष्य (स्वतःला पूर्ण समर्पित करून गुरुकार्य करणे)

संन्यासी शिष्य हे गुरूंचे कार्य पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असतात. ‘न्यास’ याचा अर्थ आहे, ‘कोणत्याही वस्तूची सुरक्षा आणि व्यवस्था.’ ‘सम्’चा अर्थ सम्यक रूपाने, म्हणजेच चांगल्या प्रकारे. ‘संन्यास’ म्हणजे स्वतःला पूर्णपणे गुरूंना समर्पित करणे, ज्याद्वारे गुरु आपल्यामधील उपयोगितेसंबंधी निर्णय घेऊ शकतील. प्रत्येक संन्यासी शिष्याचे एक विशिष्ट ध्येय असते आणि त्याचे सर्व कर्म त्याला त्या दिशेनेच पुढे घेऊन जाणारी असतात.

 

६. तांत्रिक शिष्य (दिव्य भाव)

या प्रकारच्या शिष्याची तुलना दिव्य भाव असलेल्या शिष्याशी करण्यात येईल. त्याचा गुरूंशी तादात्म्य भाव असतो.

संदर्भ : गुरुप्रसाद दिवाळी विशेषांक, २००८

Leave a Comment