ग्रहणाविषयी पसरवण्यात येत असलेले अपसमज

Article also available in :

श्री. प्रशांत जुवेकर

‘प्रत्येक गोष्ट काहीतरी विक्षिप्तपणे मांडून स्वतःचे दुकान चालवायचा कंड काही निर्मूलन करणारे लोक मागील अनेक वर्षे शमवत आहेत. ‘हिंदु संस्कृतीत, अध्यात्मात जे जे काही सांगितले आहे, ते ते सगळे अगदी चुकीचे आहे आणि ते टाकून द्यायला हवे’, असा त्यांचा समज आहे अन् तोच अन्य लोकांवर बिंबवण्याची केविलवाणी धडपड ते करत असतात. कोरोनामुळे शरीराला बाहेर पडायला संचारबंदी असली, तरी मनाला आणि विचारांना ती नाही. त्यामुळे ते विचार पसरवू शकतात, यात काहीच गैर नाही; पण ‘त्यांच्या विचारांवर स्वतःचे विचार ठरवायचे का ?’, याचा विचार आपण करायला हवा.

ग्रहणाविषयी अनेक गोष्टी सामाजिक माध्यमांवर येत असतात. त्यामध्ये ‘ग्रहणकाळात हवा अशुद्ध होते’, ‘ग्रहणकाळात झोप काढू नये’ वगैरे  गोष्टी या बाता आहेत’, अशी टीका काही जण करतात. मुळात हे सर्व सांगतांना जे दाखले दिले जातात, ते त्यांची बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करण्यास पुरेसे असतात. त्यामुळे अशा व्यक्तींची कीव येते.

 

१. ग्रहणकाळात वातावरणामध्वे रज-तम गुणांचे प्राबल्य वाढणे

‘एखादी गोष्ट का सांगितली गेली आहे ?’, याचा विचार व्हायला हवा. ‘ग्रहणकाळात हवा अशुद्ध होते’, असे म्हणतात. ते काही ’भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर झाले तसे हवा-पाणी अशुद्ध होते’, या अर्थाने नाही, तर ‘ग्रहणकाळात रज-तम गुणांचे प्राबल्य (कायम दुर्बिण घेऊन बसलेल्यांनी सत्त्व, रज, तम समजण्याच्या भानगडीत पडू नये) वाढलेले असते. त्याचा वातावरणावर परिणाम होतो’, या अर्थाने म्हटले आहे. त्यामुळे उगाच ‘धरणे कशी झाकायची ?’ असा पोरकट प्रश्‍न उपस्थित करणे चुकीचे आहे.

 

२. ग्रहणानंतर सात्त्विकतेकडे जाण्यासाठी स्नान करणे आवश्यक असणे

ग्रहणानंतर स्नान करण्यामागेही ‘शरीरावरील रज-तम निघून जावे’, हाच उद्देश आहे. ‘जसे कपडे धुतात, तसे शरीर धुणे म्हणजे स्नान’, असे मानणार्‍यांना हे काय समजणार ? पण हिंदु धर्मशास्त्र स्नानाला केवळ ‘शरीरस्वछता’ या दृष्टीने पहात नाही, तर ‘शरीर पवित्र करणे’, या दृष्टीने पहाते. स्वच्छता आणि पवित्रता यांत अंतर आहे. साबण शरीर स्वच्छ करू शकेल; पण पवित्र कसे करील ? पवित्र करणे, म्हणजे रज-तमाचे आवरण दूर करून सात्त्विकतेकडे जाणे. यासाठी स्नानाच्या वेळी ‘पवित्र नद्यांच्या जलाने स्नान करत आहोत’, असा भाव ठेवण्यास सांगितले जाते.

 

३. गरोदर महिलेने सात्त्विक संतती प्राप्तीसाठी काळजी घेणे

पाकिस्तान, अमेरिका आदी देशांचा उल्लेख करून ‘केवळ भारतीय स्त्रियांनाच ग्रहण लागते का ?’, असे काही पढतमूर्ख विचारतात. हिंदु धर्मशास्त्र संततीसंदर्भात उदात्त आणि व्यापक विचार करणारे आहे. येथे ‘केवळ हातापायाने धष्ट-पुष्ट असणे’, एवढाच विचार नाही, तर ‘ती संतती सात्त्विक असायला हवी’, असा व्यापक विचार आहे. दिसायला धष्ट-पुष्ट संतती रज-तमयुक्त असू शकते आणि ती समाजासाठी हानी करणारीही ठरू शकते; पण सात्त्विक अन् चारित्र्यवान संतती मात्र चांगला समाज घडवू शकते. त्यामुळे ग्रहण काळातील रज-तम वातावरणाचा गर्भावर परिणाम होऊ नये, यासाठी ‘गर्भवती स्त्रियांनी ग्रहण पाहू नये’, असे सांगितले आहे.

 

४. ग्रहणकाळ हा साधनेसाठी उत्तम असणे

‘ग्रहणकाळ हा साधनेसाठी उत्तम असल्याने झोपून तमोगुण वाढवण्यापेक्षा साधना करून या काळाचा लाभ प्रत्येकाने करायला हवा,’ असा उदात्त विचार यामागे आहे.

 

५. अध्यात्मशास्त्राविषयी ज्ञान नसणारे तथाकथित पुरो(अधो)गामी !

ग्रहण ही खगोलीय घटना आहे, हे सर्वज्ञात आहे; पण या घटनेचा वातावरण, शरिर आणि मन यांवर सूक्ष्मातून काहीच परिणाम होत नाही का ? याविषयी काहीच माहिती नसतांना बिनभोबाटपणे सामाजिक माध्यमांवर लिखाण प्रसारित करणे, याला काय म्हणावे ? डोळ्यांना न दिसणार्‍या कोरोनासाठी दिवसातून सहस्रो वेळा ४० सेकंद हात धुतांना काहीही न वाटणारे ज्या अध्यात्मशास्त्राविषयी काहीच माहिती नाही, त्यात मात्र नाक खुपसत बसतात. असो, त्यांचाही नाईलाज आहे; कारण असे केल्यानेच त्यांचे दुकान चालते आणि हिंदु विरोधकांकडून त्यांना ‘फंडिंग’ (निधी) मिळते.

असे असले, तरी आपण सर्व हिंदु बांधव सूज्ञ आहोत. आपण या अपप्रचाराला बळी पडू नये आणि आपल्या महान हिंदु धर्मशास्त्राचे पालन करूया, एवढीच नम्र अपेक्षा !’

– श्री. प्रशांत जुवेकर, जळगाव

Leave a Comment